वेरळा विकास प्रकल्पाने आपल्या सातत्यपूर्ण समाज परिवर्तन कार्याने महाराष्ट्रात विकासाचा एक प्रतिदर्श (आदर्श) निर्माण केला. प्रतिदर्श (मॉडेल) अनुकरणक्षम असतो. सांगली, पुणे जिल्ह्यात त्याचे कार्य आजही प्रेरक ठरते आहे. ग्रामीण विकासाचे ते ‘ग्रामस्वराज्य’ म्हणून पाहता येते. प्रा. व्ही. एन. देशपांडे आणि प्रा. अरुण चव्हाण यांनी मिळून पूर्वी एकात्म करत असलेले हे कार्य आज दोन स्वतंत्र आस्थापनांखाली सुरू आहे, पैकी सांगलीच्या या प्रकल्पाची जी शाखा आहे, तिने सन १९८८ मध्ये उभारलेल्या आपल्या कार्यालयास ‘गुरुवर्य प्रा. व्ही. के. गोकाक भवन’ असे नाव दिले आहे. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी या समारंभाचे प्रमुख पाहुणे होते. पुढे त्यांच्या ‘नवती महोत्सव’ (नव्वदीपूर्ती)चे औचित्य साधून या संस्थेतर्फे तर्कतीर्थांची मुलाखत प्रा. म. द. हातकणंगलेकर, प्रा. अरुण चव्हाण आणि दत्ता सावळे यांनी घेतली होती. ती कोल्हापूरहून प्रकाशित होणाऱ्या ‘उगवाई’ मासिकाच्या १९९४ च्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झाली होती. गुरुवर्य गोकाक भवनचे उद्घाटनपर भाषण आणि उपरोक्त मुलाखत ‘तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी समग्र वाङ्मय’च्या भाषण आणि मुलाखत खंडात (२ आणि ६) संग्रहित आहे.

मानवी समाजाचा विकास म्हणजे परंपरेकडून परिवर्तनाकडे केलेला प्रवास होय. जे समाजाचे तेच व्यक्तीचे असते. उपरोक्त मुलाखतीत तर्कतीर्थ जे सांगतात ते आत्मकथनास समांतर असे समाजभाष्य आहे. माणसाने विचार प्रतिबद्ध असावे की स्वतंत्र विचारवादी असावे, हा विवाद्या विचार असला तरी प्रबुद्ध व्यक्ती वा समाजनिर्मितीच्या अनुषंगाने कळीचा नि विचारणीय मुद्दा ठरतो. या प्रदीर्घ मुलाखतीत तर्कतीर्थांनी स्पष्ट केले आहे की, परंपरेला धक्के बसले तरच परिवर्तन शक्य होते, अन्यथा नाही. मानव समाज इतिहासबद्ध आहे. तो निरनिराळ्या अवस्थांतून मार्गक्रमण करत विकसित होत असतो. अवस्थांतर व विचारांतर यांचा साकल्याने विचार करीत असताना लक्षात येते की, विचारांचे समग्र आकलन करून विचारमार्ग वा एकच एक विचार आदर्श ठरविता येत नाही.

‘वेद ते वेब’ हा जो मानवी विकास आहे, तो मोक्षपुरुषाकडून धर्मपुरुषार्थाकडे जाणारा आहे. धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे पारंपरिक पुरुषार्थ होत. त्यापलीकडचे जग वर्तमानात अस्तित्वात आले आहे. ते शास्त्राकडून विज्ञानाकडे अग्रेसर आहे. हिंदू, बौद्ध, जैन, इस्लाम, ख्रिाश्चन, पारशी, ज्यू, इत्यादी जगातील जे म्हणून धर्म आहेत, त्यांचे स्वत:चे तत्त्वज्ञान आहे. ते एका अर्थाने माणसास परंपरावादी व प्रतिबद्ध करीत असते. अशीच गोष्ट विविध विचारधारांचीही असते. दैववाद, इहवाद, बुद्धिप्रामाण्यवाद, मार्क्सवाद, रॉयवाद, गांधीवाद, मानवतावाद, नवमानवतावादसारखे विचारवाद मानवी विकास प्रवासात निर्माण होत ते विकसित होत राहतात. तरी कालजयी वा मृत्युंजयी असा सार्वकालिक अथवा कालातीत विचारादर्श माणसास ठरविता आला नाही. याचे कारण मानवी जीवन व संस्कृती परिवर्तनशील असणे हे होय.

प्रतिबद्धशील (कमिटेड) आणि संपर्कशील (कम्युनिकेटेड) अशा दोन विचार ध्रुवांचा प्रवास म्हणजे ही मुलाखत होय. ती मानवी संस्कृतीशास्त्रावर केलेले भाष्य म्हणून महत्त्वाची आहे. संस्कृतीत निर्मिती, विकास, अवनती, ऱ्हास आणि पुनर्निर्माण असे असलेले गतिसातत्य हे विकासचक्र म्हणून अभ्यासता येत असले, तरी ते कोणत्याही तर्काच्या एका टोकावर थांबविता येत नाही. कारण, ते थांबविणे माणसाच्या आकलन व आवाक्याबाहेरची गोष्ट आहे. ‘कायदा पाळा गतीचा, थांबला तो संपला’ हे खरे मानवी विकासाचे सूत्र ही मुलाखत समजावते. या मुलाखतीतून तर्कतीर्थ वेदकाळापासून ते पूर्व-पश्चिम जर्मनीचे ऐक्य, रशियातील क्रांती ते गोर्बाचेव्हचे ग्लासनोस्त नि पेरिस्राोइका, युरोपीय राष्ट्रांची निर्मिती, आफ्रिका खंडाची स्थितीशीलता व परिवर्तन, मानवाचा वंशविकास (सेपियन – होमो सेपियन), तत्त्वज्ञान ते तंत्रज्ञान अशी चर्चा करीत बर्ट्रंड रसेलचा ‘गॉड सेड लेट देअर बी न्यूटन अँड देअर वॉझ ऑल लाइट’पर्यंतचा प्रवास आपल्यापुढे ठेवतात, तेव्हा लक्षात येते की जगात ‘नित्य’ आणि ‘सत्य’ म्हणून काहीच अंतिम असत नाही. सूर्योदय, सूर्यास्त या सर्व सापेक्ष घटनाक्रमाचा भाग आहेत. त्यामुळे पारंपरिकतेकडून परिवर्तनाकडे हाच सृष्टी व संस्कृतीचा खरा नियम आहे.