सार्वजनिक जीवनात वावरताना काही पथ्ये पाळावी लागतात तसेच संयम महत्त्वाचा असतो. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांची शैली यापेक्षा वेगळी. समाजमाध्यमांतून विरोधी लिखाण करणाऱ्याला सहकाऱ्यांकरवी मारहाण केल्याबद्दल गुन्हा व मंत्रिपदी असताना प्रतीकात्मक अटक होण्याची वेळ आव्हाड यांच्यावरच आली होती. गेल्याच आठवडय़ात निमित्त झाले ते ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा खेळ बंद पाडताना प्रेक्षकांना धक्काबुक्कीचे. बरे या प्रेक्षकाचा दोष काय, तर त्याने चित्रपट बंद पाडता तर आमचे पैसे परत करा, अशी भूमिका मांडली होती. त्यासाठी आव्हाड समर्थकांनी या प्रेक्षकालाच धरले. इतिहासाचे चुकीचे दाखले दिल्याबद्दल ‘हर हर महादेव’ चित्रपटाबद्दल कोल्हापूरच्या छत्रपती संभाजीराजे यांनी हे खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा दिला. संभाजीराजे यांच्या या इशाऱ्याची त्यांच्या कोल्हापूरमध्येही वा ते नेतृत्व करीत असलेल्या मराठा समाजातही तात्काळ फार काही प्रतिक्रिया उमटली नव्हती. पण जितेंद्र आव्हाड यांचे इतिहासप्रेम जागृत झाले. संभाजीराजेंच्या इशाऱ्यानंतर लगेच ठाण्यातील एका मॉलमधील चित्रपटगृहात घुसून आव्हाड व त्यांच्या समर्थकांनी चित्रपटाचा खेळ बंद पाडला. मंत्रिपद भूषविलेल्या आव्हाड यांच्या समक्ष त्यांचे समर्थक प्रेक्षकांनाच धाकदपटशा करत असताना, ते हाताची घडी घालून शांतपणे उभे असल्याची दृश्ये समाजमाध्यमांतून सर्वदूर गेली आणि त्यातून, आव्हाड यांचे या प्रकाराला मूक समर्थनच होते, असा समजही पसरला. याप्रकरणी अटक झाल्यावर नियमानुसार त्यांच्यासह ११ जणांना जामीनही मिळाल्याने, अटकेमागे राजकारण असल्याच्या चर्चेला वाव उरला नाही. सुटकेनंतरही इतिहासाचे विकृतीकरण सहन करणार नाही, असा इशारा आव्हाड यांनी दिला. विद्रूपीकरण होत असल्यास ते चुकीचेच. त्याचबरोबर इतिसाहाच्या विकृतीकरणाच्या मुद्दय़ावर कोणीही, कोणत्याही प्रकारे तेढ निर्माण करण्याचा प्रयत्नही असमर्थनीय ठरतो. इतिहासावर आधारित चित्रपट निर्माण करणारे निर्माते, संभाजीराजे किंवा आव्हाड साऱ्यांनीच सामाजिक ऐक्य यातून बिघडणार नाही याची खबरदारी घेणे आवश्यक होते आणि आहे.

आव्हाड यांच्या अटकेनंतर त्या परिसराच्या पोलीस उपायुक्तांची बदली झाली. ही बदली प्रशासकीय बाब पण त्याला वेगळा रंग देण्यात आला. वास्तविक बदली झालेल्या उपायुक्तांना वाहतूक विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली. ठाण्यात वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्तपद सर्वार्थाने महत्त्वाचे मानले जाते. त्या अधिकाऱ्याला शिक्षाच द्यायची असती तर अन्य कोणत्या तरी अडगळीतील पदावर नियुक्ती झाली असती. मुळात राज्यभरातील शंभरावर पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या अलीकडे झाल्या, तेव्हा ठाण्यातील काही अधिकाऱ्यांच्या बदल्यांना स्थगिती मिळाली होती ती प्रक्रिया आता सुरू झाली, इतकेच. परंतु या बदलीचा संबंध आव्हाड यांच्या अटक व सुटकेशी जोडणारे वृत्तांकन प्रसारमाध्यमांनी – विशेषत: काही चित्रवाणी वाहिन्यांनी- आरंभले!

tuberculosis marathi news, tuberculosis genetic sequencing marathi news
क्षयरोग उपचारामध्ये जनुकीय क्रमनिर्धारण महत्त्वपूर्ण, औषध प्रतिरोधकातील बदल समजण्यासाठी मदत
Loksabha Election 2024 Last 72 hours most crucial during elections
मतदानापूर्वीचे ३ दिवस का महत्त्वाचे असतात? काय असते प्रक्रिया?
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…

केवळ इतिहासाच्या मोडतोडीबद्दल बोलून, आव्हाड यांच्या चित्रपट बंद पाडण्याच्या कृतीचे राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी मूक समर्थन केले. इतिहासाच्या विकृतीकरणाची भलामण कुणीही करू नयेच, पण या वादाच्या निमित्ताने वर्तमानाचे जे विकृतीकरण दिसून आले, तेही निश्चितपणे अस्वस्थ करणारेच आहे.