अतुल सुलाखे

स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही तीन मूल्ये सर्वमान्य आहेत. यातील स्वातंत्र्य आणि समता यावर नेहमी चर्चा होते. कृतीही होते. प्रसंगी आंदोलनेही होतात. तथापि तिसरे मूल्य फारसे चर्चेत नसते. आपण कळत-नकळत बंधुता विसरलो का हा प्रश्न पडतो. कधी तरी ‘एक मत समान पत’ असा विचार दिसतो, पण तो अपवाद म्हणून राहतो. सामाजिक साम्ययोगाच्या स्थापनेत बंधुत्वाला अग्रस्थान आहे. ट्रस्टीशिप किंवा स्वामित्व विसर्जन या संकल्पनांमध्ये ते दिसते. बंधुत्वाचा भव्य आविष्कार म्हणून भूदान यज्ञाचा विचार करावा लागतो.

विनोबांच्या साम्ययोगात आध्यात्मिक साम्य ऐहिक साम्याची राखण करते. इथे पुन्हा ज्ञानोबा माउली वाट दाखवतात.

ज्ञानेश्वरीमध्ये भक्तीचा महिमा सांगताना त्या पंथाचा किती आणि कसा विचार करावा याचे नेमके वर्णन आले आहे.

तरि झडझडोनि वहिला निघ।

इये भक्तीचिये वाटे लाग।

जिया पावसी अव्यंग।

निजधाम माझें॥ ९.५१६॥

अर्थ : तर सर्वसंगपरित्याग करून, तू या संसारातून त्वरेने बाहेर पड. माझे निर्दोष स्वरूप प्राप्त करून देणाऱ्या, या भक्तीच्या मार्गाला लाग.

भक्तीमार्ग तेव्हाच फलद्रूप होतो जेव्हा लौकिक समतेची वाट आपण उत्कटतेने धरतो. ग्रामदानामध्ये हे तत्त्व केंद्रस्थानी आहे. गाव हे परमेश्वरासारखे तिथे स्वामित्वाची भाषा येत नाही. ही धारणा हे अव्यवहार्य आहे आणि तिचा जाणीवपूर्वक स्वीकार करू पुढे जावे लागते. हे केव्हा तरी लक्षात घ्यायला हवे.

संत गोरोबाकाकांच्या शब्दांत सांगायचे तर

निर्गुणाचा संग धरिला जो आवडी।

तेणे केले देशोधडी आपणियासी मायबाप।।

सर्वोदयाचे घर साम्ययोगाच्या वाटेने गेलो तरच सापडते आणि साम्ययोग सर्वोदयापाशी विसावला तरच परम साम्य गवसते. ऐहिक आणि पारलौकिक पराक्रम करणे अशी दुहेरी जबाबदारी घेऊन विनोबा सरसावले. अशा स्थितीत विनोबांना फक्त ‘व्यवहार’ सुचला असता तरच नवल. परम साम्याची स्थापना तोलूनमापून कशी होईल? त्यामुळे भूदान असो की ग्रामदान त्या कल्पना भव्यच असणार हे केव्हा तरी लक्षात घ्यायला हवे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ग्रामदानातील समर्पणाची अथवा स्वामित्व विसर्जनाची तयारी मंगरोठ या गावाने दाखवली. दिवाण शत्रुघ्न सिंह यांच्या माध्यमातून मंगरोठचे ग्रामदान झाले. जे स्थान काशी आणि रामेश्वरचे तेच स्थान पोचमपल्ली आणि मंगरोठचे. गंगोदक काशीहून रामेश्वरला नेण्याची आपली परंपरा आहे. भूदान गंगेचा प्रवास पोचमपल्ली ते मंगरोठ असा झाला. भूदान गंगा प्रवास ग्रामदान-गंगाचे रूप घेत स्थिरावला. ही साम्ययोगाची परमावधी होती. या दर्शनाचा प्रवास थोडा जरी उणा झाला असता तरी मग त्याला साम्ययोग म्हणताना अवघडल्यासारखे झाले असते. भूदान यज्ञाने मिळवलेले लौकिक यशही मजबूत होते. त्याची पुनरावृत्ती होऊ शकली नाही कारण त्यासाठी लागणारे आध्यात्मिक अधिष्ठान नव्हते.