अतुल सुलाखे

सारी संसाधने ही फक्त परमेश्वराच्या मालकीची आहेत. ही कल्पना परंपरेने मान्य केली होती. विनोबांनी तिला दानाची म्हणजेच समान विभागणीची जोड दिली. भूदान आणि त्यातून पुढे आलेले ग्रामदान या दोन्ही संकल्पना विनोबांना स्फुरल्या. स्फुरल्या हे जाणीवपूर्वकच म्हटले आहे. तसे नसते तर विनोबांनी आपली योजना सरकारसमोर मांडली असती आणि जो निर्णय असेल तो त्यांनी मान्य केला असता.

तथापि त्यांना या दोन्ही संकल्पनांचे दर्शन झाले आणि ईश्वरावर श्रद्धा ठेवून त्यांनी लोकांना हा विचार सांगितला. गीता प्रवचने सांगताना ही वाणी ईश्वराची आहे, असे श्रोते म्हणत. भूदान पदयात्रेत त्यांना ईश्वराने आणि संतजनांनी चालवले. ‘चालविसी हाती धरोनिया..’ ही संतवाणी त्यांच्या प्रत्ययास आली. खुद्द विनोबांनी तसे सांगितले. या यात्रेत नामदेवांपासून सारे संत माझ्यासमवेत होते, असे त्यांचे उद्गार होते. ही परंपरा त्यांनी जमिनीच्या प्रश्नाशी जोडली. त्यातूनच भूदान नावाच्या अहिंसक महाकाव्याचा जन्म झाला.

ज्ञानोबांनी म्हटले असते की, माझ्या पूर्वजांनी पसायदान मागितले पण तू ते पूर्णत्वास नेलेस. तू आमचा वारस आहेस. भारतातच नव्हे तर जिथे कृषी केंद्रित अर्थव्यवस्था आणि समाजरचना आहे तिथे भूदान आणि ग्रामदानाला पर्याय नाही. अहिंसेचे तत्त्व आणि उपजीविकेचा व्यवहार यांचा मेळ फक्त या मार्गाने साधता येतो. एरवी हिंसा आणि सर्वनाश यांना शरण जावेच लागेल.

विनोबांनी जमिनीच्या प्रश्नाला हात घातला आणि सबंध देशाला तो सोडवण्यास चालते केले. आपल्या भावंडांना देऊन मग तुम्ही उपभोग घ्या. यज्ञात आहुती द्यायची आणि तो पूर्ण झाल्यावर शिल्लक राहील त्याचा प्रसाद म्हणून स्वीकार करायचा, हे तत्त्व विनोबांनी भूदानाशी जोडून जमीन आणि यज्ञ अशी सांगड घातली. एवढय़ावरच त्यांच्यातील शास्त्रज्ञ शांत बसला नाही. भूदानाच्या पुढील टप्पा म्हणजे ग्रामदान हे तत्त्व त्यांनी समाजासमोर ठेवले. हे मालकीचे विसर्जन होते. या अनुषंगाने आणखी काही गोष्टी स्पष्ट करणे गरजेचे आहे. विनोबांचे गीतेचे चिंतन आणि भूदान यात भेद करण्याचा अनेकांचा प्रयत्न असतो. वस्तुत: हे दोन्ही विचार एक आहेत त्याचे अंतिम स्थान तिसऱ्या विचारात आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

समन्वय, साम्य आणि सर्वोदय अशी ही रचना आहे. संपूर्ण सृष्टीचा समन्वय, तिला साम्ययोगाचा आधार आणि अंतिमत: सर्वोदय यांचा मिलाफ म्हणजे साम्ययोग. गीता प्रवचनांच्या आरंभी ‘अभिधेयं परम साम्यम्’ हे सूत्र आहे. हे परम साम्य म्हणजेच या तीन सिद्धांतांचे ऐक्य असा अर्थ होऊ शकेल. फक्त वासाहतिक काळाचा विचार केला तरी आपल्या प्रमुख नेत्यांचे हे स्वप्न होते. विनोबांच्या आधी अनेकांनी समतेचे स्वप्न पाहिले. त्या स्वप्नाला वास्तवात आणताना साम्ययोगाची मांडणी केली. अधिक नेमकेपणाने सांगायचे तर हा प्रवास ‘पसायदान ते जय जगत्’ असा आहे.