अतुल सुलाखे

विनोबांना तेलंगणात जो प्रतिसाद मिळत होता त्याचे मोठे श्रेय स्वामी रामानंद तीर्थ यांना द्यावे लागते. धगधगत्या तेलंगणाचा पहिला व्यापक दौरा स्वामीजींनी केला. एकाअर्थी भूदानासाठी आवश्यक असणारी मनांची मशागत त्यांनीच केली. पुढे विनोबांनी भूदानाचे बीज पेरले. या दोहोंच्या प्रयत्नांमुळे कम्युनिस्टांची आणि पोलिसांची दडपशाही आटोक्यात आली. तरीही तेलंगणात अमानुष हिंसाचार सुरूच होता.

चलकूर्ती गावात दूध दिले नाही म्हणून पोलिसांनी एका व्यक्तीला क्रूर मारहाण केली. महिलांची स्थिती आणखी भयंकर होती. विनोबांसमोर या स्त्रिया शोकाकुल होऊन आपली दु:खे सांगत असत. यात्रेतील लक्ष्मीताई या दुभाषी कार्यकर्तीने असहाय होत विनोबांच्या कुशीत डोके ठेवून आक्रंदन केले. एका व्यक्तीला पोलिसांनी वेताचे इतके फटके दिले की ते वळ पाहून विनोबा संतप्त झाले आणि या प्रकरणाची तड लावण्याचा निश्चय त्यांनी बोलून दाखवला. त्यानुसार त्या क्रूर पोलीस अधिकाऱ्याचे निलंबन झाले. हिंसेच्या या लाटेत सारी मानवता संपली होती. तरीही तेलंगण भूदानात मोठय़ा उत्साहाने सहभाग घेत होता.

विनोबांकडून मिळणारा धीर आणि लोकांचा सद्गुणांवरचा विश्वास या क्रौर्याला रोखत होता. अहिंसेच्या सेनेचा विशेष सांगताना विनोबा म्हणाले होते की, ‘या सेनेच्या आघाडीला अभय आणि शेवटी सांभाळ करायला नम्रता हवी.’ गीतेतील ‘अभयं सत्त्व संशुद्धि:..’ आदी गुणांची आवश्यकता तेलंगणात तीव्रतेने प्रत्ययास येत होती. निर्भय विनोबा आणि नम्र जनसमूह हिंसाचार प्रेमाने कसा समाप्त होईल ते पाहात होते.

विनोबा तेलंगणमध्ये ५८ दिवस फिरले. या पदयात्रेतून त्यांना १२ हजार २०० एकर जमीन मिळाली. त्यातील बहुतांश जमीन तत्क्षणी वितरित झाली. सुमारे ५०० खासगी तंटे विनोबांसमोर आले आणि त्यांनी ते सोडवले. कम्युनिस्ट या प्रतिसादामुळे संतापले आणि जमीन देणाऱ्यांचे खूनही झाले. विनोबांच्या या पदयात्रेचा परिणाम असा झाला की ते माघारी गेल्यावर अवघ्या सहा महिन्यांत कम्युनिस्टांनी आपला लढा अधिकृतपणे मागे घेतला. भारतातील प्रमुख कम्युनिस्ट नेत्यांना रशियाने सांगितले की भारतात क्रांतीसाठी अनुकूल परिस्थिती नाही. विनोबांनी कम्युनिस्टांची भूमिकाही समजून घेतली. त्यांच्याशी संवाद साधला. त्यांच्या शक्य त्या समस्या सरकारसमोर मांडण्याचे आश्वासन दिले. विनोबांना कम्युनिस्टांनी हाती घेतलेला जमिनीचा प्रश्न मान्य होता. तथापि, तो अहिंसेच्या तत्त्वज्ञानाने सुटावा हा त्यांचा आग्रह होता. सरकारची हिंसाही त्यांना अमान्य होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कम्युनिस्टांना वठणीवर आणण्यासाठी जे सैन्यबळ वापरले जात होते याला विरोध करताना विनोबा म्हणाले, ‘पोटात रोग आणि कपाळावर सुंठ अशी ही स्थिती आहे. पोटात औषध घेतल्याखेरीज रोग नष्ट होणार नाही. संग्रहाची वृत्ती हे पाप आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. कत्तलींनी प्रश्न सुटत नाहीत. कायद्याने फार थोडे काम होते. कायदा माझ्याप्रमाणे जमीन मिळवू शकणार नाही.’तेलंगण यात्रा पूर्ण करून विनोबा २६ जून १९५१ रोजी परतले. एखाद्या स्थितप्रज्ञाप्रमाणे ते पुन्हा ऋषी प्रयोगाला लागले. तथापि, भूदान यज्ञाचा दुसरा टप्पा सुरू होणार होता आणि विनोबांची भ्रमंती अटळ होती.