अतुल सुलाखे
गीताई आणि गीता प्रवचने यांची रचना करताना विनोबांनी गीतेचे केवळ अनुकरण केले नाही. त्यांनी त्या रचनांना आत्मचिंतनाचीही जोड दिली. गीतेमध्ये ‘योग’ शब्द अत्यंत महत्त्वाचा आहे. प्रत्येक अध्यायाच्या शेवटी तो येतोच. विनोबांची गीताई मात्र ही प्रथा पाळत नाही. रचना भिन्न असली तरी विनोबांचा गीतार्थ मात्र पूर्वसुरींना अनुसरणारा आहे. गीतेवर अनेकांनी भाष्ये केली. ती विविध नावांनी ओळखली जातात. उदाहरणार्थ, शांकरभाष्य, ज्ञानदेवांची भावार्थ दीपिका, वामन पंडितांची यथार्थ दीपिका, लोकमान्यांचे गीतारहस्य (कर्मयोग), गांधीजींचा अनासक्तियोग आणि विनोबांचा साम्ययोग आदी.
विनोबांच्या गीतार्थाचे दोन भागांत वर्गीकरण करता येते. त्यातील चिंतनपर भाग साम्ययोगाच्या रूपात दिसतो तर प्रत्यक्ष जीवनात त्यांनी गीतार्थाचे जे आचरण केले ते दानयोगाच्या रूपाने समोर येते. हे दोन्ही योग एकत्र केले तर विनोबांच्या गीतार्थाला ‘साम्ययोग आणि दानयोग’ म्हणता येऊ शकेल. परंतु या दोन्ही कृतींमध्ये तिळमात्रही भेद नाही. सेवेच्या मार्गाने ब्रह्मप्राप्ती करून घेणे असे त्याचे रूप आहे.
विनोबा आयुष्यभर केवळ देत आले. गांधीजींच्या शब्दात सांगायचे तर ‘आश्रमात आलेली प्रत्येक व्यक्ती काही तरी घेऊन गेली. परंतु हा मुलगा आश्रमाला देण्यासाठी आला होता.’ त्यांना ‘दधीचि ऋषी’ही म्हटले जाते. विनोबांनी एकसमन्वयासाठी आणि समत्वासाठी आयुष्याचा कणन् कण वेचला आणि तो मानव समाजाला अर्पण केला. इतक्या सहजपणे की ‘उंच टेकडी होण्याची मला मौज वाटत नाही. माझी माती इतस्तत: पसरावी’ असे सार्थ वचन त्यांच्या मुखी आले.
विनोबांनी हा दानयज्ञ सुरू केला नसता तर त्यांचा साम्ययोग केवळ पांडित्य म्हणून पाहिला गेला असता. गीताईच्या पाचव्या अध्यायामध्ये त्यांना साम्ययोग दिसला आणि गीताई चिंतनिकेमध्ये त्यांनी त्याचे विवरण केले. यामध्ये तीन तपांचा काळ गेला. विनोबांच्या मते गीतेच्या भाष्यकारांमध्ये मतभेद दिसतात. आपण लावलेल्या अर्थावर ते दृढ राहतात, परंतु या भाष्यकारांमध्ये दोन महत्त्वाच्या मुद्दय़ांवर एकमत दिसते. एक हा ग्रंथ जीवनोपयोगी आहे आणि दोन यात मोक्षमार्गाला प्राधान्य असले तरी हा मोक्षमार्ग जीवनाभिमुखच आहे. त्यामुळे सर्व भाष्यकारांचे पारलौकिक चिंतन लौकिकतेची कास सोडत नाही. हे सारतत्त्व हाती येते.
विनोबांनी हे गीता चिंतन आम जनतेच्या दारी जाऊन सांगितले. तरुणांना तर आवर्जून सांगितले. भविष्यातील कुरुक्षेत्र त्यांना नेमकेपणाने हाताळता यावे या सद्हेतूने सांगितले. पोटात काही नसलेल्यांना तर परमार्थ सांगणे म्हणजे त्यांची क्रूर थट्टा असते हे उमजून त्यांनी जमिनीच्या म्हणजे सामान्य भारतीयांच्या उपजीविकेच्या प्रश्नाला तेव्हा शक्य होता त्या मार्गाने हात घातला. दान आणि यज्ञाला चरितार्थाची जोड दिली. भूदान जमीन वाटपासाठीचा यज्ञ होता पण त्याही पलीकडे ती ग्राम, संपत्ती, जीवन आणि प्रेम या दानांसाठीची यात्रा होती. बदलासाठी समाजमन तयार करणे, त्याला परंपरेची जाणीव करून देणे व सत्य, प्रेम आणि करुणा यांची पेरणी करणे यावर हा दान योग आधारित आहे.