अतुल सुलाखे

सत्याग्रह, उपोषण आदींचे एक ठरावीक रूप आपल्यासमोर असते. चंपारण ते चले जाव अशी प्रदीर्घ सत्याग्रहमाला तो समज पक्का करते. गांधीजींच्या या आंदोलनांमध्ये किती तरी नेते घडले. असंख्य अनाम सत्याग्रही धारातीर्थी पडले. यातील एकाचीही ‘आदर्श सत्याग्रही’ म्हणून निवड न करता गांधीजींनी विनोबांना पुढे केले. गांधीजींच्या कल्पनेतील सत्याग्रही नेमका कोणता होता- लढाऊ की तपस्वी? दोन्ही प्रश्नांची उत्तरे नकारार्थी आहेत. नेहमीप्रमाणे या प्रश्नाचे नेमके उत्तर विनोबांनी दिल्याचे दिसते.

एकदा विनोबांना कोणी तरी विचारले, ‘सत्याग्रह आणि अिहसेनेच आपण स्वराज्य मिळवले का?’ त्यावर विनोबा उत्तरले, ‘पूर्ण अर्थाने अिहसेने स्वराज्य प्राप्त झाले असे म्हणता येणार नाही. भारतात आम्ही जे सत्याग्रहाचे आंदोलन चालवले त्यात अनेक प्रकारची हिंसा झाली. मानसिक हिंसा किती झाली हे तर कोणालाच माहीत नाही. तरीही आम्ही एका मर्यादेचे निश्चितच पालन केले. त्यामुळेच स्वराज्य मिळाले असा दावा आम्ही करत नाही; परंतु स्वराज्य मिळण्यात सत्याग्रह आंदोलनाचा फार मोठा वाटा होता. खरे म्हणजे आमचे ते आंदोलन म्हणजे केवळ सुरुवात होती. ते अल्प आणि अविकसित शक्तीने चालवलेले आंदोलन होते.’

विनोबा पुढे म्हणतात, ‘‘सत्याग्रह नकारात्मक नसून सकारात्मक वस्तू आहे. संपूर्ण जीवन सत्याच्या आधारे उभे करण्याची गोष्ट त्यात आहे. गांधीजींनी जे केले त्याचे बाह्य रूप तेवढे आपण पाहिले. आज तेवढय़ाने भागणार नाही. ते वेगळय़ा परिस्थितीत होते. तरीही त्या वेळच्या नकारात्मक कामाला त्यांनी किती तरी विधायक कामे जोडली. लोक त्यांना विचारत असत की इंग्रजांना हटवण्यासाठी खादी,  ग्रामोद्योग, अस्पृश्यता निवारण यांची काय गरज आहे? ही समाजसुधारणेची कामे आहेत. परंतु खरे म्हणजे ही सत्याग्रहाचीच अंगे आहेत.’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘गांधीजींची कल्पना नकारात्मक  असती तर त्या कल्पनेला रचनात्मक कार्याची सेवा-कार्याची जोड त्यांनी दिली नसती. मला मग देशासमोर एक सत्याग्रही म्हणून उभे करण्यात अर्थ नव्हता. लोक तर तेव्हा मला ओळखतच नव्हते. कोणतेही उल्लेखनीय राजकीय काम माझ्या हातून घडले नव्हते. गांधीजींनी माझ्यात आणखी गुण पाहिला असेल-नसेल एक गुण तर नक्कीच पाहिला की याचा मेंदू कन्स्ट्रक्टिव्ह (रचनात्मक) आहे, डिस्ट्रक्टिव्ह (विध्वंसक) नाही. सत्याग्रहाने रचनात्मक काम करणे ते आवश्यक मानत होते हे यावरून स्पष्ट होते. ते तर इथपर्यंत म्हणत की, रचनात्मक कार्य पूर्ण झाले की स्थूल सत्याग्रहाची आवश्यकताच पडणार नाही. अशी त्यांची श्रद्धा होती. सत्याग्रहाचा कोणताही नकारात्मक  अर्थ त्यांच्या मनात नव्हता हेच यावरून दिसते.’ गांधीजी आणि विनोबांचे वैचारिक नाते सत्याग्रहाचा अर्थ उमजला की नीट लक्षात येते. गांधीजींच्या विचारांचा विनोबांच्या हयातीत झालेला प्रवास तसा का होता हेही ध्यानात येते. त्यांच्या जवळपास प्रत्येक राजकीय आणि सामाजिक कृतीची संगती सत्याग्रहाचे तत्त्वज्ञान सांगते.