अतुल सुलाखे
लक्ष्मी सत्याला अनुसरते. कीर्ती त्यागामागे, विद्या अध्ययनासोबत येते. बुद्धी कर्माला अनुसरते. अशा अर्थाचे एक सुभाषित आहे. त्यामुळे ‘बुद्धि: कर्मानुसारिणी’ असे म्हटले जाते.
विनोबांनी बुद्धीचे दोन प्रकार सांगितले आहेत. वैज्ञानिक बुद्धी आणि व्याकूळ बुद्धी. सोप्या भाषेत त्यांनी गुरूची बुद्धी आणि आईची बुद्धी असे वर्णन केले आहे. दोहोंमधे सूक्ष्म फरक आहे. आईची बुद्धी मुलाच्या व्यथेने व्याकूळ होते पण ही व्याकुळता प्रश्नाचे नेमके उत्तर देत नाही. याउलट गुरू समस्येचे सूक्ष्म आणि सावकाश समाधान करतो.
सर्वोदय अशा शास्त्रानुकूल बुद्धीचे उत्तम उदाहरण आहे. कसेही करून आजच सत्ता ताब्यात घ्यावी आणि समाजातील उपेक्षित घटकांच्या समस्यांचे निवारण करावे ही भूमिका सर्वोदयाला मान्य नाही. या धोरणामुळे क्षणिक उपाय हाती येईल पण काही काळानंतर तीच समस्या दुप्पट वेगाने समोर येईल. त्यामुळे जनतेचे प्रश्न शास्त्रबुद्धीचा वापर करूनच सोडवायला हवेत.
शास्त्रबुद्धीला अनुकूल असणारी गौतम बुद्धांपासूनची परंपरा, संतांचा वारसा, यशस्वी स्वातंत्र्यलढा हा घटनाक्रम विनोबा जाणत होते. भारतीय नेत्यांनी अपार कष्टाने स्वातंत्र्य मिळवले. आज भारतात लोकनियुक्त शासन आहे, आपला वैज्ञानिक दृष्टिकोनाशी परिचयही झाला आहे, अशा स्थितीत संघर्ष आणि तोही हिंसक, हा मार्ग विनोबांना मान्य होणे शक्य नव्हते.
मुळात भारतीय परंपरेतील समाजपरिवर्तन अपयशी ठरले आहे, हेच त्यांना अमान्य होते. गौतमापासून गांधींपर्यंत समाजपरिवर्तनाचे कार्य घडले नसते तर आपण सर्वजण पशूच्या पातळीवर पोहोचलो असतो. त्यांची भूमिका इतकी स्पष्ट होती.
परंपरा, स्वातंत्र्यलढा, आणि आधुनिक जगाचा परिचय असणारे लोकनियुक्त सरकार ही पृष्ठभूमी लक्षात घेऊन विनोबांनी भूदान यज्ञाचा मार्ग निवडला. पारंपरिक अध्यात्माला नवे रूप दिले. अहंता-ममता सोडा, स्वार्थाचा त्याग करा म्हणजे तुमची पारमार्थिक उन्नती होईल. विनोबांनी याला ऐहिक उन्नतीची पूर्वअट घातली. परम साम्य गाठणे म्हणजे ऐहिक पातळीवरही कल्याणाची अवस्था प्राप्त करणे ही दृष्टी त्यांनी दिली.
हिंसा हे आम जनतेचे शस्त्र नाही आणि तसे ते होणारही नाही हे जाणून त्यांनी समाजपरिवर्तनाचा मार्ग शिस्तबद्ध केला. अगदी गांधीजींच्या सत्याग्रहाच्या मार्गाचेही सूक्ष्म परीक्षण केले. त्या मार्गातील उणिवा समाजासमोर ठेवल्या. असे करताना लोकांच्या समस्या सुटल्या नाहीत, तरी चालेल पण आपला मार्ग सोडायचा नाही असा दुराग्रह राखला नाही. माझेच म्हणणे ऐका आणि माझ्याच मागे या अशी हट्टी भूमिका घेतली नाही.
भारतीय जनमानसाला वेड लावावे असे विनोबांच्या व्यक्तित्वाचे रूप होते. त्यांनी फक्त विचार दिला. भूदानाच्या, गीताईच्या आणि अंतिमत: साम्ययोगाच्या रूपाने. विनोबांचे दोष म्हटले की विनायक नरहर भावे हे नाव आपल्यासमोर येते आणि गुण म्हटले की गीताई, भूदान आणि साम्ययोग यांचे स्मरण होते. शास्त्राधिष्ठित बुद्धीचा याहून अधिक पुरावा देणे अवघड आहे.
jayjagat24@gmail.com