अतुल सुलाखे

भारताच्या प्राचीन आर्थिक आणि सांस्कृतिक इतिहासात ‘सार्थवाह’ ही संकल्पना महत्त्वाची आहे. ‘सार्थ’ म्हणजे योग्य वा नेमका आणि ‘वाह’ म्हणजे नेणारा किंवा वहन करणारा. भारतात आणि या उपखंडातील व्यापारी समूहांना या सार्थवाहांचा मोठा आधार वाटे. बौद्ध धर्मात या समूहांचे धार्मिक आणि आर्थिक योगदान दिसते. सार्थवाहांनी व्यापारी संस्कृती विकसित केली तर संतांच्या पदयात्रांनी सद्विचारांचा प्रसार केला.

भूदान यज्ञ हा या उभय क्षेत्रांचा मेळ होता. सत्य, प्रेम आणि करुणेचा संदेश देत असताना लोकांना उपजीविकेचे साधन देणेही आवश्यक होते. तरच साम्ययोगाचे पूर्णरूप अवतरणार होते. आकडेवारीच्या अंगाने भूदान यज्ञाचा आढावा घेतला तर तो आकडा पाहून स्तिमित होण्याखेरीज वेगळी प्रतिक्रिया देणे अतिशय कठीण आहे. ७ मार्च १९५१ रोजी विनोबांना पहिले भूदान मिळाले. त्यानंतर १३ वर्षे ते पायी फिरत होते. ६ एप्रिल १९६४ रोजी ते पुन्हा सेवाग्रामला आले. या काळात त्यांची जवळपास ४७ हजार मैल एवढी पदयात्रा झाली. दानात त्यांना ४७ लाख ६३ हजार ६७६ एकर जमीन मिळाली. याचा अर्थ एक मैल चालल्यानंतर त्यांना सरासरी एक हजार एकर जमीन मिळाली होती.

विनोबांना मिळालेल्या एकूण जमिनीपैकी २४ लाख ४४ हजार २२२ एकर जमिनीचे भूमिहीनांमध्ये वाटप झाले. पुढे कमाल जमीन धारणा कायदा आला आणि सरकारने पहिल्या टप्प्यात २५.६४ लाख एकर जमीन अधिग्रहित केली. यातील बरीचशी जमीन पडीक होती. बऱ्याच जमिनी तंटय़ातील होत्या. सरकारने ताब्यात घेतलेल्या जमिनींपैकी ११.७८ लाख एकर जमिनीचे वाटप झाले. याउलट भूदानात मिळालेल्या जमिनींपैकी सन १९७० पर्यंत १२.१६ लाख एकर जमिनीचे वाटप करण्यात आले. हा आकडा कायद्याने वितरित केलेल्या जमिनीपेक्षा अधिक आहे. कायदा आणि कत्तल हे प्रश्न सोडवण्याचे मार्ग नव्हेत. करुणेच्या मार्गाने प्रश्न सुटतात हा विनोबांचा विचार होता. सरकारने तो स्वीकारला नाही. तथाकथित बुद्धिजीवी मंडळी त्यातील उणिवा शोधत राहिली. त्यांच्या या कृतीवर मौन बाळगणेच ठीक.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भूदानाच्या तीन देणग्या मात्र बदलणे अशक्य आहे. एक- विनोबांच्या भूदानाला अधिक व्यावहारिक आणि तार्किक पर्याय देणे कुणाला जमले असे दिसत नाही. भूदानाचे वैश्विक योगदान गाठणे तर फार दूर. दोन- कायदा आणि कत्तल या दोन्हींचा वापर फोल आहे. हिंसेपेक्षा कायदा बरा इतकेच. आणि तीन- सत्य, प्रेम आणि अहिंसेचा मार्ग कळकळीने दाखवणाऱ्या माणसाबरोबर सर्वसामान्य जनताही तो मार्ग आपलासा करते. त्यामुळे विनोबांनी जमीन मागितली आणि जनतेने ती दिली नाही, असे घडल्याचे एकही उदाहरण नाही. स्वतंत्र भारताला शांतता आणि अहिंसेच्या मार्गावर स्थिर करणे हा भूदानाचा सखोल अर्थ आहे. त्यामुळे अशांततेकडून करुणेकडे घेऊन जाणारा सार्थवाह विनोबांचे योगदान किमान काही काळ तरी विसरणार नाही.