अतुल सुलाखे
गीताईची रचना करताना विनोबांना पाचव्या अध्यायाने अडवले. कर्म श्रेष्ठ की संन्यास हा प्रश्न त्यांना उलगडत नव्हता. शेवटी या दोहोंमध्ये फरक नाही हे त्यांच्या लक्षात आले तेव्हा त्यांनी गीताईच्या लिखाणास आरंभ केला. त्यांच्या नि:शंकतेचे प्रतिबिंब पुढील श्लोकात दिसते.
कर्मी अकर्म जो पाहे
अकर्मी कर्म जो तसें
तो बुद्धिमंत लोकांत
तो योगी कृत-कृत्य तो
भूदानाच्या आरंभी ते पुन्हा एकदा पेचात पडले. जमीन मागणारे, ती मागणी पुढे नेणारा आणि तिची पूर्तता करणारा सगळेच परस्परांसाठी अनोळखी होते. प्रश्न आर्थिक होता आणि तो सोडवण्याचा मार्ग नैतिक. रामचंद्र रेड्डी यांना इतक्या सहजपणे जमीन द्यावी असे वाटणे या कृतीचा अर्थ काय होता? विनोबा प्रश्नांकित झाले. रात्रभर ते या घटनेचा अर्थ शोधत होते, पण तो मिळत नव्हता. भूदान मागावे की नाही हा प्रश्न निरुत्तरित होता.
हे अजब आणि अवाढव्य दान मागण्याची क्षमता आपल्यात आहे का? आपण ना कुठल्या संस्थेचे सदस्य ना आपल्याला राजकीय पक्षाचा पाठिंबा. सहकाऱ्यांना विचारावे तर कोण हो म्हणणार? जमिनीचा प्रश्न सुटावा असे मला वाटते तर त्यासाठी तुमच्यातील किती जण दान देतील, इतक्या थेटपणे मागणी करावी लागणार होती. यासाठी किती जमीन लागणार होती तर ५ कोटी एकर! विनोबांना त्याक्षणी आपण शक्तिशून्य आहोत, हे प्रकर्षांने जाणवले.
कैसें माझें श्रेय होईल सांगा
पायांपाशीं पातलों शिष्य-भावें
हा गीताईतील श्लोक त्यांनी अंतरंगीच्या कृष्णासमोर नक्की मांडला असणार.
त्याचवेळी उमगले की हा दैवी संकेत असून परमेश्वराचा आदेश आहे. आपण भले शक्तिशून्य असू पण ‘विश्वासशून्य’ नाही. या घटनेचा अर्थ आपण समजलो नाही तर अहिंसेवर आपला विश्वास नाही असे होईल. ही अवस्था विनोबा नाकारणार हे उघड होते. गांधीजींच्याकडे आल्यापासून धारण केलेले अहिंसेचे व्रत असे सोडून द्यायचे? ते शक्य नव्हते.
अखेरीस त्यांना उमगले की विश्वशक्ती आपल्याकडून काही काम करवून घेत आहे. आपण ते नाकारणे ही आत्मवंचना होईल. यापुढे पदयात्रा करत भूदान मागायचे. त्याक्षणी विनोबा शांत झाले. त्यांनी रामाचे नाव घेतले आणि त्यांना गाढ झोप लागली.
दुसऱ्या दिवशीच्या सभेत त्यांनी बापाकडे मागावी तशी गावकऱ्यांकडे जमीन मागितली. मीही भूमिहीन आहे शिवाय तुमचा मुलगा आहे, मला माझा हिस्सा द्या. हे म्हणताना आणि ऐकताना श्रोत्यांना आणि वक्त्याला अश्रू अनावर होत होते. विनोबांनी, भूमिहीनांनी आणि उदारहृदयी ग्रामस्थांनी भगीरथ प्रयत्नाने भूदान गंगा आणली. गाव ‘शिवा’ने ती धारण केली. शिव, शिवगण आणि शिवभक्त सारे त्या गंगेने शांतावले. सारे तिचे सारखेच प्रवर्तक होते. हे साम्ययोगाचे आणखी एक रूप.
भूदानाचे हे तत्त्वज्ञान पाहिले की त्या यज्ञाच्या मूल्यमापनाचे आयाम बदलतात. तरीही या यज्ञाचे आर्थिक फलित नाकारण्याची आवश्यकता नाही. ते महत्त्वाचे आहेच.