‘‘या प्रश्नाचे उत्तर मला देता येईलच असे नाही; पण मी देणार आहे. मी रॉयवादाचा स्वीकार केला, ही गोष्ट प्रवाहप्राप्त म्हणून झालेली नाही. याकरिता मला फार मोठा वैचारिक झगडा अनेक वर्षे करावा लागला. मी तत्पूर्वी जन्मत:च सनातनधर्मीय होतो, परंतु माझा सनातन धर्म रूढीवादी नव्हता! तो तात्त्विक होता. सनातन धर्मी, वेदांती, पठडीत वाढलेल्या मनाचा मानव्यवादी, सर्वगामी चिकित्सेने भरलेल्या वैज्ञानिक दृष्टीचा तो झगडा होता. आपल्या जीवनमूल्यांचा पाया बळकट आहे, अशी श्रद्धा असल्याशिवाय सुसंस्कृत माणसास समाधान लाभत नाही. तशी श्रद्धा नसेल तर मानसिक अध:पतन संभवते.

मला समजू लागल्यापासून मी या देशातील सामाजिक व राजनैतिक चळवळीत भाग घेऊ लागलो. यामुळे अनेक विचारप्रवाहांबरोबर रॉयवादाशी माझी गाठ पडली. मी रॉयवादाचा विचार प्रथम विरोधी भूमिकेतून करू लागलो. मौलिक विलक्षणता रॉयवादात असणे त्याचे कारण होते. सन १९१९ ते १९३९ पर्यंत मी काँग्रेसमध्ये होतो. त्रिपुरी (जबलपूर) काँग्रेस अधिवेशनात सन १९३९ मध्ये मानवेंद्रनाथ रॉय यांनी आपले विचार मांडले. डॉ. राजेंद्र प्रसाद आणि पंडित नेहरू यांनी त्याचा विरोध करत रॉय यांच्या विचारांत आणि काँग्रेसमध्ये ‘बुनियादी फर्क’ (मूलभूत मतभेद) असल्याचे स्पष्ट केले. मूलत:च विरोधी असलेली विचारसरणी माझ्या विचारपथात आल्याबरोबर क्षोभ उत्पन्न करून ती मला विचारास प्रवृत्त करते. रॉयवादापूर्वी सनातन वैदिक धर्म, बौद्ध तत्त्वज्ञान, गांधीवाद, मार्क्सवाद यांच्या प्रभावात होतो. रॉयवाद हा सगळ्याच विचारांची पुनर्तपासणी मुळापासून करावयास भाग पाडतो म्हणून मी त्याकडे आकर्षित झालो.

मौलिक वैलक्षण्य विचारप्रवर्तकतेस प्रवृत्त करीत असते. रॉय यांचे विचार स्फटिकाप्रमाणे स्वच्छ, करतलामलक (सुंदर, पवित्र, कोमल), स्पष्ट, क्ष-किरणवत भेदक आहेत. हेच वैशिष्ट्य तत्त्वजिज्ञासूंना उत्तेजित व उद्दीपित करत समर्थ करते. रॉयवादी होण्यापूर्वी हिंदी समाज व संस्कृतीच्या राजकीय आणि सामाजिक उन्नती-अवनतीची कारणमीमांसा करण्याची प्रवृत्ती माझ्या ठायी बलवत्तर होती. राजा राममोहन रॉय, डॉ. रा. गो. भांडारकर, न्यायमूर्ती रानडे, महात्मा फुले, ‘सुधारक’कार गोपाळ गणेश आगरकर यांची सामाजिक विचारधारा आणि विष्णुशास्त्री चिपळूणकर, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी यांची राजकीय विचारधारा आणि अन्य विचारधारांच्या आधारे हिंदी समाज (भारतीय) व इतिहासासंबंधी माझ्या मनात असलेले अनेक प्रश्न सोडविण्यास रॉय यांची सम्यक व विस्तृत मांडणी मला साहाय्यक वाटली. गांधी विचारात सर्वांना घेऊन जाण्याची हातोटी होती; पण ती श्रद्धा, परंपराधारित होती. गांधीवादाला नैतिक भूमिकेवरून मानवजातीचे प्रश्न महत्त्वाचे वाटतात; पण व्यवहारात राष्ट्रवादी राजकारणच त्याचा आधार ठरतो. त्यामुळे गांधीवादी नैतिकता कल्पनेतच शिल्लक राहते. ही वस्तुस्थिती डोळ्यासमोर येऊ लागल्यामुळे हिंदी समाजाचा व मनुष्यजातीचा प्रश्न राजकीय व सामाजिकदृष्ट्या मूलत: एकच असल्याचे समजावणारा रॉयवाद मला उच्चनीतितत्त्वांच्या दृष्टीने श्रेष्ठ दिसला आणि त्यामुळे रॉयवादी विचारांचे मी अधिक मनन करू लागलो.

रॉयवादाची अनेक वैशिष्ट्ये आहेत – एक म्हणजे रॉयवादी विचारानुसार हिंदी जनतेच्या स्वातंत्र्याचा झगडा (लढा) हा लोकसत्तात्मक स्वातंत्र्याचा व्हायला हवा, असा आग्रह दिसून येतो. तो आग्रह जनतेच्या मूलभूत अधिकारांवर उभारलेला आहे. दुसरे म्हणजे हिंदी समाजाची सध्याची रचना बदलून नवी रचना करण्यास समर्थ असे लोकसत्तात्मक स्वराज्य स्थापण्याचा आग्रह. त्यामुळे प्रतिगामी राष्ट्रवादास आळा बसेल. तिसरी गोष्ट म्हणजे हिंदी जातीचे स्वातंत्र्य (भारतीय स्वातंत्र्य) व मानवी संस्कृती यांचे हितसंबंध अविभाज्य असणे रॉयवाद आवश्यक मानतो. त्यासाठी वरिष्ठ नैतिक मूल्ये तो अनिवार्य मानतो. चौथी बाब अशी की, हिंदुस्थान किंवा आशिया खंडातील स्वातंत्र्य चळवळी मानवी हक्कांपेक्षा स्वातंत्र्य महत्त्वाचे मानतात. अशा केवळ स्वातंत्र्याधारित चळवळीत जनता परतंत्र राहून हुकूमशाही राजवट (फॅसिस्ट) उत्पन्न करू शकते. म्हणून भारतातील स्वातंत्र्य चळवळ वैचारिक क्रांतीची हवी. ती युरोपातील नवजीवन चळवळीसारखी हवी. या विचारसरणीस आम्ही ‘मूलगामी दृष्टी’ म्हणतो. राष्ट्रवाद राष्ट्रनाशक असल्याने मानवजातीची एकता सर्वक्षेत्रांत प्रस्थापित करणे आमचा एकमेव उद्देश आहे.

डॉ. सुनीलकुमार लवटे

drsklawate@gmail.com