अतुल सुलाखे
माणसाला काय हवे? सुख. या सुखाची व्याख्या नेमकी काय आहे? वर्तमानात भरपूर पैसा (बरेचदा कष्ट न करता) , त्यामुळे मिळणारी प्रतिष्ठा, उत्तम परिवार, स्वत:सह परिवाराची आरोग्य संपन्नता, भावी जीवनासाठी आर्थिक तरतूद, मुलाबाळांच्याही सुखी आयुष्यासाठी आवश्यक ती तरतूद, यानंतर प्रतिष्ठा वाढावी आणि त्यातूनही बरकत यावी म्हणून दानशूरता, यांच्यापैकी एक किंवा सर्वच्या सर्व गोष्टी मिळाव्यात, ही सुखाची व्याख्या आहे.




आज आळशासारखे बसून पैसा मिळावा ही अपेक्षा ठेवली जाणार नाही. तथापि त्या ऐवजी तणावमुक्त आयुष्याची अपेक्षा असेल. या गोष्टी हव्यात आणि त्यासाठी संपत्ती हवी हे सत्य कुणी नाकारू नये. माणसे, चांगले कुटुंब, चांगला समाज, चांगले राज्यकर्ते यांची याहून मोठी कल्पना सहसा केली जात नाही. आपला देशही याला अपवाद नाही.
सुखाच्या या कल्पनेवर विविध मार्गानी आणि पद्धतीने हल्ले होतात, कारण हे ‘सुख’ आम्हालाही मिळावे असे हल्ले करणाऱ्यांना वाटते. उद्या या हल्लेखोरांना सुख मिळाले तर ते समाजाचे वेगळे चित्र निर्माण करतील का हा अडचणीचा प्रश्न आहे. काही काळ बहुजनहितवाद साधल्याचे समाधान मिळेल. तथापि ते क्षणिक असेल.
विनोबा, संपत्ती मिळवण्याचे वरील सर्व हेतू अत्यंत बारकाईने समजून घेतात आणि संपत्ती धारक आणि संपत्तीची प्रयोजने यांची विभागणी करतात. संपत्ती हिसकावून घेतली पाहिजे या भूमिकेशी असहमती राखतात. धनवान, केवळ साठवून ठेवायचा, या उद्देशाने पैसा मिळवत नाहीत. त्या पाठीमागे वर आलेली प्रयोजने असतात. या कारणांमुळे प्रत्येकालाच संपत्ती हवी असते. प्रसंगी व्यवहारात मदत करणाऱ्यांच्या भ्रष्टाचाराकडे डोळेझाक केली जाते.
विनोबा, या तातडीच्या उपाययोजनेची निकड जाणत होते. वर्ग संघर्षांचा उपाय का शोधला जातो हे त्यांना ज्ञात होते. तथापि ही मलमपट्टी आहे आणि समाजाच्या दु:स्थितीवर दीर्घकालीन उपाययोजना केली पाहिजे असे त्यांचे मत होते. साधन संपत्ती हिसकावून घ्यावी आणि त्यासाठी कोणत्याही मार्गाचा अवलंब करावा ही पद्धती त्यांना मुदलातच अमान्य होती.
ज्या अहिंसेचा आधार घेत स्वातंत्र्य लढा दिला त्या अहिंसेवरची श्रद्धा डळमळीत व्हायला सुरुवात झाली होती. या टप्प्यावर देशात हिंसेचे समर्थन सुरू झाले आणि तो मार्ग प्रतिष्ठित झाला तर तो थेट स्वातंत्र्यावर घाला असेल.
विनोबांना ही भीती होती आणि अहिंसेचे तत्त्वज्ञान त्यांचा आधार होते. अशा स्थितीत देशातील गरिबीचा प्रश्न श्रीमंतांशी संघर्ष करत सोडवला जाऊ नये यादृष्टीने त्यांनी लोकशिक्षणाचा मार्ग चोखाळला.
आपली संपत्ती व्यर्थ घालवण्यापेक्षा ती समाजोपयोगी कारणांसाठी खर्च केली तर संपत्ती मिळवण्याचे सर्व हेतू साध्य होतील. ही गोष्ट धनवंतांना समजावून सांगायची जबाबदारी राज्य पद्धतीने घेतली पाहिजे असे विनोबांचे मत होते.
त्यातूनच विविध तत्त्वांचा वेध त्यांनी घेतला आणि भूदानासह परिवर्तनाचे विविध मार्ग देशात प्रतिष्ठित झाले. राज्य पद्धतीने ही जबाबदारी उचलली पाहिजे असे महत्त्वपूर्ण अपेक्षा ठेवत त्यांनी स्वत:च्या पातळीवर प्रयत्न सुरू केले.
jayjagat24 @gmail.com