अतुल सुलाखे
सत्य संकल्पाचा दाता नारायण।
सर्व करी पूर्ण मनोरथ ॥१॥
येथें अळंकार शोभती सकळ।
भावबळें फळ इच्छेचें तें ॥ध्रु.॥
अंतरींचें बीज जाणे कळवळा।
व्यापक सकळां ब्रम्हांडाचा ॥२॥
तुका म्हणे नाहीं चालत तांतडी।
प्राप्त काळ घडी आल्याविण ॥३॥
– संत तुकोबा
पोचमपल्लीमधील लोकांनी ८० एकर जमिनीची मागणी केली. विनोबा म्हणाले, ‘एवढी जमीन तुम्हाला मिळवून दिली तर तुम्ही ती सामुदायिक पद्धतीने कसाल का? कारण प्रत्येकाला जमिनीचा स्वतंत्र तुकडा देता येणार नाही. या प्रस्तावात आणखी एका क्रांतिकारी कल्पनेचे बीज होती. ही कल्पना म्हणजे ग्रामदान. जमीन समूहाच्या म्हणजे गावाच्या मालकीची होणार असल्याने ती विकणे अशक्य होणार होते. भूमी, ग्राम, प्रखंड असे समग्र दान विनोबांनी मागितले त्याचे बीज कळत नकळत पोचमपल्ली येथे पेरले गेले.
विनोबांचा प्रस्ताव गावकऱ्यांनी स्वीकारला आणि विनोबांनी तो सरकारकडे मांडण्याचे आश्वासन गावकऱ्यांना दिले. तथापि, ते मनातून साशंक होते. कारण यापूर्वी सरकारने जमिनीच्या प्रश्नावर त्यांना दिलेले आश्वासन पाळले नव्हते. तो प्रश्न निर्वासितांना जमीन देण्याचा होता. ते भूमिहीन दलित बांधव होते आणि त्यांचे पुनर्वसन करण्याची जबाबदारी नेहरू आणि राजेंद्रप्रसाद यांनी घेतली होती. तरीही विनोबांना दिलेल्या वचनाची पूर्तता झाली होती. पोचमपल्लीच्या भूमिहीनांच्या वाटय़ाला निराशा येऊ नये म्हणून विनोबांनी गावकऱ्यांकडून आणखी अपेक्षा केली.
सरकारने हे वचन पाळले नाही किंवा उशीर केला तर गावपातळीवर काही व्यवस्था होऊ शकेल का? रामचंद्र रेड्डी या यज्ञात दानाहुती देण्यासाठी उभे राहिले. या लोकांना जमीन द्यावी अशी आमच्या वडिलांची इच्छा होती तेव्हा आम्ही पाच भाऊ मिळून शंभर एकर जमीन या बांधवांना देऊ, असे त्यांनी लिखित स्वरूपात कळविले. जगाच्या आणि देशाच्या दृष्टीने हा ऐतिहासिक क्षण होता आणि विनोबांच्या दृष्टीने ‘ईश्वरी साक्षात्कार’. त्या रात्री त्यांना झोप आली नाही. हे कार्य ईश्वराचे आहे आणि ते कार्य तो आपल्या माध्यमातून करून घेतो आहे, हे विनोबांच्या ध्यानी आले. नंतरच्या काळात, ‘भूदानाला अपयश आले तर तो परमेश्वराचा पराभव असेल’ या त्यांच्या उद्गारला पोचमपल्लीचा संदर्भ होता.
विनोबांच्या या कृतीमध्ये राजकारण होते का? याचे उत्तर होकारार्थी असेल. या युगात राजकारण टाळता येणार नाही. राजकारण करावे पण ते गुप्त ठेवावे हा समर्थाचा उपदेश त्यांचा आदर्श होता. मानवी समाज, अहिंसक आणि साम्याधिष्ठित रूपात असावा आणि त्यांच्या वाटय़ाला पाशवी दु:ख येऊ नये हे त्यांचे व्यापक राजकारण होते. काँग्रेसविषयी त्यांना आपुलकी वाटणे स्वाभाविक होते, परंतु त्यांनी या पक्षाची भलामण कधीच केली नाही. पुढे भूदानापेक्षा पहिली निवडणूक महत्त्वाची आहे हे सर्व नेत्यांनी त्यांना दाखवून दिले. यावर सूर्य नेहमी एकाकी चालतो आणि एकला चलो रे ‘भाग्यवान’ अशी भूमिका घेत विनोबा सामाजिक साम्य स्थापनेसाठी वाट तुडवत राहिले. संतांचा संकल्प मुळात ईश्वराचा संकल्प असतो. त्यामुळे संत संकल्प करतात तेव्हा देवाला त्यांना बळ द्यावेच लागते.