‘आपण एखादी पदवी घ्यावी म्हणून मी वाराणसीला (काशी) गेलो. तेथे आमचे स्वामी केवलानंद सरस्वतींचे शिष्य स्वामी योगानंद होते. त्यांचा एक सुरेख मठ बिंदुमाधव घाटावर होता. तेथून समोरच गंगेचे दर्शन घडत असे. तो सबंध मठच मला मिळाल्यासारखा झाला. कारण, स्वामी योगानंद तेथे नव्हते. ते प्रचारासाठी महाराष्ट्रात निघून गेले होते. ते मूळचे सोलापूरचे होते; पण येथे आल्यावर त्यांना पोटाची काही व्याधी जडली. पुढे ते लवकरच निवर्तले. मी या मठात राहात असे. जवळच्याच मोहल्ल्यात लक्ष्मणशास्त्री द्रविड यांची पाठशाळा होती. तिच्यात ते स्वत:, त्यांचे चिरंजीव राजेश्वरशास्त्री, नित्यानंद पर्वतीयशास्त्री शिकवत असत. नित्यानंद पर्वतीयशास्त्री ‘चतु:शास्त्री’ होते. म्हणजे व्याकरण, न्याय, मीमांसा आणि अलंकारशास्त्र यांवर त्यांचा अधिकार होता.

वरील सर्व पंडितांकडे मी थोडे थोडे पाठ घेतले. या पंडितांच्या घरी वेळापत्रक नसे. तुम्ही सकाळी पाठासाठी गेला तर दुपारी, संध्याकाळी केव्हाही पाठ होई. पाठ इतका सोपा असे, सुरेख असे की काही विचारू नका. राजेश्वरशास्त्री द्रविड नुकतेच ‘न्यायाचार्य’ झाले होते. त्यांचा पाठ अतिशय कठीण असे. ते त्रिखंडपंडित मानले जातात; पण वामाचार्य भट्टाचार्यांकडे गेल्यानंतर मला फार समाधान झाले.

काशीत मी तीन वर्षे राहिलो; पण उन्हाळ्यात वाईत येत असे. काशीला मी नियमाने पाठ आणि शास्त्रार्थ ऐकत असे. नियमाने एका गुरूकडे राहिलो नाही. काशीला संस्कृत महाविद्यालय होते; पण मी तिथे गेलो नाही. वरील गुरुजनांकडेच शिकत राहिलो. न्याय, वेदांत, व्यत्पत्ती, व्याकरण या सर्वांचा शाब्दबोध व्यवस्थित रीतीने झाला. वेदांताचाही शास्त्रार्थ मी केलेला आहे. तो आचार्य नित्यानंद पर्वतीयशास्त्री यांच्याकडे केला. त्यांना मराठी येत होते. काशीच्या मराठी मोहल्ल्यात ते राहात. पंचानन तर्करत्न भट्टाचार्य बौद्धन्याय, जैनन्याय शिकवत. दुसरे एक भंडारीशास्त्री होते. तेही न्यायाचार्य होते. मी या दोघांकडे न्यायासाठी जात असे. मग त्यांचे गुरू वामाचार्यांकडे काही काळ शिकलो. ‘पञ्चालक्षणी’, ‘चतुर्दशलक्षणी’, ‘सिद्धान्तलक्षण’ त्यांच्याकडे शिकलो. दुसरे महामहोपाध्याय पंत होते. ते परिणतप्रज्ञ पंडित होते. मी काही प्रश्न घेऊन त्यांच्याकडे जात असे. काशीची अशी प्रथा होती की, ते पाठ आटोपला की, चर्चेला मोकळे असत. ते अगदी प्रसन्नपणे चर्चा करीत असत. महामहोपाध्याय पंत पूर्वमीमांसक, वेदांती आणि वैय्याकरणीही होते. मी शब्दप्रामाण्य, वेदाचे अपौरुषत्व इत्यादींविषयी त्यांच्याशी चर्चा करी. ते वेद अपौरुषेय मानत, अनादि- सिद्ध मानत. काही प्रश्न तर्काने तर काही श्रद्धेने सुटतात, असे यांचे मत होते.

पाठ पूर्ण झाल्यावर कलकत्त्याच्या ‘तर्कतीर्थ’ पदवीची माध्यमिक परीक्षा अगोदर दिली. नंतर अंतिम परीक्षा १९२२ ला दिली. माझ्यापाशी तर्कतीर्थ प्रमाणपत्र आहे. कोणती तरी पदवी पाहिजे म्हणून मी ती मिळविली. केवळ पदवीकरिता शिकायचे असते, तर मी तिथेच राहून सात-आठ पदव्या मिळविल्या असत्या; पण माझे तिकडे लक्ष नव्हते.

काशी, कलकत्त्याचे पदवी शिक्षण पूर्ण करून मी प्राज्ञपाठशाळेत अध्यापक म्हणून रुजू झालो. सन १९२२-२३ ते १९३० पर्यंत शिकवीत होतो. माझे शिकविण्याचे तीन पर्याय झाले. मी अलंकारशास्त्र, न्याय आणि वेदांत शिकवीत असे. पूर्वमीमांसाही मी काही काळ शिकविली आहे. गोस्वामी पांडुरंगशास्त्री, तर्कतीर्थ रघुनाथशास्त्री कोकजे हे माझे विद्यार्थी, शिवाय बळवंतराव खरे, मिरजेचे प्रसिद्ध गायक महादेवशास्त्री, संगीत शिक्षक रावजी जोशी असे अनेक माझे विद्यार्थी होत.

याच काळात मी अनेक धर्मसभा, पंडित परिषदा इत्यादींमध्ये शास्त्रार्थ केले. ७०० पंडितांच्या उपस्थित सन १९२९ला अखिल भारतीय ब्राह्मण परिषद, काशी येथे शास्त्रार्थ केला; पण उपस्थित सर्व सनातनी मतांचे होते. सुधारणावादी मत मांडणारा मी एकटाच होतो. हिंदुधर्मशास्त्रामध्ये धर्मसुधारणेस अनुकूल शेकडो आधार मी शोधून काढले. शास्त्राद्वारे धर्मसुधारणेचा व समाजसुधारणेचा प्रचार करू लागलो. जन्मभर अविवाहित व पवित्र राहण्याचा माझा विचार होता, परंतु गुरुवर्यांनी हा विचार सोडून देण्याचा सल्ला दिला व तो मी मानला.’

डॉ. सुनीलकुमार लवटे

drsklawate@gmail.com