अतुल सुलाखे

भूदानाच्या प्रक्रियेत केवळ हृदय परिवर्तनावर भर होता. हृदय परिवर्तन एकतर सहजपणे होत नाही आणि झाले तर तो दांभिकपणा असतो. भूदानावर टीका करताना अनेक मान्यवर म्हणवणाऱ्या मंडळींनी हा सूर आळवल्याचे दिसते. तथापि विनोबांच्या समग्र परिवर्तनाच्या विचारात हृदय परिवर्तन ही एकमेव गोष्ट नव्हती.

हृदय परिवर्तनाप्रमाणेच विचार परिवर्तन आणि समाज परिवर्तन यांना ते तितकेच महत्त्व देत. या तिन्ही घटकांचा एकत्रित विचार करून होणारे परिवर्तन ही भूतकाळ आणि भविष्य काळातील काही शतकांची बेगमी आहे हे लक्षात घ्यायला हवे.

विनोबा सत्तेत नव्हते. राज्यसंस्थेचा भागही नव्हते. त्यांची वृत्ती गूढ आणि आध्यात्मिक होती. ‘तुकारामाला कुणी बँकेचा मॅनेजर केले असते का,’ असे ते म्हणत. तरीही राजकारण टाळता येणार नाही याची त्यांना जाणीव होती. ती अत्यंत गुप्तपणे करायची गोष्ट आहे हा समर्थ रामदासांचा उपदेश त्यांना आदर्श वाटायचा.

एकदा अशी भूमिका घेतली की आदर्श आणि व्यवहार यांची बेमालूम सांगड घालावी लागते. यामुळे समाज परिवर्तनासाठी त्यांनी कायद्याची आवश्यकता सहजपणे स्वीकारली होती. ‘कायदा बनविण्याचा मार्ग आम्ही अडवीत नाही. मात्र कायदा असा बनवला पाहिजे, की ज्यामुळे आपल्या पदरी मूर्खपणा येणार नाही. कारण धनवान लोक कायद्यातून हुशारीने सुटण्याचा प्रयत्न करतात.’ विनोबांच्या या प्रतिपादनावर कोणत्याही टिप्पणीची गरज नाही.

कायद्याच्या प्रक्रियेला करुणेची जोड हवी हा त्यांचा आणखी एक मूलगामी विचार होता. कायद्याला करुणेची जोड नसेल तर तो निष्प्रभ होतो आणि करुणेला सोडचिठ्ठी दिली तर तिच्या जागी कत्तल येते. करुणा म्हणजे काय तर समोरच्यासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा. असहयोग आणि सत्याग्रह हे एक प्रकारे करुणेचे रूप म्हणता येईल. कारण विनोबा या मार्गाला न्याय आणि धर्माचा मार्ग म्हणत. सत्याग्रहात प्रेम असते. ते त्याचे सामथ्र्य आहे. ज्या सत्याग्रहात प्रेम नाही तो सत्याग्रहच नव्हे, इतके थेट त्यांनी सांगितले आहे.

विनोबा सहयोगात प्रेम पाहतातच पण असहयोगातही पाहतात. मूल सन्मार्गावर यावे म्हणून आई प्रसंगी मुलाला थप्पड मारते तथापि त्या कृतीने तिचे प्रेम संपत नाही. या गोष्टीची त्या मुलालाही जाणीव असते  म्हणून ते आईच्याच कुशीत शिरते. हे उदाहरण विनोबा सामाजिक क्षेत्रालाही लावतात. एखाद्या व्यक्तीच्या घरातील धान्य दुसऱ्याने बेकायदेशीर पद्धतीने लुटले तर ते त्याच पद्धतीने परत त्या घरी आणणे ही अिहसा आहे. विनोबांचा हा विचार अक्षरश: बिनतोड आणि चकित करणारा आहे. न्याय आणि धर्म यांची ही अफाट सांगड आहे. भूदानच नव्हे तर विनोबांच्या विचार प्रक्रियेत हा न्याय आणि धर्माचा संगम दिसतो. जगाचे माहीत नाही पण भारतासाठी तरी तो अनोखा आणि चपखल आहे.

गीतेमध्ये धर्मराजाचा उल्लेख‘कुंतिपुत्र’ असा आला आहे. गीताईमधे विनोबांनी ‘धर्मराज-युधिष्ठिर’ असा बदल केला. साम्ययोगाच्या लौकिक रूपाचे हे अचूक वर्णन आहे. साम्ययोगी समाजासाठी धर्मनिष्ठा आणि सारासार विवेक ठेवत युद्ध-स्थिरता ही विनोबांच्या परिवर्तनाची कल्पना आहे. आपण तिची उपेक्षा केली आणि त्यांच्या विचार सृष्टीवर बेलगाम आरोप केले.