भारतीय अवकाश-विज्ञानाची सौर-झेप ठरणाऱ्या ‘आदित्य- एल १’ या मोहिमेचे नाव शनिवारी सार्थ झाले! नावातील ‘एल १’ हा पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्याच्या भ्रमणकक्षेच्या बाहेरचा, पण जिथून पृथ्वी नेहमी समोरच राहील असा बिंदू. त्या ‘एल १’ भोवती- म्हणजे पृथ्वीपासून १५ लाख किलोमीटर अंतरावर फिरण्याचा कळीचा टप्पा या मोहिमेने यशस्वीरीत्या गाठला. ‘आदित्य- एल १’ मोहिमेतला महत्त्वाचा भाग म्हणजे सूर्याच्या बाह्यावरणाचा अभ्यास करण्यासाठी भारतीय शास्त्रज्ञांनी साकारलेली वेधशाळा-उपकरणे सतत सूर्याच्या समोर ठेवणारा सुमारे २४४ किलो वजनाचा उपग्रह. तो आता काम करू लागेल. ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण यानाच्या (पीएसएलव्ही) ३६ व्या सुधारित आवृत्तीद्वारे हा उपग्रह सोडणाऱ्या भारतीय अवकाश संशोधन संस्थेला (इस्रो) या अंतराचे अप्रूप नाही, कारण इस्रोचे ‘मंगलयान’ तर ४० कोटी किलोमीटपर्यंत पोहोचले होते. तसेच उपग्रहाच्या वजनाचेही काही कौतुक नाही, कारण इस्रोनेच डिसेंबर २०१८ मध्ये गयानातील अवकाश-प्रक्षेपक तळावरून सोडलेला तब्ब्ल ५४४२ किलो वजनाचा ‘जीसॅट-११’ हा उपग्रह आता भूस्थिर अवस्थेत कार्यरत आहेच. तेव्हा ‘आदित्य-एल १’च्या प्रवासाचा टप्पा संपल्याचे समाधान सर्वानाच असले तरी खरी उत्कंठा आहे ती पुढल्या साधारण तीन महिन्यांनी सूर्याची कोणती माहिती मिळू लागणार, याची. ‘आदित्य- एल १’च्या वेधशाळा-उपकरणांचे काम तोवर सुरू झालेले असेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हे काम महत्त्वाचे. अमेरिकी अंतराळ-वेध संस्था असलेल्या ‘नासा’च्या संकेतस्थळावरील उल्लेखानुसार ‘मूलभूत’- म्हणूनच महत्त्वाचे. सूर्याच्या  बाहेरचा थर म्हणजे प्रकाशावरण हा ६००० अंश सेल्सिअस इतका तप्त आहे. आपल्याला दिसणारा प्रकाश येतो तो या थरातून, पण न दिसणारा अवरक्त प्रकाशही याच थरातून येतो.  या प्रकाशावरणाच्या बाहेरचा थर म्हणजे वर्ण-आवरण आणि त्याहूनही उंचावर लाखो अंश सेल्सिअस तापमान असलेला अतितप्त किरीट (इंग्रजीत ‘करोना’!) अशी सूर्याच्या बाह्यावरणाची रचना आहे. आपल्याकडच्या शहरांमध्ये हल्ली रुळलेली ‘चहापेक्षा किटली गरम’ अशी एक म्हण आठवून पाहा- अक्षरश: तशी सूर्याची गत आहे.  सूर्याच्या आतील थरांपेक्षा बाह्यावरण आणि त्यातही या आवरणाचा किरीट जास्त गरम आहे. तोही किती? तर सुमारे ११ लाख अंश सेल्सियस!  इतकी उष्णता येते कुठून? शास्त्रीय भाषेतच विचारायचे तर, अतिरिक्त ऊष्णता प्रदान करणारा ऊर्जा स्राोत कोणता?  याचे उत्तर मात्र अद्याप मानवाला मिळालेले नाही. ते उत्तर शोधण्याची दिशा कदाचित, ‘आदित्य- एल १’च्या कामातून मिळू शकेल. त्यातून अनेकपरींचे नवे प्रश्नही नक्की उद्भवतील.. उदाहरणार्थ, सूर्याचीच ‘तापमानवाढ’ होते आहे का, यासारखा प्रश्न. सूर्याच्या बाह्यावरणातल्या ज्या किरीटाचा अभ्यास ‘आदित्य- एल १’ करणार आहे, त्याच किरीटातून  पृथ्वीच्या पर्यावरणासाठी- जीवसृष्टीसाठी प्राणघातक ठरू शकणाऱ्या अज्ञात किरणांचे उत्सर्जनही होत असते. सध्या त्या किरणोत्साराचे सोयरसुतक आपणा पृथ्वीवासीयांना नाही, कारण अद्याप तरी आपले वातावरण त्या किरणांना बाहेरच्या बाहेर थोपवून धरण्याइतके सशक्त आहे. पण हे वातावरण अशक्त होत जाणार अशी स्थिती असताना सौर-किरीटातल्या त्या घातक किरणोत्साराचे प्रमाण किती, याचाही वेध भारतीय शास्त्रज्ञांना घेता येऊ शकतो. 

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta anvyarth aditya l1 a solar leap for indian space science is a success amy
First published on: 08-01-2024 at 02:11 IST