प्रत्येक काळ हा तत्कालीन समाजमानसावर प्रगतीच्या पाऊलखुणा उमटवत असतो. विसावे शतक हे भारतावरील ब्रिटिश राजवटीचे होते. पारतंत्र्य गुलामीकडे नेते हे खरे! पण ब्रिटिश काळाने शिक्षणाद्वारे भारतीय संस्कृती पाश्चात्त्य दृष्टीची बनविली. परिणामी, येथे समाज नि धर्मसुधारणा होणे शक्य झाले. विसाव्या शतकातील या स्थित्यंतराचा आढावा घेणारा एक विस्तृत लेख तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी लिहिला आहे. त्याचे शीर्षक होते ‘गेल्या शतकाचा वारसा’. हा लेख तर्कतीर्थ संपादित ‘श्री यशवंतराव चव्हाण अभिनंदन ग्रंथ’मध्ये आहे. १२ मार्च, १९६१ रोजी यशवंतराव चव्हाण यांनी ४८व्या वर्षात पदार्पण केले. तो काळ स्वतंत्र महाराष्ट्र राज्याच्या प्रथम वर्षपूर्तीचा होता. अशा वेळी गतकाळाचा वारसा सांगत भविष्याची घडण करण्याची तर्कतीर्थांची दूरदृष्टी या लेखामागे दिसते.

भारताच्या इतिहासात नवे वैचारिक संक्रमण आणि प्रगतीपर स्थित्यंतर ब्रिटिश आगमनाने सुरू झाले. ब्रिटिश साम्राज्य स्थापनेमुळे भारताचा पाश्चात्त्य संस्कृतीशी संपर्क आला. त्यातून एकप्रकारचा सांस्कृतिक संघर्ष निर्माण झाला, तरी अंतिमत: संगमाने नवे युग सुरू झाले. भौतिक आणि यांत्रिक सुधारणा घडून आल्या. नवे आर्थिक व व्यापारी व्यवहार सुरू झाले. नवी प्रशासन व्यवस्था अस्तित्वात आली. नव्या कायद्यांनी शिक्षण व समानता रुजविली. उदारमतवादी न्यायासन निर्माण झाले. व्यक्तिस्वातंत्र्याचा उगम झाला. वृत्तपत्रांचे व दळणवळणाचे नवे जग निर्माण झाले. धर्म, समाज व राज्य या तिन्ही क्षेत्रांत नवे विचार व मूलगामी चिकित्सा सुरू झाली. राजाराममोहन रॉय यांच्यामुळे धर्म व समाजसुधारणा सुरू होऊन जुन्या चालीरीती मागे पडल्या. ब्राह्मो, आर्य आणि सत्यशोधक समाजांमुळे धर्माविषयी नवी दृष्टी इथल्या धर्मानुरागी समाजाने स्वीकारली. यात स्वामी दयानंद, महात्मा फुले यांनी मोलाची भूमिका बजावली, त्यामुळे विसाव्या शतकात धर्म, समाज नि राज्य अशा तिन्ही क्षेत्रांत सुधारणांचे वारे वाहू लागले. टिळक युगाने जी राजकीय जागृती घडवून आणली होती, त्याचे रूपांतर स्वातंत्र्य चळवळीत करणे महात्मा गांधींना शक्य झाले. शेतकरी, कामगार, महिलावर्ग चळवळीत आला.

ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध असंतोष निर्माण करून जनमत संघटित करण्यास महात्मा गांधींना यश आले, ते येथील जनतेत राष्ट्रवादाची भावना निर्माण झाल्यामुळे. भारतीय राष्ट्रवाद इथे दोन रूपांत आकारास आला- १) धर्मनिरपेक्ष, २) आध्यात्मिक. धर्मनिरपेक्ष राष्ट्रवादाने भारत इहवादी बनून भौतिक प्रेमी बनला. लोकमान्य टिळक, स्वामी विवेकानंद, योगी अरविंद घोष, रामतीर्थ, महात्मा गांधीप्रणित राष्ट्रवाद आध्यात्मिक स्वरूपाचा म्हणता येईल. राष्ट्रवादी भाव जागृतीतून येथील जनतेत स्वातंत्र्यप्राप्तीसंबंधी मार्गाचे बहुविध परिणाम झाले. स्वातंत्र्य हवे होते; पण काहींना ते सनदशीर, अहिंसक मार्गाने हवे होते. त्यांचे नेतृत्व महात्मा गांधींकडे होते. काहींना हे स्वातंत्र्य सशस्त्र क्रांतीनेच मिळू शकेल, असा विश्वास होता. त्यात मानवेंद्रनाथ रॉय, सुभाषचंद्र बोस, भगतसिंग यांसारखे तरुण गट या मार्गाचे समर्थक होते. नेमस्त व जहाल गट अशा मार्गाने जे प्रयत्न झाले, त्यामुळे स्वातंत्र्य अल्पकाळात मिळणे शक्य झाले.

देशाचे विभाजन झाले. धार्मिक समरसता व सामंजस्य निर्माण न होणे, हे त्याचे कारण होते. स्वतंत्र भारत लोकशाही समाजवाद स्वीकारत विकसित होत राहिला. इथे भाषा, प्रांत, संस्कृती, धर्म, जाती भिन्नता असली तरी एकात्म राष्ट्र उभे राहू शकले. त्याचे कारण इथे स्वातंत्र्यानंतरच्या काळात लोकशाही संरक्षक शक्तींची जोपासना होऊ शकली. सुरक्षित नागरिकांची घडण इथल्या प्रजासत्ताक संघराज्याने केली. संसदीय लोकशाही राज्य व राष्ट्रात रुजली. लोकशिक्षण व लोकसहभागामुळे येथे हे घडू शकले; पण आता या गतवारसाचे संरक्षण करण्याची जबाबदारी काळाने आपणावर टाकली आहे. येथील पक्षोपपक्षांचे राजकारण गोंधळलेले आहे. या गोंधळलेल्या स्थितीतून जनमानसाला मुक्त करायचे तर देशव्यापी विधायक रचना चळवळ भविष्यकाळाची गरज आहे. ती गतसमृद्ध वारशावर उभी राहिली, तरच नवा देश, नवा विचार आणि नवा माणूस उद्या इथे पाहायला मिळेल.

डॉ. सुनीलकुमार लवटे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

drsklawate@gmail.com