अतुल सुलाखे

सर्वोदय समाजाच्या अधिवेशनासाठी विनोबांनी आपल्या सहकाऱ्यांसह शिवरामपल्लीच्या दिशेने कूच केले. त्यांची ही पदयात्रा काहीशी अनपेक्षित होती. पूर्वतयारी न करता यात्रा सुरू झाली. भौतिक तयारी नसली तरी त्यांनी यात्रेसाठी आवश्यक असणारी मानसिक शक्ती मात्र मिळवली.

पदयात्रेच्या आरंभी त्यांनी बापू कुटीत जाऊन दर्शन घेतले. काही महत्त्वाच्या सहकाऱ्यांशी चर्चा केली. विनोबांसोबत त्यांच्या कांचनमुक्ती प्रयोगातील सहकारी होते. या सहकाऱ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले, ‘एखादा विशिष्ट हेतू घेऊन आपण ही पदयात्रा सुरू केलेली नाही. ठिकठिकाणच्या लोकांना भेटावे, त्यांचे प्रश्न समजावून घ्यावेत आणि त्यावर एखादा उपाय शोधावा, इतक्या साध्या हेतूने आपण निघालो आहोत.’ या पदयात्रेतील विनोबांचा दिनक्रम आश्रमाप्रमाणेच होता. हा त्यांचा फार मोठा विशेष म्हणावा लागेल. भूदान यात्रेमध्ये त्यांच्या अध्ययन आणि अध्यापनामध्ये जराही खंड पडला नाही. ‘जंगम विद्यापीठ’ हे कुंदरजी दिवाण यांनी केलेले त्यांचे वर्णन हमखास स्मरते.

यात्रेच्या वाटेवरील गावांमध्ये विनोबांचे मोठय़ा प्रेमाने स्वागत होत असे. लोक त्यांच्या दर्शनाने आनंदित होत. गावांची अवस्था पाहून विनोबा दु:खी होत. गावात गेल्यावर विनोबा प्राधान्याने दलित वस्तीत जात. त्यांची दु:खे जाणून घेत. गावातील इतरांच्याही समस्या ते समजून घेत. संध्याकाळच्या सभेत या समस्यांवर मार्गदर्शन करत. सर्वोदयाचा विचार ग्रामस्थांच्या समोर मांडत. कामरेड्डी गावात विनोबांना गारपिटीचा तडाखा सोसावा लागला. त्यांच्या अंगात दीड ताप होता. पुढचा मुक्काम १७ मैलांवरील गावात होता. विनोबांनी जवळच्या गावात मुक्काम हलवावा, असे सगळय़ांनी सुचवले. विनोबांनी मात्र स्पष्ट नकार दिला. ‘आपल्या प्रत्येक संकल्पात ईश्वर साक्षी असतो. निश्चय पूर्ण केलाच पाहिजे.’

पुढचे चार दिवस अंगात ताप असताना विनोबा रोज १५-१६ मैल चालत होते. लोकांशी संवाद साधत होते. पांढरकवडा गावात विनोबांच्या हस्ते कताई मंडळाची स्थापना करण्यात आली. कोशलपूर गावातील हनुमान मंदिरात दलितांना प्रवेश नव्हता. तसेच पाणी भरण्यासाठी मज्जाव होता. विनोबांनी हे दोन्ही प्रश्न सामोपचाराने सोडवले. सोनगावामध्ये शाळा नव्हती. तिथे सर्वोदय विद्यालयाची स्थापना करण्यात आली. गावातील शिकलेल्या लोकांनी सकाळ- संध्याकाळ एकेक तास शाळा चालवावी अशी सूचना विनोबांनी केली. चार जण तयार झाल्यावर विनोबांनी १० वर्षांची योजना आखून दिली.

पदयात्रेत विनोबा खेडय़ांची दशा पाहात होते. त्यांनी कल्पना केली होती त्यापेक्षा खेडय़ांची स्थिती भयावह होती. शिक्षणाची सोय नाही. रोजगारही नाही. जाती-पातींची समस्या तीव्रतेच्याही पलीकडे होती. लोक व्यसनाधीन झाले होते. नुकतेच मिळालेले स्वातंत्र्य या समस्यांची सोडवणूक करेल, अशी लोकांची अपेक्षा होती. प्रत्येक गावात आपणच राहावे आणि प्रश्नांची सोडवणूक करावी असे विनोबांना वाटत होते. अर्थात ते शक्य नव्हते. गावांचे दैन्य पाहून विनोबांनी सरकारला फटकारले. लोकांना धीर देत मार्ग दाखवला आणि पुढच्या गावांची स्थिती अभ्यासण्यासाठी ते मार्गक्रमण करू लागले.