कोणताही जातिवंत लेखक त्याचा काळ जणू खिशात घेऊन जगत असतो. आपल्या काळामधले इतरांना सहजपणे न जाणवणारे जगणे टिपत समकालाचा आरसा दाखवणे हे आपले जीवितकर्तव्यच आहे, असे त्याला नुसते वाटत नसते, तर ती त्याची जगण्याची भूमिकाच असते. ९३ वर्षे जगून नुकतेच निवर्तलेले अमेरिकी लेखक जॉन बार्थ यांनीही हे काम चोख केले असणार यात शंकाच नाही. कारण त्यांचे वर्णन त्यांच्या हयातीतच पोस्ट मॉडर्निझम अर्थात उत्तर आधुनिकतावादाचा ‘पोस्टर बॉय’ असे केले गेले होते. १९३१ चा जन्म आणि वयाच्या पंचविशीतच १९५६ मध्ये ‘द फ्लोटिंग ऑपेरा’ या कादंबरीपासून सुरू झालेले लेखन आणि त्यानंतर लगेचच ‘द एंड ऑफ द रोड’, ‘द सॉट वीड फॅक्टर’ ही आणि ‘गिल्स गॉट बॉय’ ही कादंबरी.. त्यांना दिले गेलेले उत्तर आधुनिकतावादाचे प्रणेते हे बिरुद हे सगळे पाहता जॉन बार्थ यांनी आपल्या काळाशी प्रामाणिक राहून काय लिखाण केले असेल याचा अंदाज करता येतो. त्याबरोबरच मेटाफिक्शनल फिक्शन काल्पनिकतेतील काल्पनिकता या संकल्पनेच्या हाताळणीसाठीही जॉन बार्थ ओळखले जातात. कथा आणि कादंबरी लेखनात त्यांनी केलेले वेगवेगळे प्रयोग आजही महत्त्वाचे मानले जातात.

त्यांचा जन्म केंब्रिजमध्ये एका हलवायाच्या घरात झाला होता. त्यांना संगीताच्या क्षेत्रात काहीतरी करून दाखवायचे होते. पण तरुण वयात त्या क्षेत्रात वावरताना कुणाबरोबर तरी झालेल्या काहीतरी वादाचं निमित्त झालं आणि ते बाल्टिमोरला जॉन हापकीन विद्यापीठात पत्रकारिता शिकायला गेले. पण ते शिकून झाल्यानंतर त्यांनी पत्रकारिता

न करता इंग्रजीचे अध्यापन सुरू केले आणि नंतरच्या दीर्घ आयुष्यात तेच त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन ठरले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘गिल्स गॉट बॉय’ या त्यांच्या कादंबरीत एक तरुण एका शेतावर बकऱ्यांच्या कळपाबरोबर वाढतो.  पण नंतर त्याला स्वरूपाची जाणीव होते आणि तो एका मानवतेच्या महत्त्वाच्या कामात स्वत:ला झोकून देतो. तर  ‘द सॉट वीड फॅक्टर’ या कादंबरीचे शीर्षक ‘व्हॉयेज टू मेरीलॅण्ड’ या कवितेतून घेतले आहे. १६८० आणि  ९० चे दशक अशा काळात तिचे कथानक फिरत राहते. मेरीलॅण्डच्या वसाहतीत राहणाऱ्या तंबाखूच्या मळ्याच्या मालकाच्या मुलाची, एबेनेझर कूकची कहाणी सांगणाऱ्या कादंबरीने वसाहतवादावर  केलेली टिप्पणी हे तिचे महत्त्वाचे वैशिष्टय़ आहे. ती जॉन बार्थ यांची  सगळ्यात महत्त्वाची साहित्यकृती मानली जाते. ‘लॉस्ट इन द फनहाऊनस’ या त्यांच्या कथासंग्रहालाही वाचक आणि समीक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता.