अतुल सुलाखे
समाजपरिवर्तनाची रीत कशी असावी याविषयी दोन मतप्रवाह आहेत. एका गटाच्या मते, व्यक्तीमध्ये परिवर्तन झाले की समाज बदलायला वेळ लागत नाही. त्यामुळे ज्याने त्याने सन्मार्गाला लागून स्वत:चा उद्धार करून घ्यावा हे उचित. व्यक्तीने अशा प्रकारे जीवनपद्धती ठेवली तर समाजपरिवर्तन सोपे आणि टिकाऊ होते.
दुसरा गट म्हणतो व्यक्तिगत प्रयत्नांवर आमचा विश्वास नाही. जे काही बदल व्हायचे ते व्यापक पातळीवर आणि राज्यसंस्थेमार्फत होतात. कारण व्यक्तिगत पातळीवर सन्मार्गाला लागायचे तर या समाजात परिवर्तन होणे जवळपास अशक्य आहे. इथल्या बहुसंख्यांना भेडसावणारे प्रश्न इतके बिकट आहेत की त्यांना नैतिक वर्तन मोठय़ा कष्टाने जमू शकेल. याउलट सर्वहारा बहुजनांची सत्ता असेल तर परिवर्तनाची प्रक्रिया किती तरी सहज होईल.
ही भूमिका मांडणाऱ्या गटाने विनोबांनी सांगितलेल्या मालकी विसर्जनाच्या संकल्पनेला जोरदार हरकत घेतली होती. व्यक्तिगत पातळीवर मालकीचे विसर्जन ही गोष्ट ऐकायला चांगली वाटते, पण व्यक्तिगत त्यागामुळे परिवर्तनाची प्रक्रिया पुढे जात नाही.
आधी संपूर्ण समाजाने मालकी हक्काचे विसर्जन करावे आणि मग व्यक्तिगत पातळीवर तिचा अमल व्हावा. यात सरकारची भूमिका महत्त्वाची आहे. खासगी संपत्ती कायद्याने नष्ट करायची आणि नंतर व्यक्तिगत संपत्तीचा त्याग करायचा.
विनोबा खरे तर दोन्ही मार्ग नाकारतात, तथापि त्यांच्यात असणारा चांगला भाग ते आदरपूर्वक स्वीकारतात. त्यांना आधी समाज नंतर व्यक्ती ही परिवर्तनाची पद्धत मान्य नाही. ध्येय आहे, पण तिथवर पोहोचण्याचा नेमका मार्ग माहीत नाही अशी या गटाची दुरवस्था आहे. अशा स्थितीत कोणताही मार्ग चोखाळून ध्येयापर्यंत पोहोचणे एवढेच शिल्लक राहते. परंतु या मार्गाने होणारे परिवर्तन ठिसूळ असते.
विनोबा साम्यवादाला दुसऱ्या गटात ठेवतात आणि सर्वोदयाची समाजपरिवर्तनाची कल्पना मांडतात. सर्वोदयाच्या परिवर्तनात व्यक्ती ते व्यवस्था या दिशेला अत्यंत महत्त्व आहे. एखादी व्यवस्था चांगली आहे, सत्य आहे तर ती तत्काळ अमलात आणली पाहिजे. त्यानंतरच ती शेजारी आणि समाजाला समजावून सांगितली पाहिजे. त्यानंतरचा टप्पा म्हणजे सरकारवर दबाव. थोडक्यात आरंभ व्यक्तिगत पातळीवर आणि शेवट सरकारच्या कायद्यात.
समाजपरिवर्तनाची ही बाजू साम्यवाद्यांमध्येही दिसते. त्यांच्यातील अनेक जण व्यक्तिगत परिवर्तन, त्याग अशी वाटचाल करतात, परंतु त्यांच्या तत्त्वज्ञानात या विचाराला स्थान नाही. संघर्ष करायचा, सत्ता मिळवायची आणि त्याआधारे परिवर्तन करायचे.
या दोन भूमिकांचे दर्शन भूदानाच्या निमित्ताने ठळकपणे घडले. साम्यवाद्यांना ‘भू’ मान्य होती, तथापि ‘दान’ शब्दाला त्यांची जोरदार हरकत होती. जमिनीचा प्रश्न कायदे करूनच सुटेल, दान वगैरे गोष्टी त्यात घुसडल्या की मूळ प्रश्न कायम राहील आणि व्यक्तीचा महिमा तेवढा वाढेल. स्वातंत्र्योत्तर भारतात जमीन प्रश्नासाठी जे कार्य झाले त्याचा एकत्रित अभ्यास करून भूदानाचे यशापयश पाहावे लागेल
jayjagat24@gmail.com