तीर्थस्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या प्रयागराज शहरामध्ये अवघ्या २२ दिवसांत जे सहा कमी क्षमतेच्या गावठी बॉम्बचे स्फोट झाले, त्यांत नुकसान फार झाले नाही वा एकदोघेच जण जखमी झाले हे खरे; पण या बॉम्बस्फोटांच्या तपासाला उत्तर प्रदेशच्या पोलिसांकडून वेग काही येत नव्हता, हेही खरे. २५ जुलै रोजी घडलेल्या सहाव्या स्फोटानंतरच ११ जण पकडले गेले आणि त्यांपैकी दहा जण १५ ते १७ या वयोगटातील असल्यामुळे त्यांना बाल- सुधारगृहात ठेवण्यात आले. आम्हीच बॉम्ब बनवले, हे या ११ जणांनी प्राथमिक चौकशीत कबूल केले आहे. मिसरूडही फुटली नसताना बॉम्ब हाताळणारे मुलगे अफगाणिस्तान, पाकिस्तान किंवा तत्सम इस्लामी देशांमध्ये असतात हे पाश्चात्त्य चित्रवाणी वाहिन्यांमुळे आपल्याला माहीत असते, पण आपल्या उत्तर प्रदेशासारख्या अत्यंत प्रगतिशील राज्यात आपापल्या वयांच्या दहाव्या-बाराव्या वर्षीपासून ‘योगी राज’चा अनुभव घेणारे हे मुलगे तसले नव्हते. या सर्वाचे आईवडील सभ्य, सुविद्य आणि सुखवस्तूही आहेत, त्यामुळेच हे सारे ११ बाल-आरोपी नामांकित इंग्रजी शाळांमध्ये शिकत होते. अनेक सुविद्य कुटुंबांना राजकारणाशी आपला संबंध नसल्याचा अभिमान असतो, तो या मुलांच्यातही झिरपला असेल. पण म्हणून शत्रू शोधण्याच्या खेळापासून ते काही दूर राहिले नाहीत. त्यांनी त्यांच्या पद्धतीने शत्रू शोधले, बॉम्बफेकीसारखे पाऊलही त्या ‘शत्रू’ला धडा शिकवण्यासाठी उचलले. ‘इम्मॉर्टल ग्रूप’ चा शत्रू ‘तांडव ग्रूप’, पण ‘राम दल’ हा अशाच विद्यार्थ्यांचा समूहसुद्धा ‘तांडव’चा शत्रूच. याखेरीज ‘माया’ हा समूह आणि ‘बिच्छू’ समूह हे एकमेकांचे शत्रू. या विद्यार्थ्यांनी आपापल्या मोबाइलवरील इन्स्टाग्राम तसेच फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅप वापरून हे समूह बनवले आणि वाढवले. मोबाइल हाच फावल्या वेळात हिंसक व्हिडीओ गेमसारखा विरंगुळाही देतो.‘स्टार ओशन’ या  हिंसक गेम- मालिकेतला नायक ‘रेमंड लॉरेन्स’ (सोबतचे चित्र पाहा) हादेखील पौगंडावस्थेतलाच. त्याच्या ‘लॉरेन्स’ या नावाचा एक विद्यार्थी-समूह प्रयागराजमध्ये आहे! सुखवस्तू घरांमधल्या, हवा तो मोबाइल फोन ज्यांना पालक देतात अशा मुलग्यांचे असे समूह असणे हे फार नवेही नाही म्हणा.. मागे २०२० साली दक्षिण दिल्लीत ‘बॉइज कॉमन रूम’ या मोबाइल-आधारित समूहाने स्वत:च्याच वर्गातील मुलींचे नकोशा अवस्थेतील चित्रीकरण करून त्याचे ध्वनिचित्रमुद्रण सर्वदूर पसरवण्याचा उपद्वय़ाप केला होता. उत्तर प्रदेशातील मुले याच्या पुढे गेली आणि हिंसक खेळ खेळून शत्रूला नमवू लागली, साधे गावठी बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण ‘यूटय़ूब’वरून घेऊन एकमेकांना धडा शिकवू लागली. ही मुले ‘कॉन्व्हेन्ट’मधली आहेत, म्हणूनच ती बिघडलेली आहेत, असे स्थानिक हिंदी प्रचारमाध्यमांनी सुरुवातीला सुचवून पाहिले, पण ज्या शाळांची नावे ख्रिस्ती-संचालित दिसत नाहीत तेथील विद्यार्थीही अशा समूहांमध्ये असल्याचे आता उघड झाले आहे. मुलांवर हे हिंसेचे कुसंस्कार केवळ व्हिडीओ गेम किंवा चित्रपट किंवा यूटय़ूबमधून होतात, असे मानणे हे वयाच्या १४ व्या वर्षांनंतर मनुष्याला समाजभान येऊ लागते, या सर्वसाधारण गृहीतकाशी फारच फटकून ठरेल. या मुलांना समाजभान आहे, म्हणजे त्यांना राजकीय परिस्थितीही कळत असेल म्हणावे, तर ते अधिकच अडचणीचे! पण ते नसेल, तर ही सुविद्य घरांतली मुले नागरिक म्हणून कशी वागणार आहेत?

ola uber pune ban marathi news
पुण्यात ओला, उबर सुरू राहणार? जाणून घ्या अंतिम निर्णय कधी होणार…
Stone Pelting in West Bengal
Ram Navami : पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार, मिरवणुकीत दगडफेक; पोलिसांकडून अश्रूधुराच्या नळकांड्यांचा वापर!
chandrachud (1)
“लैंगिक भेदभाव संपवा, स्त्रियाही खोल समुद्रात जाऊ शकतात”, कोस्ट गार्डप्रकरणी सुप्रिम कोर्टाने केंद्राला फटकारले
buldhana japan marathi news, japanese language buldhana marathi news
गरिबीच्या अंधारावर मात करत निघाली उगवत्या सूर्याच्या देशात; बकऱ्या वळणाऱ्या रमाई कन्येला जपानमध्ये लाखोंचे ‘पॅकेज’