पीटर हिग्ज यांनी अत्यंत मूलभूत स्वरूपाचे संशोधन करून विश्वाच्या निर्मितीसंबंधी काही अतक्र्य आणि अनुत्तरित प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला. १९६०च्या आरंभी त्यांनी ‘सिद्धान्तबद्ध’ केलेल्या, सुरुवातीस ‘हिग्ज बोसॉन’ आणि पुढे ‘गॉड पार्टिकल’ असे अधिक माध्यमप्रिय परंतु तितकेच वादग्रस्त बिरुदीकरण झालेल्या मूलकणाच्या मागे जवळपास अर्धे शतक विज्ञानविश्व धावत होते. ज्यास आकारमान आहे, त्यास वस्तुमानही असतेच. परंतु सूक्ष्मातीत, आदिम अशा मूलकणांना वस्तुमान मिळते कोठून? ते देणारे ‘काही तरी’ अस्तित्वात असेलच, या दिशेने हिग्ज यांचे संशोधन सुरू झाले. त्यांच्या या अत्यंत क्लिष्ट ठरवल्या गेलेल्या संशोधनासाठी छापील व्यासपीठच हिग्ज यांना मिळत नव्हते. आधुनिक वैज्ञानिक संशोधन संस्कृतीत समकालीनांमार्फत पुनरीक्षण (पिअर रिव्ह्यू) झाल्याशिवाय एखादा सिद्धान्त किंवा संशोधनास मूलभूत अधिष्ठान लाभत नाही. पीटर हिग्ज यांना या अडचणींचा सामना सुरुवातीस करावा लागला. अखेर १९६४ मध्ये त्यांचे संशोधन छापले गेले; तरी त्यांनी मांडलेला (आणि म्हणून हिग्ज बोसॉन असे नामकरण झालेला) मूलकण पुढील कित्येक वर्षे सापडलाच नाही. तो ‘आहे’, पण ‘दिसलेला नाही’ यावर मात्र विज्ञानविश्वात यथावकाश मतैक्य घडून आले. म्हणूनच जगातील सर्वात महागडय़ा आणि अजस्र वैज्ञानिक प्रयोगांमध्ये गणल्या गेलेल्या लार्ज हॅड्रॉन कोलायडर (एलसीएच) प्रकल्पाचा उद्देश हिग्ज बोसॉनला हुडकणे असाच निर्धारित होता. २०१२ मध्ये स्वित्र्झलडला झालेल्या या प्रयोगामध्ये हिग्ज बोसॉनचे अस्तित्व दिसले आणि लगेच पुढील वर्षी पीटर हिग्ज यांना नोबेल पारितोषिक जाहीर झाले. हा सारा इतिहास स्मरण्याचे कारण पीटर हिग्ज यांचे निधन, जे नक्कीच दु:खद आहे. पण एक शोधकर्ता, त्याचे संशोधन, त्या संशोधनाला मिळालेली जगन्मान्यता आणि तरीही बहुतेक काळ त्या ‘बोसॉन’सारखेच त्याच्या शोधकर्त्यांचे प्राधान्याने अज्ञातवासातील अस्तित्व आणि प्रसिद्धिपराङ्मुख आयुष्य हे एखाद्या अनाम ऊर्जेची अनुभूती देणारे ठरते.

मूलकणांमध्ये वस्तुमान येते कोठून, या प्रश्नाची उकल या संशोधनामध्ये करण्याचा प्रयत्न झाला. वस्तुमान नसेल, तर सर्वच मूलकण प्रकाशाच्या वेगाने विश्वाच्या विराट पसाऱ्यात उडून-हरवून जातील. परंतु हे कण संमीलित होतात आणि तारे, पशु-पक्षी, मानवाची निर्मिती होते. हिग्ज यांनी या मुद्दय़ाचा वेध घेतला. त्यांनी असे सुचवले की, विश्वामध्ये एक बलक्षेत्र अंतर्भूत आहे. या बलक्षेत्राशी मूलकणांचे नाते कसे असते, त्यावर त्या मूलकणाचे वस्तुमान (मास) निर्धारित होते. या बलक्षेत्राला ‘हिग्ज फील्ड’ असे नाव विज्ञानविश्वात दिले गेले. असे संशोधन करणारे ते त्या काळचे एकमेव संशोधक नव्हते. परंतु या विषयावरील एका टिपणाच्या शेवटच्या परिच्छेदात, बलक्षेत्राचा पुरावा एखाद्या मूलकणात सापडू शकतो आणि असा मूलकण अस्तित्वात असू शकतो, असे म्हणणारे हिग्ज हे पहिलेच संशोधक ठरले. ‘हिग्ज बोसॉन’ या संज्ञेच्या जन्माची ही पार्श्वभूमी.

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta anvyarth peter higgs research scientific research amy
First published on: 11-04-2024 at 04:34 IST