अतुल सुलाखे

तूं माझी माउली मी वो तुझा तान्हा।

पाजी प्रेमपान्हा पांडुरंगे॥

तूं माझी गाउली मी तुझें वासरूं।

नको पान्हा चोरूं पांडुरंगे ॥

तूं माझी हरिणी मी तुझें पाडस।

तोडी भवपाश पांडुरंगे॥

तूं माझी पक्षिणी मी तुझें अंडज।

चारा घाली मात्र पांडुरंगे॥

कासवीची दृष्टी सदा बाळावरी।

तैसी दया करीं पांडुरंगे॥

नामा म्हणे विठो भक्तीच्या वल्लभा।

मागें पुढें उभा सांभाळिसी॥

संत नामदेवांवर विनोबांचे विशेष प्रेम होते. विनोबा त्यांचे वर्णन प्रेमळ संत असे करत. भूदान यात्रेत नामदेवांच्या भक्तीचे आणि प्रेमाचे स्मरण विनोबा सतत करत असत. या यात्रेत माझ्यापुढे नामदेव चालत होते असे विनोबांचे म्हणणे होते. या यात्रेत तब्बल १९ हजार ४३६ एकर जमिनीचे दान घेऊन ठरल्याप्रमाणे विनोबा दिल्लीला पोहोचले. तिथे त्यांचा मुक्काम ११ दिवस होता. या काळात त्यांची नियोजन मंडळाच्या सदस्यांशी चर्चा झाली.

प्रत्येकाला काम, ग्रामोद्योगांना चालना, शेतीसुधारणा, गोवंश हत्याबंदी आणि मूलभूत शिक्षण पद्धती या पाच गोष्टी नियोजन मंडळासमोर ठेवल्या. तथापि मंडळाने त्यांचा स्वीकार केला नाही. विनोबांचा दिल्ली दौरा निष्फळ ठरला.अखेरीस २५ नोव्हेंबर १९५१ रोजी त्यांनी दिल्ली सोडली. भूदान हे एकमात्र ध्येय ठेवून आपल्या सहकाऱ्यांसह त्यांनी पदयात्रा सुरू ठेवली. भूदानाचे कार्य म्हणजे ईश्वराची आज्ञा आहे, हे त्यांनी अंतर्मनातून स्वीकारले होते. त्यामुळे भूदानाचा पराभव हा प्रत्यक्ष परमेश्वराचा पराभव असेल, अशी भूमिका त्यांनी घेतली.

भूदानामध्ये दान महत्त्वाचे होते तसे विभागणीलाही महत्त्व होते. ‘दा’ धातूचा एक अर्थ देणे असा आहे तर दुसरा अर्थ तोडणे असा आहे. आपल्याजवळची चांगली गोष्ट तोडून दुसऱ्याला देणे म्हणजे दान. भूमी ही चांगली वस्तू आहे तर तिचा सहावा हिस्सा आपल्याच बांधवांना देणे हा भूदानाचा नेमका अर्थ आहे. ही परंपरा गौतम बुद्ध आणि शंकराचार्याची. दान म्हणजे सम विभाग आणि दान म्हणजे सम्यक् विभाजन ही दोन सूत्रे दोन परंपरांचे प्रतिनिधित्व करणारी आहेत. विनोबांनी या दानाला भूमीचे परिमाण जोडले आणि ही दान परंपरा विशाल झाली. महाकाव्ये आणि संतवचनांच्या आधारे ते दानाचा महिमा सांगत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भूदानात विनोबांची आणि जनतेची हृदये उचंबळून येणारे कित्येक प्रसंग दिसतात. अशा क्षणी विनोबा फक्त प्रार्थना करत. देवाचे बळ या कामाच्या पाठीशी उभे आहे असे मी प्रतिक्षणी अनुभवतो आहे. मी प्रार्थना करतो की, ‘लोक मला जमीन देवोत वा न देवोत. तुझी इच्छा असेल तसे होऊ दे. पण माझे तुझ्याजवळ एवढेच मागणे आहे की मी तुझा दास आहे. माझे अस्तित्व नाहीसे कर. नाव पुसून टाक. तुझेच नाव जगात चालो. तुझेच नाव राहो. जे काही राग, द्वेष आदी विकार माझ्या मनात असतील त्या सर्वातून तू या बालकास मुक्त कर!!’