‘कराओके बार’, ‘कराओके मंडळ’, ‘कराओके स्पर्धा’ आणि आता तर मोबाइलवरचे ‘कराओके अ‍ॅप’ असा कराओकेचा सुळसुळाट झालेला आहे- कुणीही उठावे, हाती माइक घेऊन ‘कराओके’ लावावे आणि आपापली आवडती गाणी सुसह्य संगीताच्या साथीने, पण आपापल्या आवाजात गात सुटावे याचा हल्ली तर त्रासही काहीजणांना होऊ लागलेला आहे; अशा काळात या ‘कराओके’चे मूळ शोधक शिगेइची नेगिशि यांच्या निधनाची बातमी आली.. कराओकेचा हा कर्ता-करविता जिवंतपणी जितका अज्ञात, प्रसिद्धीपराङ्मुख होता तितकाच मृत्यूनंतरही राहिला असता, पण २६ जानेवारी रोजी झालेल्या या निधनाची बातमी अखेर गेल्या आठवडय़ात पाश्चात्त्य वृत्तपत्रांतून आली. हे नेगिशिसान वयाच्या शंभराव्या वर्षी, तीन मुले- पाच नातवंडे- आठ पतवंडे आणि अगणित गाणी मागे सोडून निवर्तले.

गाण्याची, गुणगुणण्याची आवड त्यांना होती, त्यातूनच तर या ‘कराओके’चा खटाटोप त्यांनी १९६७ मध्ये केला होता. तेव्हा ते होते पंचेचाळिशीचे. जपानमधल्या तशा सुखवस्तू कुटुंबात ते वाढले, विद्यापीठातही गेले, पण ऐन अठराव्या वर्षी दुसऱ्या महायुद्धापायी त्यांना जपानी सैन्यात जावेच लागले. युद्ध संपल्यावर ट्रान्झिस्टर-रेडिओ जुळणीचा छोटासा उद्योग त्यांनी सुरू केला, १९६० च्या दशकात कॅसेटसारख्याच ‘काट्र्रिज टेप’ मोटारीतही वाजवता येणारे छोटे डेक प्लेयर ते जुळवत आणि विकत. यातून या टेपच्याही अंगोपांगाची माहिती त्यांना होत होती. व्यवसाय गाजला नाही, पण गुणगुणत चालू होता.. अशा वेळी एकदा सहकारी मित्राच्या थट्टामस्करीतून ‘संगीतसाथ असेल तर मीही अस्साच गाऊ शकतो म्हटलं’ हे आव्हान त्यांनी स्वीकारले! मायक्रोफोन, टेप डेक आणि स्पीकर यांच्या जुळवाजुळवीचे जुगाड त्यांनी केले आणि आपल्या हेमंतकुमारसारख्या आवाजाचा जपानी गायक योशिको कोडामा याच्या ‘मुजो नो युमे’ या गाण्याचे सूर नेगिशि यांच्या आवाजात, पण मूळ संगीतासह निनादले!

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta vyaktivedh the original inventor of karaoke shigeichi negishi has passed away amy
First published on: 20-03-2024 at 00:12 IST