‘तु तु तू..  तुतु तारा’ हे हिंदी गाणे ज्यांना ‘उगाचच आठवू शकते, पण आवडत नाही’- त्यांना संगीत कळते, असे प्रमाणपत्र तमिळ रसिकांकडून नक्की मिळेल! याचे कारण या गाण्याची मूळ चाल इलयाराजा यांनी संगीत दिलेल्या ‘दलपती’ (१९९१) या तमिळ चित्रपटातील ‘रक्कम्मा कय्यि तट्ट’ या गाण्याची.. त्या मूळ तमिळ चालीत साधीशी नाटय़मयता आहेच, पण  एस. पी. बालसुब्रण्यम यांच्या आवाजातून या चालीची नजाकतही भिडते. मग १९९२ मधल्या ‘बोल राधा बोल’मध्ये हिंदीत मात्र टारगट आणि स्वस्त वाटते. 

तो दोष इलयाराजांचा नसतो, पण हिंदीतली अत्याचारग्रस्त चालसुद्धा आठवणारी ठरते, यामागची पुण्याई इलयाराजांचीच! या इलयाराजांचा ८० वा वाढदिवस शनिवारी तमिळनाडूने साजरा केला.. केवळ त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी भेट घेऊन अभीष्टचिंतन केले म्हणून नव्हे, तमिळ वृत्तपत्रांनी लेख लिहिले, वृत्तवाहिन्यांनी विशेष वार्ताकन केले.. समाजमाध्यमांतून शुभेच्छांचे पाट वाहिले, घरोघरी इलयाराजांची गाणी वाजली.. राज्यसभेचे खासदार म्हणून इलयाराजांची नियुक्ती राष्ट्रपतींनी केल्याची घोषणा खुद्द मोदी यांनी २०२२ च्या जूनमध्ये करणे, त्याआधी गेल्या एप्रिलमध्ये मोदी यांचे प्रसिद्धीयंत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका कंपनीने काढलेल्या ‘आंबेडकर अ‍ॅण्ड मोदी’ या पुस्तकाची प्रस्तावना इलयाराजांनी लिहून आंबेडकरांच्या संकल्पना मोदी साकार करताहेत अशी विधाने करणे.. यातून इतके वाद निर्माण झाले होते की तमिळनाडूत इलयाराजांची लोकप्रियता घटते की काय, अशी स्थिती होती. पण ऐंशीव्या वाढदिवसाने जणू या वादांनाही पूर्णविराम दिला. ती प्रस्तावना लिहिण्यासाठी इलयाराजांनाच निवडण्यामागचे कारण म्हणजे ‘ते दलित आहेत’ हे सत्ताधाऱ्यांना माहीत असणे! वास्तविक इलयाराजांचे नाव कोणे एकेकाळी आर. ज्ञानदेशिकन होते, वगैरे तपशीलही आता विकिपीडियापुरते उरले असून ते कुणाला आठवतही नाहीत. वयाच्या २५ व्या वर्षीपासून ते संगीतकार म्हणून – आणि म्हणूनच- परिचित झाले. त्यामुळे आठवते ते फक्त त्यांचे संगीत.. त्यागराजांच्या कर्नाटक संगीतीय शिस्तीला तमिळ लोकगीतांच्या रगेलपणाची जोड देणारे आणि त्याहीपलीकडे जाऊन, विदेशी वाद्यमेळाचा निव्वळ वापर न करता स्वत: सिम्फनी तयार करणारे संगीत! इलयाराजांच्या तमिळ चालींची हिंदी, तेलुगू, मल्याळम् रूपे किती झाली याला गणतीच नाही.

What Kishori Pednekar Said About Raj Thackeray ?
किशोरी पेडणेकरांची राज ठाकरेंवर टीका; “दात पडलेला, नखं काढलेला, शक्तीहीन वाघ लोकांना..”
Rohit Pawar Post Against Raj Thackeray
“तंबाखूच्या पुडीवर ‘आरोग्यास हानिकारक’ असं..”, राज ठाकरेंनी महायुतीला पाठिंबा दिल्यावर रोहित पवारांची पोस्ट
Raj Thackerey teaser
VIDEO : राज ठाकरे- अमित शाह यांच्या बैठकीत काय ठरलं? शिवतीर्थवरून मिळणार उत्तर, पाहा पाडवा मेळाव्याचा टीझर!
chirag paswan interview
काका-पुतण्यांमधील राजकीय लढाईचा अंत? काय म्हणाले चिराग पासवान?

‘आय मेट बाख इन माय हाउस’ किंवा ‘मॅड, मॅड फ्यूग’ या इलयाराजांच्या संगीतरचना कुठल्याही भाषेत नाहीत- संगीत हीच त्यांची भाषा. त्यामुळे सुमारे अडीचशे वर्षांपूर्वी योहान सॅबेस्टिन बाखने रचलेल्या ‘फ्यूग इन डी मायनर’ची संगीतवेणी उलगडून, इलयाराजांनी स्वत:च्या पद्धतीने पुन्हा विणली किंवा लंडनच्या ‘रॉयल फिलहार्मोनिक ऑर्केस्ट्रा’कडून स्वत:ची सिम्फनी वाजवून घेणारे ते पहिले आशियाई ‘मॅस्ट्रो’ ठरले. सिम्फनीच्या पाच टप्प्यांवर राज्य करून झाल्यावर कर्नाटक संगीताची परंपरा पुढे नेणारा ‘पंचमुखी’ हा नवा रागही त्यांनी निर्माण केला. संगीताचा ‘सेन्गोल’ अद्याप इलयाराजांकडेच असल्याचे त्यांच्या ८० व्या वाढदिवसाने सिद्ध केले, इतकेच.