अतुल सुलाखे

भूदान यज्ञाचा विशेष म्हणजे जमीन देणाऱ्यांमध्ये भौतिक अर्थाने गरीब आणि आध्यात्मिक अर्थाने श्रेष्ठ दाते होते. भूदान यात्रेत विनोबांना नेहमीच भरघोस दान मिळाले नाही. संपूर्ण देशात भूदानाला प्रतिसाद मिळत असताना काही राज्यांमध्ये रोज जेमतेम चार-पाच एकर जमीन मिळाली, असेही घडले होते. गया जिल्ह्यात फिरताना त्यांना एक दिवस फक्त सवा एकर जमीन मिळाली. हा देवाचा प्रसाद आहे आणि आपण तो स्वीकारून भ्रमंती करायची ही त्यांची भूमिका होती.

केरळमधून धाडलेल्या एका पत्रात त्यांनी नोंदवले की ‘काही वेळा दिवसाच्या शेवटी दानाच्या समोर शून्य लिहावे लागते. अशा वेळी शून्यातही शक्ती असते.’ लौकिक यशापयशाला त्यांनी फारसे महत्त्व दिले नाही. एकदा दुपारच्या वेळी रामगढचे राजेसाहेब त्यांच्या भेटीसाठी आले. त्यांनी एक लाख एकरांचे दान केले. विनोबांनी ते दानपत्र स्वीकारले आणि पुन्हा वाचनात मग्न झाले. दान मिळाले म्हणून आनंद नाही आणि मिळाले नाही म्हणून खेद नाही. गीताईचा दाखला द्यायचा तर,

कर्मातचि तुझ़ा भाग

तो फळांत नसो कधी

नको कर्मफळी हेतू

अकर्मी वासना नको

सारांश, भूदान यज्ञ हे मानवाला उन्नत करणारे कार्य होते. एका अर्थी ती मनाची मशागत होती. विनोबांच्या मते, ‘मनुष्य जसजसा सुसंस्कृत होईल तसतशी त्याला आपल्या संग्रही वृत्तीची लाज वाटेल. पूर्वीच्या काळी मोठमोठय़ा राजांना किती तरी राण्या असत. त्याची लाज वाटणे दूरच उलट त्यात प्रतिष्ठा मानली जाई. आज एखाद्याला दोन बायका असल्या तर तो खाली मान घालून स्पष्टीकरण देतो. एवढा मोठा फरक झाला आहे. थोडक्यात आजवर कामनियमन झाले. आता अर्थनियमन करायचे आहे. यामुळे काही दिवसांनी असे होईल, की, आपल्या जवळ जास्त जमीन आहे हे सांगायची माणसाला लाज वाटेल.’

एकदा एक तरुण पाच एकर जमिनीचे दानपत्र देऊन गेला. घरी गेल्यावर त्याच्या आईने, किती जमीन दिलीस हे विचारले. पाच एकराचा आकडा ऐकून ती माउली नाराज झाली. ती म्हणाली, ‘बाबा, आपल्याला सहावा हिस्सा मागतात. आपल्याकडे साठ एकर जमीन आहे. तू फक्त पाच एकर जमीन दिलीस. परत जा आणि त्यांची क्षमा मागून दहा एकरांचे दान करून ये.’ दुसऱ्या दिवशी तो परत गेला आणि पाचऐवजी दहा एकरांचे दान करून आला.

काश्मीर यात्रेमध्ये विनोबा, अत्यंत कठीण पदयात्रा करत होते. भूदानासाठी पीर पंजालच्या साडेतेरा हजार फूट उंचीवर चालणाऱ्या विनोबांचे छायाचित्र पाहून एका माउलीने विनोबांना भूदानपत्र पाठवले. ते पाहून विनोबा म्हणाले, ‘मी पीर पंजालच्या साडेतेरा हजार फूट उंचीवर चढलो होतो, पण या बाईची उंची पीर पंजालपेक्षा अधिक आहे.’

‘दानं भोगो नाश:’ असे एक वचन आहे. संपत्ती तीन वाटांनीच जाते. दान, भोग अथवा नाश. विनोबांची आई म्हणत असे, ‘देतो तो देव आणि राखतो तो राक्षस.’ भूदान घेत विनोबा, माणसातील देव जागा करत होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

jayjagat24@gmail.com