राजेश बोबडे

मानवाला सफलतेची पाऊलवाट दाखवत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, ‘‘दिवस उगवतो आणि मावळतो, नवे वर्ष येते आणि जाते. परंतु ज्या माणसाला आपल्या जीवनाचे मूल्य कळत नाही, या दुर्मीळ नरदेहाचे महत्त्व समजत नाही, असा माणूस आंधळय़ाप्रमाणे कुणीकडे तरी भटकत राहतो. हजारो प्रकारच्या गुलामगिरीत आपले आयुष्य कंठत राहतो. जीवनाच्या कल्याणाचे, उन्नतीचे आणि सुखशांतीचे त्याचे संकल्प कधीच पूर्ण होत नाहीत. वास्तविक आपले संकल्प पूर्ण करून घेण्याचे सामर्थ्य प्रत्येक व्यक्तीच्या अंगी आहे. असाध्य वाटणाऱ्या गोष्टीही प्रयत्नांनी साध्य झाल्या आहेत, याची शेकडो उदाहरणे आपल्यासमोर आहेत. अर्थात त्यासाठी अभ्यासाची आवश्यकता असते, हे विसरून चालणार नाही.

अभ्यास अभ्यासानेच वाढत जातो. चालता चालता वाटच वाटाडी होते आणि सफलता दृढनिश्चयानेच मिळत असते, मात्र ज्या संकल्पाची सफलता आम्हाला पाहिजे आहे तो संकल्प सत्य संकल्प असावा लागतो, विषयसंकल्प नव्हे! ‘सत्यसंकल्पाचा दाता नारायण। सर्व करी पूर्ण मनोरथ।।’ हे वचन केव्हाही विसरू नये. विषयसंकल्पदेखील सफल होतोच; पण त्याची सफलता कडू फळ देणारी, क्षणिक व शेवटी पश्चात्तापाला कारणीभूत असते. ज्या साधनांच्या अधुरेपणात एकेका अंशांत देखील आनंद दुणावत जातो आणि पूर्णतेत गांभीर्य वाढते ती साधने किंवा ते संकल्पच टिकाऊ सुख देणारे असतात.’’ महाराज येथे संत तुकाराम महाराजांचे उदाहरण देतात. तुकाराम महाराज म्हणतात, ‘हे सर्व आपल्या हाती आहे. निश्चयाचे बळ हे केवळ साधन नव्हे, तर ते प्रत्यक्ष फळच आहे.’ आपण जेव्हापासून निश्चय करू तेव्हापासूनच फळालाही सुरुवात होईल. पण ते अपुरे फळ पूर्ण शांती देऊ शकत नाही, म्हणूनच त्याला वाढवावे लागते. अर्थात त्यासाठी निश्चयच परिपक्व करावा लागतो, टिकवावा लागतो. ही निश्चयाची शक्ती कुणालाही मागण्याची आवश्यकता नसते व ती मागून मिळतही नसते. सत्यसंकल्पातच ती शक्ती आपोआपच प्रकट होते. निश्चयाच्या मागे ईश्वरी कृपा नेहमीच असते; पण आपण आपल्या संकल्पाला निश्चयाचे रूप देत नाही. केंद्रीभूत करून वाढवत नाही आणि त्यामुळे त्यांना शक्तीचे रूपही प्राप्त होत नाही. त्याचा दोष आपण कृपेवर, आपल्या संस्कारांवर किंवा दैवावर तसेच कधी आपल्या संगतीवर देखील ढकलतो; पण ती फार मोठी चूक आहे. प्रयत्नांविना देवालाच सर्व काही मागण्याच्या आजच्या पद्धतीविषयी ग्रामगीतेतून प्रश्न विचारताना महाराज म्हणतात,

प्रथम कळू दे तुझी साधना।

काय ठेवितोसि आपुली धारणा।

दिनचर्येची कैसी रचना। आहे तुझ्या?

rajesh772@gmail.com