अतुल सुलाखे

देशाला स्वातंत्र्य मिळाले आणि त्याचे स्वागत अपार हिंसेने झाले. कोणत्याही हिंसेची पहिली झळ समाजातील वंचित घटकांना बसते. विनोबा नेहमीच वंचित घटकांचे पाठीराखे होते. ‘मी अस्पृश्य म्हणून जन्माला आलो असतो तर माझी अहिंसा डळमळीत झाली असती.’ या उद्गारांवरून त्यांची कळकळ जाणवते. विधायकतेच्या मार्गाने समत्व ही त्यांची कार्यपद्धती असली तरी शासनकर्ते, न्यायालये, यांनी आपली जबाबदारी ओळखली नाही तर विनोबा प्रसंगी तीव्र नाराजी प्रकट करत. सेवेतून देशवासीयांची प्रतिष्ठा वाढवणे ही त्यांची उन्नतीची कल्पना होती. ‘मंत्र देतो तो मंत्री. तुमच्याकडे कोणता नवा मंत्र आहे?’ असेही ते मंत्र्यांना विचारत.

या अनुषंगाने स्वातंत्र्य मिळाल्यावर विनोबांनी शिक्षणाची नवीन योजना कशी असावी यावर आपली भूमिका स्पष्ट केली. मुलांना सुट्टी द्यावी आणि संपूर्ण अभ्यासक्रमाची फेररचना करावी. विनोबांचा शिक्षणविचार व्यवहारी जगाला झेपणारा नव्हता. सरकारने तो अर्थातच बाजूला ठेवला. अशातच पहिली पंचवार्षिक योजना जाहीर झाली आणि ती पाहून विनोबा संतापले.

फाळणीमुळे गहू उत्पादक पंजाब आणि तांदूळ व ताग उत्पादक पूर्व बंगाल आणि कापूस उत्पादक सिंध हे प्रांत पाकिस्तानात गेले. शेती आणि उद्योगांसाठी हा मोठा फटका होता. यामुळे विस्कळीत झालेली अर्थव्यवस्था सावरणे हे पहिल्या पंचवार्षिक योजनेचे उद्दिष्ट होते. यानुसार सिंचन, जलविद्युत आदी बडय़ा प्रकल्पांसाठी एक हजार १६० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. त्यातील केवळ ३१ टक्के रक्कमच शेतीसाठी राखून ठेवली होती.

ही योजना विनोबांना दाखवावी अशी सूचना नेहरूंनी केली. त्यानुसार नियोजन समितीचे सदस्य १० ऑगस्ट १९५१ रोजी विनोबांच्या भेटीसाठी पवनारला दाखल झाले. ही योजना पाहून विनोबांनी तीव्र असंतोष प्रकट केला. ११ सप्टेंबर रोजी एका पत्राद्वारे त्यांनी आपली भूमिका नेहरूंना कळवली. त्याला उत्तर म्हणून पंडितजींनी त्यांना दिल्लीत यावे आणि नियोजन मंडळासमोर आपले विचार मांडावेत असे सांगितले. मी पायी दिल्लीला येईन ही विनोबांची सूचनाही त्यांनी मान्य केली. त्यानुसार १२ सप्टेंबर रोजी विनोबांनी पवनार सोडले आणि ते दिल्लीकडे रवाना झाले.

सोबत असणाऱ्या कार्यकर्त्यांना ते म्हणाले, ‘मी जे काम सुरू केले आहे त्याला भूदान यज्ञ असे नाव दिले आहे. केवळ भूदान नव्हे. दान कोण करेल? जो श्रीमंत आहे तो. परंतु यज्ञात तर लहान-थोर असे सर्व भाग घेऊ शकतात. आपल्या देशात देण्याची वृत्ती वाढवायची आहे. भूदान म्हणजे केवळ जमीन देवविण्याचे काम समजू नका, ते एक अहिंसक क्रांतीचे काम आहे.’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दिल्लीला जाण्यासाठी विनोबा निघाले तेव्हा कुणालाही कल्पना नव्हती की विनोबा यापुढे १२ वर्षे भटकंती करणार आहे. एका अहिंसक क्रांतीचा हा जन्म आहे. हा क्षण मानवतेला दिशा देणारा आणि भारतातील कष्टकऱ्यांना धीर देणारा आहे. रशियन क्रांतीचे वर्णन करताना ‘जगाला धीर देणारे १० दिवस’ असे म्हटले जाते. या अहिंसक क्रांतीचे वर्णन ‘दानदीक्षा देणारा क्षण’ असे करता येईल.