इटालियन फॅशन डिझायनरांकडे जगाचा किती ओढा असतो, याचा प्रत्यय रॉबेर्तो कावाली यांच्या निधनानंतर, शुक्रवारी आला. वयाच्या ८३ व्या वर्षी झालेल्या या निधनाची बातमी तर जगभरच्या प्रसारमाध्यमांनी दिलीच, पण मुंबईतल्या एका इंग्रजी दैनिकाने (‘इंडियन एक्स्प्रेस’ नव्हे!) या रॉबेर्तो कावालींचे नसलेले श्रेयही त्यांना देऊन टाकले.. म्हणे, ‘स्ट्रेच डेनिम’चे उद्गाते रॉबेर्तो कावाली होते! वास्तव असे की, १९७८ मध्ये ब्रिटिश डिझायनर पीटर गोल्डिंग यांनी ‘स्पॅन्डेक्स’चा स्थितिस्थापक धागा वापरून स्ट्रेच डेनिम पहिल्यांदा घडवली आणि १९८२ नंतर स्पॅन्डेक्सऐवजी ‘लायक्रा’ वापरून इटालियन डिझायनर एलिओ फिरूची यांनी तिचे सार्वत्रिकीकरण केले. तरीही रॉबेर्तो कावाली यांना याच ‘स्ट्रेच डेनिम’चे श्रेय कसे काय? अंगप्रत्यंगासरशी घट्ट बसणाऱ्या या जीन्सना फाडण्याचीही कारागिरी फिरूची यांचीच.. पण रॉबेर्तो कावाली त्यापुढे गेले. फाडलेल्या स्ट्रेच डेनिम वस्त्रप्रावरणांवर मणी, भरतकाम असे काहीकाही करून त्यांना नवा बाज त्यांनी दिला. पण हे झाले मर्यादित यश. रॉबेर्तो कावाली यांचे अमर्याद यश आणि त्यांची खरी ओळख निराळीच होती.

वाघ, चित्ता आदी प्राण्यांच्या अंगावरले पट्टे अथवा ठिपके यांचा मुबलक वापर, ही रॉबेर्तो कावाली यांची आजच्या फॅशनला खरी देणगी! केवळ स्त्रीपुरुषांची वस्त्रप्रावरणेच नव्हे तर पोहण्याचे पोशाखही त्यांनी वाघ/ चित्ता/ बिबळय़ा/ झेब्रा आदींच्या डिझाइनचे केले. घरातले पडदे, पलंगपोस, टॉवेल, टॉवेलासारख्याच कापडापासून बनवलेला ‘बाथ रोब’ यांवर त्यांनी हे चट्टेपट्टे किंवा ठिपके आणले. ‘जे जे नैसर्गिक ते मला भावतेच’ वगैरे काहीबाही विधाने करून प्रसारमाध्यमांत भाव खाऊन जाणाऱ्या रॉबेर्तो कावाली यांच्या या वस्त्रांना अवाच्यासवा किंमत असूनही  तुफान प्रतिसाद मिळाला तो काय त्यांच्या ग्राहकांचे निसर्गप्रेम अचानक उफाळून आले म्हणून मिळाला असेल का? नक्कीच नाही, अशी साक्ष त्यांची ती वस्त्रे देत होती आणि देत राहातील. बडय़ा धनिकांनी या कपडय़ांना पसंती दिली ती निसर्गप्रेमामुळे नव्हे तर लैंगिक आचारस्वातंत्र्याकडे ओढा असल्यामुळे, हे रॉबेर्तो कावाली यांच्या त्या ‘निसर्गप्रेमी’ पट्टे आणि ठिपक्यांनी शरीराच्या कोणत्या भागांकडे अधिक लक्ष पुरवले, यातून समजत राहील. पण हे सारे उच्छृंखल मानायचे नाही, तर मानवी प्रवृत्तींना सर्जनशीलतेचा प्रतिसाद म्हणून त्याचा आदर करायचा, ही सभ्यता फॅशन इंडस्ट्रीकडे नेहमीच असते.. त्या क्षेत्रातील तज्ज्ञ- समीक्षकांनी या डिझाइन्सकडे पाहिले ते रॉबेर्तो कावाली यांच्या ‘मॅग्झिमलिस्ट’ किंवा उधळणवादी शैलीचा भाग म्हणून. चमकत्या टिकल्या, मणी, भरतकाम यांपेक्षा निराळा आणि स्वत:चा असा टप्पा रॉबेर्तो कावाली यांनी या वाघ/ चित्ते/बिबळय़ामय डिझाइनमुळे गाठला, यासाठी फॅशनच्या इतिहासात त्यांची नोंद कायम राहील.

More Stories onफॅशनFashion
मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta vyaktivedh roberto cavalli italian fashion design stretch denim british designer amy
First published on: 15-04-2024 at 04:28 IST