अतुल सुलाखे

पंचशील, पंचायत, या संकल्पना मुळात धार्मिक आणि आध्यात्मिक आहेत. समाजात त्या इतक्या रुजल्या की त्यांचा व्यवहारात केव्हा समावेश झाला ते सांगणे अवघड आहे. पंचायतन पूजनाची कल्पना मूलत: आद्य शंकराचार्याची. भाराभर देवतांचे पूजन करण्यापेक्षा केवळ पाच देवतांचे पूजन करण्याची शिस्त, त्यांनी समाजाला लावली. दुसऱ्या आचार्यानी म्हणजे विनोबांनी हे पंचायतन सूत्र रूपात सांगितले. ते सूत्र शं ना ग र दे असे आहे. शंकर, नारायण, गणेश, रवी आणि देवी असे पंचायतन विनोबा पूजनीय मानत. आपल्या गावगाडय़ात पंच परमेश्वर आहेतच. ग्रामदानामध्येही या पंचायतनाने प्रवेश केला. मंगरोठवासीयांनी ग्रामदानाची पंचायत तयार केली. या कामासाठी विनोबांनी दोन कार्यकर्ते मंगरोठवासीयांना दिले.

या दोघांनी गावाचा अभ्यास करून, तिथली परिस्थिती पाहून ग्रामविकासाची पाच तत्त्वे तयार केली. त्यात गावकऱ्यांचा शब्द अंतिम होता.

१) लग्नानंतर मुलीचा जमिनीवर हक्क राहणार नाही. तथापि ती आपल्या पतीसह गावातच राहू इच्छित असेल तर तिचा हक्क शाबूत राहील. एखाद्या स्त्रीला वैधव्य आले म्हणून किंवा अन्य काही कारणांनी ती गावात परत येणार असेल तर गावकऱ्यांच्या परवानगीने ती गावात राहू शकेल आणि अन्य गावकऱ्यांप्रमाणेच तिचाही जमिनीवर समान अधिकार राहील.

२) बाहेरगावच्या लोकांना मंगरोठमध्ये वास्तव्य करायचे असेल तर गावकऱ्यांच्या परवानगीने त्यांना राहता येईल. मात्र स्थानिक म्हणून मान्यता मिळण्यासाठी त्यांना तीन वर्षे वाट पाहावी लागेल.

३) गाव सोडून जाणाऱ्यांचा गावातील जमिनीवरील हक्क संपुष्टात येतील. त्यांना गावी परतायचे असेल तर गावाच्या अनुमतीची वाट पाहावी लागेल.

४) नोकरी करण्यासाठी येणाऱ्या बाहेरगावच्या लोकांचा जमिनीवर कोणताही अधिकार नसेल.

५) जन्म आणि मृत्यूमुळे गावातील लोकसंख्येत जे बदल होतील त्यानुसार जमिनीच्या हक्कांमध्ये बदल होतील.

ही पाच तत्त्वे कोणत्याही गावाचा आत्मा आहेत. आत्म्याची शक्ती वाढवणारी गावे आणि तिथले गावकरी हे अशा परिस्थितीत साम्ययोगाकडे सहजच वळतील अशी भूमिका घेणे अव्यवहार्य नाही. मात्र विनोबा नको तेवढे आदर्शवादी होते, धर्मनिष्ठ होते, परंपरा पूजक होते अशा भावनेतून अगदी त्यांच्या निकटवर्तीयांनी त्यांच्याकडे पाहिले.

विनोबा एखाद्या चळवळीचे नेतृत्व करू इच्छित नव्हते. तथापि रचनात्मक कार्यात वावरलेला माणूस विधायक वृत्तीचा असणार ही साधी गोष्ट आहे. ती लक्षात घेतली नाही. परिणामी विनोबा अतिआदर्शवादी ठरले. आणीबाणीच्या काळात त्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे ते तत्त्वच्युत ठरले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विनोबांच्या धार्मिक आणि राजकीय भूमिकेबद्दलचे आक्षेप घटकाभर मान्य केले तरी जवळपास अर्धशतक विधायक कार्यात गुंतलेला माणूस असा नाकारता येत नाही. रचना, समन्वय आणि दर्शन या तिन्हींचे ऐक्य असणारी व्यक्ती कायम श्रेष्ठ मार्गदर्शक म्हणून मान्य करणे यातच समाजाचे हित असते. आश्रमातील विधायक कार्य, विविध धर्मश्रद्धांचे ऐक्य आणि साम्ययोग यांचा प्रवर्तक हा नित्यानुसरणीय मानण्यात आपले आणि पुढच्या पिढय़ांचे हित आहे.