अतुल सुलाखे
कोणाच़ा न करी द्वेष दया मैत्री वसे मनीं
मी माझें न म्हणे सोशी सुख-दु:खें क्षमा-बळें
– गीताई
‘माउली’ शब्द रूढ केला तो ज्ञानोबांनी. ज्ञानेश्वरीमध्ये या शब्दाचा इतका वैविध्यपूर्णरीतीने आणि नितांत सुंदर उपयोग आहे की एका ठिकाणी ज्ञानदेवांनी आत्म्यालाच ‘माउली’ संबोधले आहे. जगातील कोणत्याही साहित्यामध्ये आत्म्याला माउली म्हटलेले नाही, हा विनोबांचा निर्वाळा आहे. ज्ञानदेवांपासूनचा हा शब्द म्हणजे भागवत धर्माची महत्त्वाची ओळख आहे.
विनोबांनी ही परंपरा भूदान यज्ञाच्या निमित्ताने आणखी पुढे नेली. जमीन ही आई आहे आणि प्रत्येकजण तिचे बाळ आहे. त्यामुळे कुणालाही जमिनीपासून दूर ठेवता येणार नाही. विनोबांनी गीताईप्रमाणेच भूमिलाही माउली म्हटले आणि साम्ययोग सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रातही प्रस्थापित झाला.भूदानाच्या संदर्भात मिळालेल्या जमिनीइतकाच हा सांस्कृतिक वारसाही महत्त्वाचा आहे. यासाठी पोचमपल्ली येथे काय घडले हे पाहायला हवे.
१८ एप्रिल १९५१ रोजी सकाळी विनोबा पोचमपल्ली इथे पोहोचले. गाव तीन हजार लोकवस्तीचे. विणकर आणि दलितांचे. तीन हजारांतील दोन हजार लोक भूमिहीन होते. व्यसन आणि बेरोजगारी यांच्या विळख्यातील हे गाव कम्युनिस्टांचा दहशतीखाली होते. विनोबा गावात पोहोचले आणि त्यांनी प्रथम दलित वस्तीला भेट दिली. तिथल्या एका घरात एक बाळ आणि त्याची आईच विनोबांना दिसली. त्यांनी बाळाला उचलून घेतले. त्या आईने बाळासह विनोबांचे दर्शन घेतले. विनोबा घराबाहेर आले. तेवढय़ात स्थानिक लोकही आले. एक शांत संवाद सुरू झाला. सर्वासाठी हा सुखद क्षण होता. लोक आपल्या अडचणी विनोबांना सांगू लागले. रोजगार, शिक्षण, घर अशा अडचणी सांगितल्या.
या दलित मंडळींची महत्त्वाची मागणी जमिनीची होती. जमीन नसल्याने त्यांना जमीनदारांकडे जावे लागे. मजुरी म्हणून त्यांना उत्पन्नाचा विसावा हिस्सा, एक कांबळे आणि पायताणाचा एक जोड मिळे. इतक्या कमी मजुरीमध्ये उपाशी राहून ते शेतकाम करत. तुम्हाला किती जमीन हवी असे विनोबांनी त्यांना विचारल्यावर त्यांनी ८० एकरांचा आकडा सांगितला. विनोबांनी प्रश्न ऐकून घेतले पण त्याक्षणी त्यांच्याकडे उत्तरे नव्हती. थोडेफार उपाय सांगायचे, सरकारकडे विनंती करू, असे आश्वासन द्यायचे इतकेच त्यांच्या हाती होते. विनोबा आपले प्रश्न सोडवतील ही लोकांची खात्री होती, तर भारतीय संस्कृतीतील सत्कृत्याची परंपरा आपला बचाव करेल असा विनोबांचा विश्वास होता. त्यानंतर घडला तो इतिहास होता.
भारतीय संस्कृतीने त्या लेकरांना निराश केले नाही. रामचंद्र रेड्डी यांच्या हातून पहिले भूदान झाले. केवळ जमीन दिली आणि घेतली असा हा प्रकार नव्हता. त्या दानात एक प्रकारचा सन्मान होता. देणारा आणि घेणारा दोघेही आत्मोन्नतीच्या दिशेने पुढे जात होते. मित्रांनी मिळून सहजपणे एखादा प्रश्न सोडवावा तसे या प्रसंगी झाले होते. सख्य भक्तीचे हे दर्शन आज विशेषत्वाने आठवते कारण आज विनोबांचा स्मृतिदिन आहे. तो ‘मैत्री दिन’ म्हणून साजरा होतो. गीता, पसायदान आणि भूदान ही मैत्र दर्शने हा साम्ययोगाचा पाया आहे.