अतुल सुलाखे

शिक्षण आणि विनोबा यांच्यात अभेद होता. विद्यार्थी आणि शिक्षक अशा दोन्ही भूमिकांमध्ये ते अलौकिक होते. लांब-रुंद अभ्यासापेक्षा ते सखोल अभ्यासाला महत्त्व देत. ‘खोली पेर पण ओली पेर’ हे शेतीचे सूत्र ते अभ्यासालाही लावत. स्वत:ला ते मध्यम बुद्धीचा प्राथमिक शिक्षक समजत तर लोक त्यांना जंगम (चालतेबोलते) विद्यापीठ म्हणत. चालतेबोलते विद्यापीठ या विशेषणाचा अर्थ इतकाच की एखाद्या विद्यापीठात शिकवले जाणारे सर्व विषय या एकाच माणसामध्ये सामावले होते.

विनोबांच्या भाषेबाबत ते वापरत असणाऱ्या उपमांमुळे भल्याभल्यांची फसगत होते. त्यांच्या अपार साध्या आणि सोप्या भाषेमागचा अफाट व्यासंग लक्षात येत नाही. या व्यासंगाला कृतीची आणि साधनेची जोड असल्याने त्यांना एखादी गोष्ट पूर्णपणे वेगळी दिसत असे. मोक्ष म्हणजे मोहाचा क्षय, हिंदू म्हणजे हिंसेमुळे दु:खी होणारा अशी चकित करणारी उकल या व्यासंग आणि अशा दर्शनाची बोलकी उदाहरणे आहेत. व्यासंग निरुक्ताचा तर दर्शन अिहसेचे.

विनोबांचे हे अध्ययन किमान सात दशके आणि सर्व प्रकारच्या परिस्थितीत सुरू होते. त्यांनी ग्रंथालयातही अध्ययन केले आणि मैला सफाई करतानाही केले. मैला साफ करताना ते आरोग्यविषयक प्रश्नांचा अभ्यास करत. भारतीय आणि आधुनिक विद्याशाखा यातील त्यांचे अध्ययन अद्भुत होते. या प्रकांडपंडिताने शिक्षकासाठी एक शब्द सांगितला. ‘गातुविद’. इंग्लिशमध्ये यासाठी पाथ फाईंडर (Path- finder) असा शब्द आहे. म्हणजे मार्ग जाणणारा नव्हे तर मार्ग शोधणारा. नवमार्ग शोधक किंवा सत्यमार्ग शोधक.

या अनुषंगाने विनोबा, गांधीजींचा अनुयायी नव्हे तर त्यांचा विचार कवेत घेऊन त्याचा अभिनव विकास करणारे कर्मयोगी ठरतात. आचार्य जावडेकर यांच्या शब्दात सांगायचे तर, ‘‘विनोबांना गांधींसारखे राजकारण करावयाचे नसून त्यांनी केलेल्या राजकारणापुढील राजकारण करावयाचे आहे. राज्यसंस्थेच्या शासनातून समाजाला मुक्त कसे होता येईल आणि केवळ धर्मभावनेने आपले संरक्षण कसे करता येईल ते दाखवून देऊन समाजाला सहकारी व स्वावलंबी बनण्याचे सामथ्र्य प्राप्त करून देणे हे विनोबांचे राजकारण आहे.

त्यांनी सामाजिक व आर्थिक क्रांतिकार्याला धर्मसंस्थापनेची प्रतिष्ठा प्राप्त करून दिली असून मोक्षप्राप्तीच्या मागे लागलेल्यांना अथवा लागू इच्छिणाऱ्यांना क्रांतिकार्याची दीक्षा दिली आहे. जर भारतीय अंत:करणात धर्मभावना व मोक्षप्रवृत्ती सुप्त स्वरूपात का होईना अस्तित्वात असतील तर त्या जागृत व प्रभावी होऊन आपल्या राष्ट्रात व जगात शांतता युगाची स्थापना करतील.’’

आचार्याच्या या चिंतनाला आज सात दशके झाली. हे मूलगामी चिंतन इथल्या बुद्धिजीवींनी एक तर पाहिले नसावे किंवा त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले असावे. आचार्याच्या या चिंतनात विनोबांची केवळ स्तुती नाही त्यातील तत्त्वज्ञानाचा वेध आहे. आचार्यानी म्हटले नसले तरी इथे ‘अभिधेयं परम साम्यम् आणि तत: शासनमुक्ति’ या दोन साम्यसूत्रांची आठवण होते. साम्ययोगात या दोन सूत्रांना कळीचे स्थान आहे. सारांश विनोबांनी ज्या नवमार्गाचे शोधन केले तो ‘साम्ययोगा’चा मार्ग आहे.