लोकमान्य टिळक यांच्या जीवन, कार्य, विचार आणि साहित्याचा प्रभाव तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्यावर त्यांच्या बालपणापासूनच असल्याचे दिसते. तर्कतीर्थांचा जन्म ज्या पिंपळनेर गावी (जि. धुळे) झाला, तिथे १९०८ च्या दरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकर आणि लोकमान्य टिळक यांच्या विचारांचा पगडा असलेले अनेक लोक होते. अशा मंडळींचे तर्कतीर्थांच्या वडिलांकडे नित्याचे येणे-जाणे होते. घरच्या ओसरीवर ही मंडळी टिळकांच्या ‘केसरी’चे नियमित वाचन करीत असत. रोज चर्चेचा अड्डा जमायचा. याचा नाही म्हटले तरी बाल लक्ष्मणावर प्रभाव पडल्याशिवाय राहिला नव्हता. पुढे सन १९१४ मध्ये वडिलांनी बटू लक्ष्मणाला वेदाध्ययनासाठी प्राज्ञपाठशाळा, वाई येथे गुरू नारायणशास्त्री मराठे यांच्याकडे सुपूर्द केले. तिथे प्रा. वि. गो. विजापुरे यांच्या तळेगाव दाभाडे येथे सुरू असलेले राष्ट्रीय शिक्षण देणारे समर्थ विद्यालय ब्रिटिशांनी बंद पाडल्यामुळे तेथील शिक्षक व विद्यार्थी प्राज्ञपाठशाळेत येऊन दाखल झाले होते. त्यामुळे प्राज्ञपाठशेळेचे वातावरण टिळक – आगरकर विचाराने भारलेले होते.
लोकमान्य टिळक आणि गुरू नारायणशास्त्री मराठे यांचा वेदाध्ययनामुळे ऋणानुबंध होता. लोकमान्य टिळकांनी १९१५ मध्ये ‘गीतारहस्य’ प्रकाशित केल्यानंतर त्याची स्वाक्षरीसह एक प्रत नारायणशास्त्री मराठे यांच्याकडे धाडलेली होती. ती तर्कतीर्थांच्या पाहण्यात होती. या ‘गीतारहस्य’वर प्राज्ञपाठशाळेत चर्चा होत असे. इथे टिळक समर्थक आणि विरोधक असे वर्ग होते. ‘ब्रह्मचर्य’संबंधी टिळक विचारांवरही चर्चा होत असे. तर्कतीर्थांनी ब्रह्मचारी राहण्याचा घेतलेला निर्णय गुरू आज्ञेने बदलला आणि ते पुढे गृहस्थ झाले.
लोकमान्य टिळकांची आणि तर्कतीर्थांची तीन-चार वेळेस प्रत्यक्ष भेट झाली होती. तर्कतीर्थ हे टिळकांना पहिल्यांदा भेटले ते बडोद्याला. तेथील तत्कालीन कलेक्टर शारंगपाणी यांच्याकडे भेट झाली ती आचार्य विनोबा भावे यांच्यासोबत. पुढे सन १९१७ ला लोकमान्य टिळक यांनी वाईस भेट दिली तेव्हा. वाईकरांमार्फत लोकमान्यांचा सत्कार करण्यात येऊन मानपत्र प्रदान करण्यात आले होते. तर्कतीर्थ वाई येथील वेदाध्ययन पूर्ण करून काशीस उच्चशिक्षणार्थ प्रस्थान करणार होते. तत्पूर्वी, तर्कतीर्थांनी महादेवशास्त्री दिवेकर यांच्या सल्ल्यानुसार पुण्यास जाऊन लोकमान्यांचे शुभाशीर्वाद घेतले होते. त्या प्रसंगाने गहिवरलेल्या तर्कतीर्थांनी लिहून ठवले आहे की, ‘‘पुण्याच्या गायकवाड वाड्यात लोकमान्यांचे दर्शन घेतले आणि लोकमान्यांनी आशीर्वादासाठी माझ्या पाठीवर जो हात ठेवला, तो स्पर्श आजही माझ्या स्मरणात आहे.’’
हा भक्तिभाव जपत तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी लोकमान्य टिळकांवर अनेक भाषणे आणि मुलाखती दिलेल्या आहेत. तर्कतीर्थांनी टिळकांवर अनेक लेख लिहिलेत. इतकेच काय, सन १९६९ मध्ये त्यांनी साहित्य अकादमीसाठी ‘लोकमान्य टिळक लेखसंग्रह’चे संपादन केले आहे. या ग्रंथाच्या प्रस्तावनेत लोकमान्यांबद्दलचा आदर व्यक्त करीत लिहिले आहे की, ‘‘टिळकांची स्वराज्याची प्रतिज्ञा ही भीष्मप्रतिज्ञा आहे. या प्रतिज्ञेने स्वत:चे मरण त्यांनी डोळ्याने पाहिले आहे. त्यामुळे टिळकांचे लेखन हे ‘महाभारता’च्या उद्याोगपर्वापर्यंतच्या स्वातंत्र्ययुद्धाचे गद्या महाकाव्य बनले आहे.’’
तर्कतीर्थांनी ‘गीतरहस्य व साधनशूचिता’ शीर्षक ‘नवभारत’ मासिकाच्या मे, १९५२ च्या अंकात लिहिलेला लेख बहुचर्चित ठरला. ‘गीतारहस्य’मधील कर्मयोग तर्कतीर्थांच्या लेखी एक प्रकारचे आचारशास्त्रच होते. एका मुलाखतीत त्यांनी यावर सविस्तर प्रकाशझोत टाकला आहे. लोकमान्य टिळक लिखित वाङ्मय हे प्रा. बा. सी. मर्ढेकर विवेचित वाङ्मयीन महत्तेच्या निकषावर कसे यशस्वी उतरते याची केलेली मीमांसा वाचनीय आहे. लोकमान्यांना तर्कतीर्थ श्रेष्ठ तत्त्वज्ञ मानत. त्यांच्या ‘ओरायन’ आणि ‘आर्टिक होम ऑफ वेदाज’वर तर्कतीर्थांनी केलेले विवेचन चिकित्सक ठरते. लोकमान्य आणि तर्कतीर्थ अनुबंधाचा विस्तार लोकमान्यांचे उत्तराधिकारी ठरलेले दैनिक ‘केसरी’चे संपादक साहित्यसम्राट न. चिं. केळकर संबंधात दिसून येतो. न. चिं. केळकर यांनी तर्कतीर्थांचा प्रबंध असलेल्या ‘आनंदमीमांसा’ची केलेली समीक्षा मननीय आहे. लोकमान्य आणि तर्कतीर्थ अनुबंध केवळ वैचारिक नाहीत. टिळकोत्तर कालखंडात तर्कतीर्थकृत कार्य व लेखन हे टिळक प्रभावाची प्रचीती देणारे दिसते. महात्मा गांधींशी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचा अनुबंध हा लोकमान्य प्रभावाचाच विस्तार होय.