‘मुले सज्ञान झाल्यावर स्वतंत्रपणे व्यवसाय करतात’ हे अजित पवारांचे वक्तव्य व त्यापाठोपाठ ‘मुले सज्ञान झाली तरी आज्ञाधारक असावीत’ ही नारायण राणेंची प्रतिक्रिया गाजल्यानंतर अचानक एक कागद राजकीय वर्तुळात वेगाने ‘व्हायरल’ होऊ लागला. तो वाचायला मिळावा म्हणून सामान्यांसोबतच नेतापुत्रही एकमेकांना फोन करू लागले.
‘आज्ञाधारक नेतापुत्रांसाठी नियमावली’ असे शीर्षक असलेल्या त्या कागदावरचा मजकूर होता- ‘पुण्यातील प्रकरणापासून धडा घेऊन राजकारणाच्या भरवशावर व्यवसाय करू इच्छिणाऱ्या नेतापुत्रांनी खालीलप्रमाणे काळजी घ्यावी. वडिलांना वेळ नसल्याने शहरातील मोक्याच्या ठिकाणचे मोकळे भूखंड एकट्याने वा चार मित्रांना सोबत घेऊन शोधले तरी हरकत नाही. एकदा भूखंडावर नजर स्थिर केल्यावर त्यासंदर्भातील शासकीय कागदपत्रे स्वबळावर शोधण्याचा प्रयत्न करू नये. आधी वडिलांना माहिती द्यावी. तो भूखंड ज्या विभागाशी संबंधित असेल त्या विभागाची आढावा बैठक घेण्याची गळ वडिलांना घालावी. अर्थात त्या बैठकीचा अधिकृत अजेंडा वेगळा असेल. त्यावरची चर्चा संपल्यानंतर वडिलांनी अधिकाऱ्यांसमोर त्या भूखंडाचा विषय काढताच त्यांच्या सल्ल्याने बैठकीत प्रवेश करावा. अधिकारी काय म्हणतात ते न बोलता ऐकून घ्यावे. मध्येच बोलून भूखंडात रुची दाखवू नये. पूर्ण माहिती कळल्यावर हवी तशी कागदपत्रे तयार करून घेण्यासाठी त्या अधिकाऱ्यांशी स्वतंत्रपणे संपर्क साधू नये.
वडिलांच्याच कार्यालयातून सर्व व्यवहार होईल याची काळजी घ्यावी. आपल्यापेक्षा वडिलांचा ‘अनुभव’ जास्त आहे हे कायम लक्षात ठेवावे. वडिलांनी एखाद्याला भागीदार कर म्हटले तर त्याचे पालन निमूटपणे करावे. माझाच मित्र भागीदार हवा असा हट्ट धरू नये. भूखंड घेण्यास हरकत नाही असा निर्णय वडिलांनी दिल्यानंतर त्यावरचे शासकीय शुल्क माफ करण्यासाठी मंत्रालयात स्वत: खेटे मारू नयेत. हे काम वडिलांच्याच कार्यालयामार्फत होईल यासाठी सामान्य कार्यकर्त्यांप्रमाणे पाठपुरावा करावा. भूखंड लाटणे कायद्याच्या चौकटीत कसे बसेल यासाठी तज्ज्ञांचा सल्ला एकट्याने घेतला तरी हरकत नाही पण त्या तज्ज्ञाची वडिलांशी एकदा तरी भेट घालून द्यावी. मुख्य म्हणजे त्या तज्ज्ञाने मागितलेले शुल्क कुरकुर न करता द्यावे. नेतापुत्र असल्याने सारेच फुकटात हवे ही वृत्ती त्यागावी. आपले काम होईपर्यंत अगदी सावलीसारखे वडिलांच्या सोबत असावे. मी तर त्यांचा मुलगा म्हणून इतर कार्यकर्त्यांना बाजूला सारत पुढेपुढे करू नये. दौरा, कार्यक्रमात सर्वात शेवटी उभे राहावे. हा किती सालस, सज्जन व आज्ञाधारक अशी प्रतिमा निर्माण होईल याची काळजी घ्यावी. राजकारणातले फार कळते असा आव आणू नये. भूखंड कुणाला हवा हे गुपित कळलेल्या सरकारी अधिकाऱ्यापासून दूर पळावे. त्या वेळी माझा काय संबंध असा आविर्भाव चेहऱ्यावर आणावा. एवढे करूनही भूखंड वा कंत्राट मिळाल्यावर माध्यमांनी वाद उभा केलाच तर मुलाने काय केले ते मला ठाऊक नाही अशी भूमिका वडिलांनी घेतल्यावर शांत राहावे. अजिबात चिडचिड करू नये. आज्ञाधारकपणाचे हेच खरे लक्षण हे ध्यानात ठेवावे’
नियमावलीचा हाती पडताच आनंदलेल्या राणेंनी दोन्ही मुलांना हाक मारली पण दोघांपैकी कुणीही समोर आले नाही. दुसरीकडे दादांनी हे वाचताच लगेच पार्थला बोलावून घेत ‘कळले ना तुला आता कसे राहायचे ते’ असे सुनावले. त्यावर ‘याच नियमावलीनुसार तर वागलो’ असे उत्तर पार्थच्या तोंडावर आले पण बोलण्याचे धाडस झाले नाही.
