scorecardresearch

Premium

राष्ट्रभाव : धर्म म्हणजे रिलिजन नव्हे!

धर्म हा शब्द ‘धृ’ या संस्कृत धातूपासून झालेला आहे. धृ म्हणजे धरून ठेवणे, बांधून ठेवणे, धारण करणे. बांधून ठेवायचे म्हणजे कमीत कमी दोन वस्तू हव्यात.

rastrabhav religion
संग्रहित छायाचित्र

रवींद्र माधव साठे

धर्म हा शब्द ‘धृ’ या संस्कृत धातूपासून झालेला आहे. धृ म्हणजे धरून ठेवणे, बांधून ठेवणे, धारण करणे. बांधून ठेवायचे म्हणजे कमीत कमी दोन वस्तू हव्यात. म्हणून जो एकटा आहे त्याला धर्म नाही. तर तिथे रिलिजन आहे.

delhi high court
विश्लेषण : ‘सपिंड’ विवाह म्हणजे काय? दिल्ली उच्च न्यायालयाने यावर बंदी का घातली? जाणून घ्या सविस्तर..
Mars and Mercury will come close
मंगळ आणि बुध ग्रह जवळ येणार, पूर्व क्षितीजावर अपूर्व अनुभूती; वाचा अनोख्या दृष्याचा आनंद केव्हा घेता येणार?
90 degrees Guru Yuva Gochar Dhanlabh For These Three Rashi Destiny to Take Total Turns Lakshmi Bless With Money Astrology
९० अंशात गुरुदेवाचे युवा अवस्थेत भ्रमण, धनलाभासह ‘या’ तीन राशींच्या नशिबाला मिळेल कलाटणी, होईल भाग्योदय
Ram Mandir Ayodhya Inauguration
पहिली बाजू : केवळ निर्माण नव्हे, हे नवप्रबोधन!

भारतात राष्ट्र, राष्ट्रीयता या विषयांची जेव्हा चर्चा होते तेव्हा इथे राष्ट्रीयता विरुद्ध सांप्रदायिकता हा संघर्ष आहे, असा वारंवार उल्लेख होतो. त्यात धर्मामुळे सांप्रदायिकता निर्माण होते आणि हिंदू धर्मीय अन्य ‘धर्म’ मानणाऱ्यांना नेहमी त्रास देतात हा विरोधकांचा मुख्य आक्षेप असतो. पण मुळात हिंदू नावाचा कोणता संप्रदाय आहे का? कारण ‘संप्रदाय’ व ‘धर्म’ या भिन्न संकल्पना आहेत. त्यांत हिंदू धर्मामुळे कधी संघर्ष निर्माण होईल का? याचा विचार होणे आवश्यक आहे.

भारतात खूप पंथ व संप्रदाय आहेत. हिंदूंचे विविध संप्रदाय आहेत. परंतु हिंदू नावाचा कोणताही संप्रदाय मात्र अस्तित्वात नाही. मग संप्रदाय म्हणजे काय आणि धर्म म्हणजे काय असा प्रश्न कोणासही पडेल. मनुष्य आणि अंतिम सत्य यांच्यामधील जो संबंध आहे त्यास संप्रदाय म्हणतात. भगवान श्रीकृष्ण भगवत् गीतेत म्हणतात की,

येपन्य देवता भक्ता यजन्ते श्रद्धयान्वित: ।

ते पि मामेव कौन्तेय यजन्त्यविधी पूर्वकम्।

अर्थात जे अन्य देवतांचे भक्त आहेत ते सुद्धा माझेच पूजन करत आहेत आणि त्या वेळी निश्चितपणे बाकी जेवढय़ा देव-देवता अस्तित्वात होत्या त्याचीही कल्पना श्रीकृष्णांनी केली होती. एवढेच नव्हे तर त्यांच्या पश्चात विश्वात जेवढे देव निर्माण होणार असतील (अल्ला, यहोवा इ.) त्या सर्वाचा त्यांनी विचार केला होता. वरील दृष्टिकोनाचे स्पष्टीकरण करणारी एक प्रार्थना म्हटली जात असे. त्यांत त्रलोक्यनाथ हरिचे वर्णन काय होते तर, ‘त्रलोक्यनाथ हरि माझे वांछित फळ मला लाभू दे। माझी कामना पूर्ण होऊ दे.’ ‘शैव ज्यास शिव म्हणतात, वेदान्ती ज्यास ब्रह्म म्हणतात, बौद्ध ज्यास बुद्ध म्हणतात, जैन ज्यांस अर्हत म्हणतात, तो हरी माझी मनोकामना पूर्ण करू दे.’ हिंदू हा मूलत: सर्वसमावेशक आहे त्यामुळे समजा आजच्या युगात या प्रार्थनेचा जन्म झाला असता तर कदाचित त्यात हेही जोडले गेले असते की मुसलमान ज्यांना अल्ला म्हणतात, ख्रिस्ती ज्यास ‘फादर इन हेवन’ म्हणतात, यहुदी ज्यांस यहोवा म्हणतात, तो माझी कामना पूर्ण करू दे. या सर्वाचा भावार्थ हा की लक्ष्य एकच आहे परंतु मार्ग भिन्न आहेत. या दृष्टीने आपल्या इथे संप्रदायास व्यक्तिगत बाब मानले गेले आहे. प्रत्येकाचा संप्रदाय वेगवेगळा असला पाहिजे, अशी प्रारंभापासून आपली धारणा राहिली आहे. यामुळे हिंदू, संप्रदायासाठी संघर्ष करेल हे संभव नाही कारण हिंदू संप्रदाय नावाची कोणतीही गोष्ट अस्तित्वात नाही.

विभिन्न मसीहा किंवा प्रेषितांनी वेगवेगळय़ा देशांत, भिन्न-भिन्न भाषांमधून आपापल्या अनुयायांची प्रवृत्ती व परिस्थितीनुसार ईश्वर आणि मनुष्याच्या संबंधांची चर्चा केली आहे. इसा मसीहाने सांगितले की, ‘ग्लोरी बी अनटू दाय नेम’ त्यास आपल्या इथे द्वैत म्हटले आहे. ईसा मसीहाने असेही कथन केले आहे की, ‘आय अ‍ॅम इन माय फादर, ही इन यू, अ‍ॅण्ड यू इन मी’ तर हेच हिंदूमध्ये विशिष्ट द्वैत आहे. आमच्या विचारांत ‘र्सव खल्विदं ब्रह्म’, ‘अहं ब्रह्मास्मी’सारखा अद्वैताचाही प्रतिध्वनी आहे. आपण वरील विवेचन बघितले तर हिंदूमध्ये धर्माच्या बाबतीत कोणत्याही प्रकारचा घेट्टो किंवा बंदिस्त मानसिकता नाही. विविध संप्रदाय आहेत. हिंदू तर ३३ कोटी देवतांचे पूजक आहेत. ज्यांचे पूजागृह एवढे प्रशस्त व विशाल आहे, त्यांत एक अल्ला किंवा एक प्रेषित किंवा मसीहा यांना स्थान मिळण्यास कोणतीही अडचण नाही. त्यामुळे ‘हिंदूत्व’ कोणत्याही प्रकारचा वाद नाही. हिंदू सर्व ‘तथाकथित धर्माचा’ संघ आहे. हिंदूंच्या पवित्र पूजागृहात सर्व संप्रदायांचे स्वागत आहे. त्यामुळे हिंदू धर्मामुळे सांप्रदायिकता निर्माण होते असे जे म्हणतात त्यांना हिंदू, हिंदूत्व, हिंदू धर्म याविषयी अपुरी माहिती आहे. हिंदू नावाचा कोणताही संप्रदाय नाही तर हिंदूचे अनेक संप्रदाय आहेत.

दुसरा मुद्दा असा की, रिलिजन म्हणजे धर्म असे नेहमी भाषांतर केले जाते ते वास्तविक पाहता चूक आहे. त्यामुळे वैचारिक विकृतीला आणि गोंधळाला वाचा फुटते. आपल्याकडे धर्मशाळा, धर्मादाय आयुक्त, धर्मार्थ दवाखाना, धर्मकाटा असे शब्द वापरले जातात. त्यांत ‘धर्मार्थ दवाखाना’ म्हणजे ‘हॉस्पिटल फॉर रिलिजन’ असत नाही. धर्मशास्त्र म्हणजे ‘सायन्स ऑफ रिलिजन’ नव्हे. डॉ. पां. वा. काणे यांनी ‘हिस्ट्री ऑफ धर्मशास्त्र’ हा ग्रंथ इंग्रजी भाषेत लिहिला. परंतु त्यांनी ‘धर्मशास्त्र’ शब्दाचे इंग्रजी भाषांतर केले नाही. भारतीय भाषांमध्ये आपण कितीतरी प्रकारे धर्म शब्दाचा आपण वापर करतो. उदा., पुत्रधर्म, स्त्रीधर्म, पतिधर्म, बंधुधर्म, राजधर्म, शेजारधर्म वगैरे आणि हिंदूधर्मही म्हणतो. पितृधर्म किंवा पुत्रधर्म म्हणताना पित्याच्या किंवा मुलाच्या उपासनापद्धतीचा आपण उल्लेख करत नाही.

धर्म हा शब्द ‘धृ’ या संस्कृत धातूपासून झालेला आहे. धृ म्हणजे धरून ठेवणे, बांधून ठेवणे, धारण करणे. बांधून ठेवायचे म्हणजे कमीत कमी दोन वस्तू हव्यात. म्हणून जो एकटा आहे त्याला धर्म नाही. तर तिथे रिलिजन आहे. जो समूहामध्ये राहतो त्याच्यासाठी धर्म आहे. धर्म ही सापेक्ष कल्पना आहे. पुत्रधर्म म्हटला की त्यात पिता व पुत्र आवश्यक आहे. स्त्रीधर्म म्हटले की पुरुषाची अपेक्षा आहे, पतिधर्म म्हटले की स्त्रीची अपेक्षा आहे, राजधर्म म्हटले की प्रजेची अपेक्षा आहे. त्यामुळे दोन अस्तित्वांना धरून ठेवणारे जे तत्त्व आहे, त्याला धर्म असे नाव आहे. धर्म समाजासाठी, विश्वासाठी व जगासाठी आहे. भारतीय विचारदर्शनाप्रमाणे विश्वात व्यष्टी, समष्टी, सृष्टी आणि परमेष्टी अशी चार अस्तित्वे आहेत. त्यांना जो बांधून ठेवतो, धरतो तो धर्म, यांना जोडणारे जे सूत्र त्याचे नाव धर्म. मनुष्य एकटा राहू शकत नाही. तो समाजामध्ये आहे म्हणून त्याला धर्म आहे. मनुष्याने भोवतालच्या समाजाशी नाते जोडले तसे मानवेतर सृष्टीशीही जोडले. तेव्हा धर्म म्हणजे जो धारणा करतो. हिंदूधर्म या अर्थाने धर्म आहे. सामाजिक जीवन चालण्यासाठी ज्या आवश्यक संस्था आहेत, त्या सर्वानी या धर्माशी संबंध ठेवला आहे. आपण हिंदूधर्माचा व हिंदूत्वाचा योग्य विचार केला, की आपल्याकडे ना ना प्रकारच्या ज्या उपासनापद्धती व ज्या देवता आहेत, त्यांचा आपल्याला अर्थ कळेल.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विचारक आणि लेखक, मा. गो. वैद्य यांनी ‘धर्म’ या संकल्पनेचे सुबोधपणे विवेचन केले आहे. ते आपल्या पुस्तकात लिहितात. व्यक्ती स्वत:साठी घर बांधते तेव्हा तो धर्म होत नाही. सामाजिक दृष्टिकोनातून ती जेव्हा इतरांसाठी निवारा तयार करते, तेव्हा ती धर्मशाळा होते. ‘धर्मशाळा’ व्यक्तीला समाजाशी बांधून ठेवते. ‘धर्मशाळा’  व्यक्तीला समाजसापेक्ष बनवते.

नास्तिक सोडले तर सृष्टीत असलेल्या चैतन्यतत्त्वाचे पूजन सर्वजण करतात. त्या तत्त्वास कोणी ईश्वर म्हणते तर कोणी परमात्मा म्हणते. याची अनेक रूपे आहेत. सर्वत्रच ते भरले आहे. ते तत्त्व दिसत नाही. म्हणून त्याची वेगवेगळी प्रतीके मानवाने तयार केली. विशिष्ट प्रतीक तेवढे खरे, इतर खोटी असे मानणे हा अधर्म आहे. प्रतीकांच्या स्थानांना मानवाने पावित्र्य अर्पण केले आहे आणि अशा रीतीने चैतन्यतत्त्वाशी आपला संबंध जोडला आहे. या संबंधाला ‘रिलिजन’ म्हणतात. म्हणून धर्मात रिलिजनचा अंतर्भाव आहे पण रिलिजनमध्ये धर्म समाविष्ट होत नाही, हे आपण समजून घेतले पाहिजे.

विश्वात विविधता असल्यामुळे, संघर्षही आहे. धर्म संघर्षांऐवजी समन्वय आणि सामंजस्य निर्माण करतो. म्हणून धर्माला वैश्विक सामंजस्याचे तत्त्व मानण्यात आले आहे. हेच आमच्या संस्कृतीचेही आधारभूत तत्त्व आहे. समाजजीवनाच्या सम्यक संचालनासाठी या तत्त्वाचा आधार घेतला पाहिजे. त्या आधारावर समाजजीवनाच्या सर्व रचना आणि सर्व संस्था निर्माण केल्या पाहिजेत. (हिंदू, हिंदूत्व आणि हिंदूराष्ट्र: आजच्या संदर्भात, पृष्ठ ८ व ९, प्रकाशन वर्ष १९८६) हिंदूंमध्ये उपासनेचा एकच ठरावीक किंवा निश्चित व विशिष्ट असा प्रकार नाही, कारण तो कोणत्याही प्रकारचा ‘इझम’ नाही. हिंदू गृहीत धरतो की सत्य आणि मुक्तीकडे जाणारे अनेक मार्ग आहेत.

डॉ. राधाकृष्णन ‘हिंदू वू ऑफ लाइफ’ या पुस्तकात लिहितात, ‘हिंदू एक संप्रदाय नाही. अनेक संप्रदायांचा समावेश असलेले ते एक कुटुंब आहे. अनेक रिलिजन्सचे ते विश्वकुटुंब आहे.’ परंतु आपला जो घोटाळा झाला आहे तो रिलिजनचा अर्थ ‘धर्म’ केल्यामुळे. धर्म शब्दाच्या अर्थच्छटा ‘रिलिजन’ या शब्दात येत नाहीत. भगिनी निवेदितांनी म्हटले आहे की, ‘धर्म शब्दाचे भाषांतरच करता येत नाही.’ निवेदिता म्हणाल्या, ‘धर्म अथवा राष्ट्रीय सदसद्विवेक यासाठी पाश्चात्त्यांत सभ्यता हा पर्यायी शब्द म्हणता येईल.’ डॉ. राधाकृष्णन लिहितात, ‘आस्तिक आणि नास्तिक, संशयवादी आणि अज्ञेयवादी यांनी हिंदू संस्कृती आणि जीवन यांची पद्धती स्वीकारल्यास ते सारे हिंदू असू शकतात. तेव्हा शेवटी महत्त्व तुमचा विश्वास कशावर आहे याला नसून आचरणाला आहे. ज्याला डॉ. राधाकृष्णन् यांनी ‘सिस्टिम ऑफ कल्चर अ‍ॅण्ड लाइफ’ असे म्हटले, त्यालाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने संस्कृती म्हटले. या अर्थानेच ‘धर्म’ या संकल्पनेकडे आपण बघितले तर त्याची व्यापकता आपल्या ध्यानात येईल आणि मग रिलिजन म्हणजे ‘धर्म’ अशी गल्लत दूर होईल.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Rastrabhav religion sanskrit nation india nationality hindu ysh

First published on: 02-09-2022 at 00:02 IST

संबंधित बातम्या

×