सहिष्णुता हा या देशाच्या संस्कृतीचा पाया असेल, तर तो कमकुवत करणाऱ्या कोणत्याही घटनेकडे अजिबात दुर्लक्ष होता कामा नये. परंतु अशा घटना घडवणाऱ्या प्रत्येकाला जर आपण काही राष्ट्रप्रेम व्यक्त करत आहोत असे वाटत असेल, तर त्याच्यापर्यंत या देशाच्या सांस्कृतिक परंपरा नीट पोहोचलेल्या नाहीत आणि पोहोचूनही संबंधित जर असे कृत्य करणार असेल, तर त्यास राष्ट्रद्रोहच म्हटले पाहिजे. या देशाच्या घटनेने येथील प्रत्येक नागरिकास व्यक्तिस्वातंत्र्य, धर्मपालनाचे स्वातंत्र्य दिले आहे, असे ओरडून सांगणाऱ्यांना हे स्वातंत्र्य हिसकावून घेण्याचा प्रयत्न कोण करतो आहे, याची जाणीव असायलाच हवी. तशी ती गुजरात विद्यापीठात नमाज पढणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांना बेदम मारहाण करणाऱ्या जमावाला नसावी. गुजरात विद्यापीठातील ही बाब महत्त्वाची अशासाठी की सर्वधर्मसमभावाचे डांगोरे पिटले जात असतानाच्या काळातच ती घडते आहे.

एकीकडे जगातील सगळय़ा देशांमध्ये भारताची प्रतिमा उजळवण्याचा प्रयत्न करायचा आणि दुसरीकडे परदेशांमधून भारतात शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांचे धार्मिक स्वातंत्र्य हिरावून घेत, त्यांना मारहाण करायची, हे या देशाच्या जागतिक लौकिकास साजेसे तर नाहीच, उलट या देशाची प्रतिमा मलिन करणारे आहे. शनिवारी रात्री गुजरात विद्यापीठातील वसतिगृहात नमाज अदा करणाऱ्या पाच विद्यार्थ्यांना २०-२५ जणांनी बेदम मारहाण केली. यापैकी दोघांना रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. श्रीलंका, तुर्कमेनिस्तान, अफगाणिस्तान आणि आफ्रिकी देशांतील हे विद्यार्थी आहेत. त्यांना मारहाण करण्याचे कारण त्यांनी नमाज अदा केला, हे असेल, तर परदेशातील भव्य देखण्या देवळांमध्ये जाणाऱ्या तेथील भारतीयांच्या पोटातही गोळा यायला हवा. मात्र तसे काही घडल्याचे ऐकिवात नाही. उलट आपल्या सत्ताधाऱ्यांच्या परदेश दौऱ्यांमध्ये अशा देवळांच्या उद्घाटनांच्या कार्यक्रमांचा आवर्जून समावेश असतो. अशा स्थितीत भारतीयांमध्ये असलेली सहिष्णुता अशी अचानक गायब कशी होते आणि त्याच्या जागी एकारलेपणा कसा अवतरतो, याचे उत्तर आजूबाजूच्या परिस्थितीत आहे. रमझानच्या काळात समाजमाध्यमात एका महिलेने विशेष पदार्थाची पाककृती प्रसृत केली, म्हणून जल्पकांनी तिला अक्षरश: सळो की पळो केले. आपल्या मराठीत अन्य भाषांमधील कितीतरी शब्द आपण सहजपणे आपले म्हणूनच वापरत असतो. त्याचे मूळ कळले, तर आपण ते उपयोगात आणणे नाकारू शकू काय? तारीख, फजिती, पेशा, फर्मास, नशीब, नाजूक, पालखी, पलंग असे कितीतरी शब्द मराठीने फारसी भाषेतून घेतले. त्यांना आपलेसे केले. परंतु ती भाषा बोलणाऱ्यांच्या पाककृतींना मात्र आपण कोणताही विचार न करता टीकेचे धनी करतो, हे मनातील ही द्वेषभावना आपण दूर करू शकत नसल्याचे लक्षण.

telangana suicides
तेलंगणात ११वी आणि १२वीचा निकाल जाहीर होताच काही तासांतच सात विद्यार्थ्यांची आत्महत्या
wildlife lovers, Tigers, forest, cages,
‘वाघ जंगलात नको, पिंजऱ्यात हवेत का?’ वन्यजीवप्रेमींचा सवाल; प्रकरण काय? जाणून घ्या…
Loksatta kutuhal Limitations of learning
कुतूहल: सखोल शिक्षणाच्या मर्यादा
Numerology Girls born on this date are lucky for husband
Numerology: नवरा आणि सासरच्या लोकांसाठी भाग्यशाली ठरतात या जन्मतारखेच्या मुली; जाणून घ्या त्या तारखा कोणत्या?

गुजरात विद्यापीठातील नमाज अदा करणाऱ्यांना झालेली मारहाण ही आपल्या या द्वेषभावनेची मोठीच खूण आहे. एका पीडित विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार, तब्बल ४० मिनिटे अशा विद्यार्थ्यांचा पाठलाग करून, ते लपून राहिले तरी त्यांना शोधून हा प्रकार सुरू होता. निवडणुकीच्या धामधुमीत अशी घटना घडणे, याला राजकीय अर्थाचे पदर चिकटण्याची शक्यता अधिक. परिणामी या घटनेची गंभीर दखल घेण्याचे सौजन्य दाखवण्यात आले, हे महत्त्वाचे. एरवी अशा घटनांमध्ये मारहाण, दगडफेक करणारे सहज सुटून जातात, अशी अटकळ बांधली जाते. काही अंशी ती खरीही असते. गुजरात विद्यापीठाने मात्र या वेळी प्रथमच तातडीची पावले उचलून कार्यवाहीला सुरुवात केली. विद्यापीठातील परदेशी विद्यार्थ्यांना अन्य वसतिगृहात हलवण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला असून तेथे सुरक्षा व्यवस्था करण्याचे ठरवले आहे. स्टडी अ‍ॅब्रॉड प्रोग्राम (सॅप)च्या समन्वयकांचीही उचलबांगडी करण्यात आली आणि परदेशी विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी तातडीने एका स्वतंत्र सल्लागार समितीचीही नियुक्ती करण्यात आली. परराष्ट्र मंत्रालयानेही या घटनेची दखल घेतली असून त्याबाबत आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत. शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या मनात असहिष्णुतेचे बीज पेरले जात असेल, तर ते देशाच्या भविष्यासाठीही धोकादायक ठरणारे आहे, याचे भान विद्यापीठांनी ठेवायलाच हवे. अशा घटना पुन्हा घडणार नाहीत, यासाठी विद्यार्थ्यांशी संवाद वाढण्याची आवश्यकता यामुळे निर्माण झाली आहे. ‘मारहाण परदेशी विद्यार्थ्यांना झाली म्हणून एवढी तरी चक्रे हलली,’ यासारखी प्रतिक्रिया आपल्या विविधतापूर्ण समाजात भरून राहिलेल्या हिंसेलाच मान्यता देणारी आहे, हे आपल्याला उमगते आहे का?