सर्वत्र फिरता येणे ही मूलभूत गरज आहे आणि तो आपला मूलभूत हक्कही आहे, पण या हक्कावरही निर्बंध आहेत…

दक्षिण आफ्रिकेत लढा देऊन १९१५ साली महात्मा गांधी भारतात परत आले. अनेक वर्षे परदेशी राहिल्यामुळे भारताकडे एका नव्या नजरेने गांधी पाहात होते. भारत समजून घ्यायचा तर देशभर फिरले पाहिजे, देश समजून घेतला पाहिजे म्हणून गांधी देशभर काही ठिकाणी रेल्वेने फिरले तर काही ठिकाणी पायी. वर्षभर काहीही न बोलता सर्वत्र फिरत, लोकांना वाचत गांधींनी देश अनुभवला. काही वर्षांपूर्वी नितीन सोनवणे हा तरुण गांधींकडून प्रेरणा घेत जगभर ४६ देशांमध्ये सायकलवर फिरला. राहुल गांधीही याच विचाराने प्रेरित आहेत, असे दिसते. जग अनुभवणे असो की साध्या सामान्य गरजा पूर्ण करणे असो, सर्वत्र फिरता येणे ही मूलभूत गरज आहे आणि तो आपला मूलभूत हक्कही आहे. संविधानाच्या एकोणिसाव्या अनुच्छेदामध्ये एक महत्त्वाचे स्वातंत्र्य आहे ते संचार करण्याचे. भारताच्या कोणत्याही भागात फिरण्याचे स्वातंत्र्य या अनुच्छेदामध्ये मान्य केले आहे. त्यासोबतच आपणा सर्वांना देशाच्या कोणत्याही भागात स्थायिक होण्याचे स्वातंत्र्य आहे. या दोन्हींचा एकत्रच विचार केला जातो, कारण त्या दोहोंचा परस्परांशी थेट संबंध आहे.

rushi sunak
अग्रलेख: पंधराव्या लुईचे पाईक
Bombay HC Halts Maharashtras RTE Act Changes
अग्रलेख : हक्क’भंगाची हौस!
loksatta editorial on one year of women paraded naked in manipur incident
अग्रलेख: समर्थांची संशयास्पद संवेदना
loksatta editorial bjp bring pakistan issue in lok sabha election campaign for targeting congress
अग्रलेख : शेजार‘धर्म’!
What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
China Becomes India Top Trade Partner
­­­­अग्रलेख : डोळे वटारता वटारता…
Loksatta editorial Controversy between Sanjeev Goenka and KL Rahul the owner of Lucknow Super Giants franchise in the Indian Premier League
अग्रलेख: मुजोर, मग्रूर, मध्ययुगीन..
pm modi on prajwal revanna sex tape row
प्रज्वल रेवण्णा प्रकरणावर पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच केलं भाष्य; म्हणाले…

या हक्कांवरही निर्बंध घातले आहेत. संचारस्वातंत्र्यावर आणि स्थायिक होण्याच्या स्वातंत्र्याच्या हक्कांवर निर्बंध लादण्यासाठी दोन अटी आहेत: १. सार्वजनिक हिताकरता लोकांच्या संचार करण्याच्या स्वातंत्र्यावर बंधने येऊ शकतात. २. अनुसूचित जमातींचे हित आणि रक्षण लक्षात घेऊन या स्वातंत्र्यावर मर्यादा येऊ शकते. उदाहरणार्थ, कोविड काळात नागरिकांच्या संचारस्वातंत्र्यावर मर्यादा आली. टाळेबंदी घोषित झाल्यावर नव्या अटी लागू झाल्या. साथ पसरू नये याकरता साथरोग कायदाही लागू करण्यात आला. स्वाभाविकपणे हे निर्बंध सार्वजनिक हिताकरता होते; मात्र काही वेळा ‘सार्वजनिक हित’ नेमके काय आहे, हे सापेक्ष असू शकते आणि त्यातून समस्या निर्माण होऊ शकतात. दुसरी अट आहे ती अनुसूचित जमातींच्या संदर्भात. ईशान्येतील राज्यांमधील डोंगराळ भागात अनुसूचित जमातींचे वास्तव्य आहे. त्या प्रदेशात इतर भागातील लोक मोठ्या प्रमाणावर स्थायिक झाले तर त्या जमातींच्या संस्कृतीवर आक्रमण होऊ शकते, त्यामुळे त्यांच्या हिताचे संवर्धन व्हावे म्हणून या भागात स्थायिक होण्याच्या अनुषंगाने काही मर्यादा आहेत.

याबाबतचे आणखी एक उदाहरण आहे ते वेश्यांबाबतचे. मुली/ स्त्रिया यांचे लैंगिक शोषण होऊ नये तसेच त्यांना अनैतिक व्यापारापासून संरक्षण मिळावे याकरता वेश्यांच्या संचार करण्याच्या आणि राहण्याच्या स्वातंत्र्यावर मर्यादा आणणारे कायदे झाले. हे वाजवी निर्बंध असल्याचे निकालपत्र न्यायालयाने दिले आहे. तसेच गुन्हेगारांच्या, गुंडांच्या संचारस्वातंत्र्यावर निर्बंध आणल्याची अनेक उदाहरणे आहेत. काही वेळा अशा गुंडांमुळे कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात येऊ शकते. त्यामुळे त्यांना जिल्हाबंदी केली जाते. काही वेळेस राज्यातून तडीपार केले जाते. बड्या बड्या नेत्यांनाही अशा कारवायांना सामोरे जावे लागले आहे.

अशी काही बंधने असली तरी बहुतांश वेळेला हे स्वातंत्र्याचे हक्क बजावता येतात. या स्वातंत्र्याचा अवलंब केल्यामुळेच मानवी इतिहासाला वळण लागले आहे. स्थलांतराने तर मानवी सभ्यतेला दिशा दिली आहे. या अनुषंगाने राहुल सांकृत्यायन यांचे ‘घुमक्कडशास्त्र’ हे पुस्तक मोलाची मांडणी करते. या पुस्तकाचा ‘भटकंतीशास्त्र’ या नावाने अनुवादही झाला आहे. अनेक धर्मांच्या संस्थापकांपासून ते इतिहासकारांपर्यंत सर्वांनीच भटकंती करत एक अनोखी दृष्टी दिली आहे. ही दृष्टी मिळवण्यासाठी आपल्या कोशातून बाहेर पडून चालावे लागते. त्यामुळे संविधानातील संचाराचे नि स्थायिक होण्याचे स्वातंत्र्य आपल्याला डोळस वाटसरू बनवू शकते. ‘चरैवेति चरैवेति’ अर्थात ‘चालत राहा’ असे म्हटले जाते ते सुजाण वाटसरू बनण्यासाठीच !

डॉ. श्रीरंजन आवटेे

poetshriranjan@gmail. com