scorecardresearch

उलटा चष्मा : मैं हिंदी भाषा बोल रही हूँ..

शिंदेंनी दिल्लीसाठी काही निरोप दिला नाही, याचा अर्थ ते निर्धास्त आहेत असे म्हणत हिंदी ठाण्यातील सत्काराची स्वप्ने रंगवण्यात गढून गेली.

उलटा चष्मा : मैं हिंदी भाषा बोल रही हूँ..
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे फोटो- लोकसत्ता

हिंदी आज खुशीत होती. आतापर्यंत दहादा वाचून झालेले सांस्कृतिक कार्य खात्याचे परिपत्रक तिच्या पुढय़ातच पडले होते. महाराष्ट्रासारख्या देशातल्या प्रगत राज्यातून आपली देशाची राष्ट्रभाषा होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाली याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर झळकत होता. ‘अब दिल्ली दूर नही..’ असे म्हणत तिने एक छानशी गिरकी घेतली.

आता असेच एकेक राज्य पादाक्रांत करत जायचे. तिकडे दक्षिणेत शिरणे जरा कठीणच, पण आपल्याला पुरस्कृत करणाऱ्या पक्षाचे राज्यपाल आहेतच मदतीला. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळेलच कधी तरी. तूर्त तरी हा सन्मान बहाल केल्याबद्दल राज्यकर्त्यांचे आभार मानायला हवे असे मनाशी ठरवत तिने सुधीरभाऊंना फोन लावला. पलीकडून ‘वंदेमातरम’ असा खर्जातला आवाज येताच तेच बोलताहेत याची खात्री पटली व सारेच जेव्हा हा शब्द उच्चारू लागतील तेव्हा आपल्या प्रचार, प्रसाराला हातभारच लागेल असे तिला वाटून गेले.

‘मैं हिंदी बोल रही हूँ। सम्मान देने के लिए धन्यवाद’ असे मधाळ स्वरात म्हणताच भाऊ उद्गारले, ‘ये देखो, वो जीआर गलती के साथ निकल गया, लेकिन हमारे दिल्ली के श्रेष्ठीने बोला की जानबुझकर की गयी गलतियां हमारे पक्ष के लिए बहुत फायदेमंद साबीत होते जा रही है। हमारी भूमिका मात्र कायम है। लेकिन लोगों के लिए हम स्पष्टीकरण भी दे रहे है। लेकिन आप जादा उछलकूद मत करना और अपनी मावस बहन मराठी के साथ अच्छा बर्ताव करना। और हां, दिल्ली में भी धन्यवाद का फोन करके उन्हें ये जरूर बताना की भाऊ की वजह से ये सम्मान मुझे प्राप्त हुआ है।’ फोन कट होताच हिंदीला हसू आले. केवळ या एका फोनने भागणार नाही. शिंदे व फडणवीसांनाही फोन करायला हवा. महादजी शिंदे व नाना फडणवीसांच्या काळापासून आपण मराठीसोबत इथे वावरतो. त्यामुळे या आधुनिक जोडीशी बोलायला हवे असे म्हणत तिने देवेंद्रभाऊंचा नंबर फिरवला. ‘देखो, जो उचित व न्यायपूर्ण है वो करने के लिए हमें कोई रोक नही सकता। हम पार्टी के वफादार सेवक है और पार्टीलाईन के बाहर जाके कोई काम नही करते। आप ये सब बातें दिल्ली में भी बताएगी ऐसी अपेक्षा हम रखते है। आपको शुभेच्छा।’ हे ऐकून तिला सन्मानासोबतच श्रेष्ठींना संदेश पोहोचवण्याची जबाबदारीसुद्धा आपल्यावरच आल्याची जाणीव झाली. सर्वात शेवटी मध्यरात्रीच्या सुमारास तिने थेट शिंदेंना फोन केला. ‘मैं हिंदी बोल रही हूँ’ असे म्हणताच तिकडून आवाज आला ‘देखिए इस में मेरा कोई हात नही है। मेरे बारे में लोग गलत अफवा पसरवते रहते’ त्यांना मध्येच थांबवत तिने सन्मानाच्या धन्यवादासाठी फोन केला असे सांगताच शिंदे खुशीत येत म्हणाले, ‘अरे वा वा बहुत अच्छा हुआ। आप ऐसा करीये, आप हमारे ठाणा मे आइए, मैं पालिका सभागृह में जंगी सत्कार सोहळा का आयोजन करता हू।’ शिंदेंनी दिल्लीसाठी काही निरोप दिला नाही, याचा अर्थ ते निर्धास्त आहेत असे म्हणत हिंदी ठाण्यातील सत्काराची स्वप्ने रंगवण्यात गढून गेली.

मराठीतील सर्व स्तंभ ( Columns ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 20-01-2023 at 05:17 IST

संबंधित बातम्या