राजेश बोबडे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘‘मतामतांचा गलबला कोणी पुसेना कोणाला’’ अशी परिस्थिती देशात केव्हापर्यंत राहील याचे विवेचन करताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, ‘‘पूर्वीचे राजे आपल्या एकजिनसी सैन्यासह लहान लहान कुटुंबांशी लढून आपली गुजराण करीत असत. आपल्याला तर आपल्या अस्तित्वावरच वार करणाऱ्या शक्तींपासून, संघटनांपासून स्वत:चे रक्षण करणे क्रमप्राप्त आहे. मग त्याकरिता तेवढय़ाच भक्कम प्रमाणात जात, धर्म व धन एकत्र करून वाढविणे गरजेचे आहे. भांबावलेल्या परिस्थितीतील जातीयता आपण एकसाथ नाहीशी केली पाहिजे, प्रसंगी पक्षभेद नष्ट केले पाहिजेत. भारतात राहतील त्यांचा एकच धर्म असला पाहिजे. भारतातील संपत्ती सध्या तरी त्या एकाच कामासाठी वापरली गेली पाहिजे. आजचा पुढारीही त्याच ध्येयाचा, साहसाचा, त्याग व तपस्येचा व जिवंत हृदयाचा असणे गरजेचे आहे. तरच आजचा प्रसंग निभावू शकेल; नाही तर ‘आमच्या पाठीशी देव आहे’ म्हणून राहू तर सपशेल फसू आणि देवाच्या नावाला व ज्ञानाला कलंक लावण्यास कारणीभूत होऊ हे विसरू नका,’’ असा इशारा महाराज देतात. 

महाराज म्हणतात, ‘‘एकधर्मी व्हा. राष्ट्रधर्म हाच एकमेव धर्म सर्वानी आपल्या अंगी बाणवला पाहिजे. एका देशाच्या व समाजाच्या सुराज्य ध्येयाला अनुसरून जे कोणी वागतील मग ते कार्याने- साधनांनी कितीही भिन्न असले तरी, त्यांचा धर्म एकच समजला जातो. त्यात जे जे सामील असतील त्या सर्वाचा तो एकच धर्म आहे, मग ते असे समजोत वा न समजोत, न समजणे हे त्यांचे अज्ञानच नव्हे पापही आहे. धर्माची व्याख्या राष्ट्रीयतेला सोडून किंवा संप्रदाय दृष्टीने करणे म्हणजे धर्माचे विडंबन करणेच होय,’’ असे महाराज सांगतात.

ते म्हणतात, ‘‘स्वातंत्र्य संरक्षणास कर्तव्यनिष्ठेचीच गरज असते. त्याकरिता तुम्ही स्वत: प्रचारक बना आणि मनुष्य संघटना, जाती संघटना, धर्म संघटना, धन संघटना तसेच अधिकारांची संघटना करा; आणि मगच देशाच्या स्वातंत्र्यरक्षणाविषयी बोला. नाही तर आम्ही अजूनही गुलामच आहोत असे कबूल करा व ही गुलामी जाण्याकरिताही तीच गोष्ट करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून आमचे ध्येय, आमची जात, आमचा धर्म, आमची संपत्ती एक व आम्ही सर्वच लोक एकाच देशाचे शिपाई आहोत, अशी जाणीव श्रीमंतापासून मजुरांपर्यंत सर्वात निर्माण होईल. त्यानंतरच पुढारीपणाची शेखी मिरवा व तेही व्यक्तींच्या स्वार्थाकरिता किंवा अधिकार लालसेकरिता नव्हे. हे जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत ‘‘मतामतांचा गलबला कोणी पुसेना कोणाला!’’ असेच सुरू राहणार. महाराज आपल्या साहित्यात म्हणतात,

‘‘मानवता ही पंथ मेरा,

       इन्सानियत है पक्ष मेरा

सबकी भलाई धर्म मेरा,

       दुविधाको हटाना कर्म मेरा

एकजात बनाना वर्म मेरा,

       सब साथ चलना मर्म मेरा

निच-उंच हटाना गर्व मेरा,

       गीरते को उठाना स्वर्ग मेरा॥’’

rajesh772@gmail.com

More Stories onधर्मReligion
मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rashtrasant tukdoji maharaj view on nationalism zws
First published on: 19-05-2023 at 04:16 IST