‘कराओके बार’, ‘कराओके मंडळ’, ‘कराओके स्पर्धा’ आणि आता तर मोबाइलवरचे ‘कराओके अ‍ॅप’ असा कराओकेचा सुळसुळाट झालेला आहे- कुणीही उठावे, हाती माइक घेऊन ‘कराओके’ लावावे आणि आपापली आवडती गाणी सुसह्य संगीताच्या साथीने, पण आपापल्या आवाजात गात सुटावे याचा हल्ली तर त्रासही काहीजणांना होऊ लागलेला आहे; अशा काळात या ‘कराओके’चे मूळ शोधक शिगेइची नेगिशि यांच्या निधनाची बातमी आली.. कराओकेचा हा कर्ता-करविता जिवंतपणी जितका अज्ञात, प्रसिद्धीपराङ्मुख होता तितकाच मृत्यूनंतरही राहिला असता, पण २६ जानेवारी रोजी झालेल्या या निधनाची बातमी अखेर गेल्या आठवडय़ात पाश्चात्त्य वृत्तपत्रांतून आली. हे नेगिशिसान वयाच्या शंभराव्या वर्षी, तीन मुले- पाच नातवंडे- आठ पतवंडे आणि अगणित गाणी मागे सोडून निवर्तले.

गाण्याची, गुणगुणण्याची आवड त्यांना होती, त्यातूनच तर या ‘कराओके’चा खटाटोप त्यांनी १९६७ मध्ये केला होता. तेव्हा ते होते पंचेचाळिशीचे. जपानमधल्या तशा सुखवस्तू कुटुंबात ते वाढले, विद्यापीठातही गेले, पण ऐन अठराव्या वर्षी दुसऱ्या महायुद्धापायी त्यांना जपानी सैन्यात जावेच लागले. युद्ध संपल्यावर ट्रान्झिस्टर-रेडिओ जुळणीचा छोटासा उद्योग त्यांनी सुरू केला, १९६० च्या दशकात कॅसेटसारख्याच ‘काट्र्रिज टेप’ मोटारीतही वाजवता येणारे छोटे डेक प्लेयर ते जुळवत आणि विकत. यातून या टेपच्याही अंगोपांगाची माहिती त्यांना होत होती. व्यवसाय गाजला नाही, पण गुणगुणत चालू होता.. अशा वेळी एकदा सहकारी मित्राच्या थट्टामस्करीतून ‘संगीतसाथ असेल तर मीही अस्साच गाऊ शकतो म्हटलं’ हे आव्हान त्यांनी स्वीकारले! मायक्रोफोन, टेप डेक आणि स्पीकर यांच्या जुळवाजुळवीचे जुगाड त्यांनी केले आणि आपल्या हेमंतकुमारसारख्या आवाजाचा जपानी गायक योशिको कोडामा याच्या ‘मुजो नो युमे’ या गाण्याचे सूर नेगिशि यांच्या आवाजात, पण मूळ संगीतासह निनादले!

supreme court
राज्यातील खारफुटीच्या जंगलातून गॅस पाइपलाइन टाकण्याचं प्रकरण, सर्वोच न्यायालयाकडून प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश
bachchu kadu
“तुला माझ्याशिवाय कोणी दिसत नाही? रात्री स्वप्नात येईन अन्…”, बच्चू कडूंचा रवी राणांना टोला
नात्यातील ताण्याबाण्यांची गंमत
jitendra awhad marathi news, lucky compound building collapse marathi news
“लकी कंपाऊंड दुर्घटनेनंतरही अधिकाऱ्यांनी शिकायला हवे होते, पण…”, आमदार जितेंद्र आव्हाड यांची पालिका अधिकाऱ्यांवर टीका

हा निनादानंद इतरांपर्यंतही पोहोचावा, यासाठी ते मायक्रोफोन, टेप डेक आणि स्पीकरचे तिळे जुगाड अधिक आटोपशीर करून एक यंत्रच बनवून टाकले नेगिशिंनी. अगदी दारोदार नाही पण दुकानोदुकानी जाऊन ते विकलेसुद्धा स्वत:च. अशी आठ हजार यंत्रेच त्यांनी विकली, कारण औद्योगिक उत्पादनासाठी लागणारे ‘पेटंट’ त्यांनी ‘कोण करणार मगजमारी’ यासारख्या विचारातून घेतलेच नाही. १९७१ मध्ये अमेरिकेत हे असेच यंत्र तयार करणाऱ्या दाइसुके इनोऊ या तरुणाचे नाव मात्र ‘कराओके संशोधक’ म्हणून माहीत झाले.. चार वर्षांपूर्वीच स्वत:च्या आवाजात गाऊनही, शिगेइची नेगिशि मात्र गुणगुणतच राहिले, हे त्यांच्या निधनापेक्षाही अधिक चुटपुट लावणारे.