अतुल सुलाखे

विनोबा भूदानात लोकांशी सतत संवाद साधत. त्यात अभ्यास, कळकळ आणि क्रांतिकारी विचार असत. त्यांचा हा संवाद संकलित करणे ही एक प्रदीर्घ प्रक्रिया आहे. त्यातील बराच भाग संकलित झाला असला आणि त्यावर संशोधन झाले असले तरी हे काम काही पिढय़ांचे आहे. आजही एखाद्या वाडी वस्तीवर गीता प्रवचने दिसतात. ती ज्ञानेश्वरीसोबत आढळतात. एक मोठा समूह या यज्ञात सहभागी झाल्याच्या या खुणा आहेत. भूदानात फक्त ठरावीक गटाने जमीन द्यावी आणि काहींनी ती घ्यावी हे विनोबांना नामंजूर होते. हा यज्ञ आहे आणि त्यात प्रत्येक व्यक्तीचा सहभाग हवा हा त्यांचा आग्रह होता. मुळात त्यांना जमीन ‘देणे’ ही गोष्टही नामंजूर होती. तो गरिबांचा अधिकार आहे, असे सांगून त्यांनी दान शब्दातून येणाऱ्या नकारात्मकतेला छेद दिला.

विनोबांच्या या व्यापक चिंतनाला रामकृष्ण परमहंसांच्या जन्मगावी म्हणजे कामारपुकूर येथे नेमके रूप मिळाले. भूदान यात्रा तिथे गेली आणि त्या अनुषंगाने झालेल्या संवादात विनोबा म्हणाले, ‘रामकृष्ण परमहंस अत्यंत सहजपणे समाधी अवस्थेत जात. आपल्यासमोरचे आव्हान आणखी मोठे आहे. आपल्याला सामूहिक समाधी अवस्था गाठायची आहे.’ विनोबांना योग, समाधी यांचे कालसुसंगत आणि व्यापक अर्थ अभिप्रेत असत. आठ तास शरीरपरिश्रम ही विनोबांच्या लेखी योगसाधनेची पूर्वअट होती. खुद्द रामकृष्ण परमहंसांचे तमाम अध्यात्म भूतमात्रांच्या सेवेत लोपले होते. विनोबांच्या सामूहिक समाधीमध्ये रामकृष्ण आणि गांधीजींचा अनोखा मेळ दिसतो. जे गुण व्यक्तीच्या ठायी असावेत असे वाटते ते सामूहिक पातळीवर आले पाहिजेत हा विनोबांचा आग्रह होता. गांधीजींनी आश्रमाचे नियम केले, ते जुन्या काळी व्यक्तिगत आध्यात्मिक साधनेचे नियम होते. रामकृष्णांनी आपली व्यक्तिगत साधना सर्वधर्मसमन्वयासाठी आणि मानवसेवेसाठी खर्ची घातली. एवढेच नव्हे तर त्यांनी विवेकानंदांनाही तोच मंत्र दिला. भूदान यज्ञ हा सामूहिक समाधीचा सर्वोच्च आविष्कार होता.

भूदान यज्ञाने परंपरेचे जतन झाले, तसेच त्यामुळे दोन आधुनिक मूल्यांना गती मिळाली. पहिले आर्थिक समत्वाचे मूल्य होते. आर्थिक समता साधत असताना व्यक्तीची प्रतिष्ठा उंचावेल याची काळजी घेतली गेली. समता आणि प्रतिष्ठा यांचा एकत्रित आढळ म्हणजे बंधुता. प्रतिज्ञेतील हे मूल्य भूदानामुळे प्रतिष्ठित झाले. याचे विविध पातळय़ांवर चांगले परिणाम झाले. मात्र त्यांचा क्रमश: विसर पडला. हा केवळ जमिनीसाठीचा कार्यक्रम नाही तर तो अहिंसक क्रांतीचा प्रयत्न आहे, हे विनोबांनी कितीही वेळा सांगितले असले तरी ही पदयात्रा तेवढय़ापुरतीच पाहिली गेली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ही कोंडी सामान्य जनतेनेच फोडली. विनोबांना एकाही ठिकाणी भूदानाला नकार मिळाला नाही. कारण जनतेला विनोबांच्या प्रयत्नांचे मोल समजले होते. भूदानाशी जोडलेले असंख्य पवित्र प्रसंग भूदानाबाबत जनतेचे प्रगल्भ आकलन दाखवणारे आहेत. केवळ एखादी व्यक्ती, ठरावीक पक्ष किंवा निव्वळ प्रतिक्रियात्मक कार्य भूदान यज्ञाला जन्म देऊ शकत नाही. ‘स्व’चे विसर्जन आणि समूहाचे सर्जन त्यासाठी अत्यावश्यक असते. भूदानाचा हा शाश्वत संदेश आहे.