अतुल सुलाखे

विनोबा, हिंसेने होरपळलेल्या तेलंगणमध्ये सर्वोदय संमेलनाच्या निमित्ताने गेले. ३० दिवस आणि ३५० मैलांची पदयात्रा केली. जिथे मुक्काम केला तिथल्या गावकऱ्यांची मने आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. ७ एप्रिल, १९५१ रोजी ते शिवरामपल्लीला पोहोचले. या संमेलनासाठी देशभरातून कार्यकर्ते आले होते. संमेलनातील सर्व चर्चा जमीनदार आणि पोलीस व त्याच वेळी प्रत्युत्तर म्हणून सुरू असणारी कम्युनिस्टांची हिंसा याभोवती फिरत होती. या हिंसाचारात भूमिहीन आणि गरीब शेतकरी भरडले जात होते. कम्युनिस्टांना कसे रोखायचे यावर चर्चा सुरू होती.

विनोबांनी मात्र वेगळीच भूमिका घेतली. जमीनदारीमुळे साम्यवाद फोफावतो आहे, हे त्यांना मान्य नव्हते. जमिनीच्या प्रश्नावर अन्य कुणी काम करत नसल्याने या भागात कम्युनिझम फोफावतो आहे, असे ते म्हणाले. त्यांनी जमिनीच्या प्रश्नाची फेरमांडणी करताना सांगितले की, प्रत्येकाला शेतीत काम करण्याची संधी मिळाली पाहिजे. न्यायाधीशांपासून भूमिहिनांपर्यंत सर्वानी शेतकाम केले पाहिजे. प्रत्येकाला जमिनीचा तुकडा देता येईल का, या प्रश्नावर विनोबांनी उत्तर दिले की ही गोष्ट शक्य आहे. नापीक जमीन घ्यायची आणि ती लागवडीयोग्य करायची हा त्यावरचा उपाय आहे आणि अशी जमीन कसणे हे खरे आव्हान आहे. त्या जमिनीच्या हस्तांतराची कायदेशीर प्रक्रियाही सोपी आहे.

भूदानामध्ये अनेकांनी नापीक जमिनी देऊन विनोबांची फसवणूक केली अशी टीका सर्रास होते. तथापि नापीक जमिनी नाकारायच्या नाहीत, अशी विनोबांची सुरुवातीपासूनची भूमिका होती. शिवरामपल्लीच्या या संमेलनाला स्वामी रामानंद तीर्थ उपस्थित होते. त्यांनी या भागातील दु:खद स्थिती विनोबांसमोर मांडली आणि तेलंगणात पदयात्रा करण्याची विनंती केली. विनोबा शिवरामपल्लीमध्ये एक आठवडा राहिले. परिसरातील दलित, भूमिहीन आदींशी त्यांनी चर्चा केली. त्यांचे प्रश्न समजून घेतले आणि कम्युनिझमचा प्रभाव असणाऱ्या भागात पदयात्रा करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी सरकारची परवानगीही घेतली. विनोबांनी पदयात्रा सुरू केली तेव्हा हा भूभाग कसा होता?

हैदराबाद राज्यात एकूण जमीन ५ कोटी ६० लाख एवढय़ा जमिनीची नोंद होती. यापैकी ६० टक्के म्हणजे ३ कोटी जमीन मालगुजारांकडे होती. यातील ३० टक्के जमीन जागिरीची आणि १० टक्के जमीन निजामाची होती. परिणामी या भागातील शेतमजूर आणि गरीब शेतकरी गुलामीचे जीवन जगत असणार हे उघडच होते. जमिनीच्या व्यक्तिगत मालकीचा विचार केला तर १ लाख ते १० हजार एकर जमीन बाळगणारे जमीनदार होते. ही इथल्या भूमिहिनांची आणि गरीब शेतकऱ्यांची स्थिती होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अशा परिस्थितीत विनोबांनी हिंसा आणि सत्याग्रह यापेक्षा करुणा आणि प्रेम यांच्या आधारे भयभीत आणि आक्रमक जनसमूहांना शांत केले. विनोबांनी अव्यवहार्य मार्गाने जात जमिनीचा प्रश्न बोथट करून टाकला अशी टीका होते, परंतु त्या परिस्थितीत हिंसा अथवा अहिंसा यांचा शस्त्र म्हणून वापर करणे हे सर्वोदयाच्या तत्त्वज्ञानाविरुद्ध होते. विनोबांचे कृषी-तत्त्वज्ञान आर्थिक, राजकीय आणि आध्यात्मिक परिमाणांनी युक्त होते. भारतीय समाजमानसावर त्याचे दूरगामी परिणाम झाले.