अतुल सुलाखे

‘प्रयत्न ही प्रार्थनेची पूर्वअट आहे,’ असे विनोबा म्हणत. भूदान यज्ञ अव्यावहारिक होता, सरकारी होता की ते विनोबांचे खूळ होते अशी चर्चा सुरू झाली की ध्यानात येते की चर्चा करणाऱ्यांना भारतीय परंपरा ठाऊक नसावी, इतकेच नव्हे तर त्यांना वर्तमान प्रश्नांची तरी नेमकी समज आहे का?

त्याच वेळी भूदान यज्ञाच्या टोकाच्या समर्थकांना भूदान यज्ञाचा गाभा समजला होता का यावर टिप्पणी करणे कठीण आहे आणि तसे करूही नये. स्वराज्यप्राप्तीनंतर देशाची अर्थव्यवस्था रुळावर आणणे आवश्यक होते. आर्थिक घडी बसवायची तर थेट दंडसत्ता उपयोगात आणणे फार चुकीचे होते. त्यावेळच्या परिस्थितीला हिंसेचे आकर्षण वाटत होते. एक घाव दोन तुकडे ही मानसिकता डोके वर काढत होती. असा उतावीळपणा ही भारतीय परंपरा नव्हे. आपल्याकडे ‘साम दान दंड भेद’ अशी नीती आहे. दानऐवजी आपण चुकून दाम म्हणतो. श्रीमहेश्वर पुराणातील कौमारिका खंडात ही नीती अगदी नेमकेपणाने आढळते.

अधीष्व पुत्रकाधीष्व

तव दास्यामि मोदकान्॥५८॥

अथान्यस्मै प्रदास्यामि

कर्णावुत्पाटयामि ते॥५९॥

महेश्वर पुराण कौमारिका

खंड अध्याय ५

अर्थ :

हे मुला तू अभ्यास कर (साम). मग मी तुला मोदक देईन (दान). तू माझे ऐकले नाहीस तर मी तोच मोदक दुसऱ्याला देईन (दंड) आणि निरुपायाने तुझे कान उपटेन (भेद).

कोणत्याही प्रश्नाची तीन प्रकारे सोडवणूक होऊ शकते. कत्तल, कायदा आणि करुणा, अशीच विनोबांचीही भूमिका होती. कत्तल किंवा हिंसा ती करणाऱ्यावर हमखास उलटते. कायद्याला करुणेची जोड नसेल तर तो कायदा अधिकाधिक कडक करावा लागतो. नुसती करुणा व्यवहारात आणण्यासाठीचे धाडस समूहामध्ये नसते. यावर उपाय म्हणजे सत्य-प्रेम आणि त्यांना शिरोधार्य मानणाऱ्या समाजाची निर्मिती.

विनोबांचा करुणापूर्ण दंड शक्तीला, अर्थकारणाला विरोध नव्हता.. त्यांना बेफाम आणि बेपर्वा जीवनपद्धती अमान्य होती. आश्रमाची व्रते त्यांना घरोघरी पोहोचवायची होती. सामूहिक समाधी साधायची होती. ‘नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी,’ हा आदर्श तेही मानत होते. ‘अभिधेयं परम साम्यम्’ याचा ज्ञानदीप हाही अर्थ होतो.

विनोबा सत्य प्रेम आणि करुणेची पताका घेऊन चालत होते. एक वेळ अर्थशास्त्रज्ञाला ‘आउट पुट’ देता आले नाही तरी चालते पण आध्यात्मिक व्यक्तीला ती मुभा नसते. त्याला ऐहिक आणि पारलौकिक कल्याणाचा मार्ग दाखवावाच लागतो. एवढेच नव्हे तर त्या मार्गावर नेतृत्वही करावे लागते. केलेल्या अथवा न केलेल्या अपराधांचे खापर त्याच्यावरच फुटते.

‘..साही अपराध जनाचा..

..निंदिल ते जन सुखे निंदो द्यावे सज्जनी क्षोभावे न ये बापा..

शेवटी, ..तुका म्हणे माझे संतांवरी ओझे..’

कत्तल नको. राजकीय इच्छाशक्ती हवी आणि सत्य अहिंसेशी फारकत नको इतकी साधी विनोबांची अपेक्षा होती. आपण त्यांच्या पदरात काय टाकले या प्रश्नाचे प्रामाणिक उत्तर भविष्याच्या दृष्टीने फार महत्त्वाचे आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.