अतुल सुलाखे

श्रीविष्णूंचा भक्त म्हणजे भागवत मग त्याचे स्थान कोणतेही असो. हे तत्त्व स्पष्ट करताना विनोबांनी एक सुंदर वचन सांगितले आहे. ‘भीष्म म्हणजे भयंकर आणि बिभीषण म्हणजेही भयंकर पण पुराणे या दोघांना भागवत म्हणतात.’

विनोबांनी पुराणांचेही नेमके वर्णन केले आहे. ‘पुराणे म्हणजे एक प्रकारचा इतिहासच आहे. पुराणे पावसाच्या पाण्यासारखी आहेत. हे पाणी पडेल तेवढे पडू द्यावे. वाहील तेवढे वाहू द्यावे.’

या पुराणांमध्ये श्रीमद्भागवत हे महापुराण सर्वश्रेष्ठ, सौम्यतम आणि तत्त्वज्ञान सोप्या रीतीने मांडणारे अशी मान्यता आहे. भागवताने प्रभावित झाला नाही असा कोणताही भक्त भारतवर्षांत नाही. विनोबांची, भागवताची निवड करणारी, दोन संपादने प्रसिद्ध आहेत. ‘भागवत धर्म-सार’ आणि ‘भागवत-धर्म मीमांसा’. गीतेतील तत्त्वज्ञानाला अनुकूल तेवढाच भाग या सारांशात आहे.

विनोबांचा भागवत धर्म, देव-भक्त आणि नामस्मरण असा त्रिकोण सांगतो. यातील भक्त देवाला प्रसंगी प्रापंचिक कामेही सांगतो. यापुढे देवाने विटेवरून म्हणा की देव्हाऱ्यातून, भक्तांच्या अडचणी सोडवल्या पाहिजेत अशी भक्ताची प्रेमळ सक्ती दिसते. विनोबांनी भागवत धर्माचा युगानुकूल संदेश भूदानाच्या माध्यमातून पोहोचवला. एरवी आत्मस्थ असणाऱ्या विनोबांची ही लोकाभिमुखता काहीशी चकित करते. परंतु अर्जुन आणि उद्धवांच्या व्यक्तिमत्त्वाचा विचार करता आश्चर्य वाटावे असे त्यात काहीही नाही.

‘कैसे माझे श्रेय होईल सांगा पायापाशी पातलों शिष्य-भावें,’ अशी इच्छा घेऊन ते गांधीजींच्या सान्निध्यात आले. गांधीजी होते तोवर विनोबांच्या ‘रथा’चे सारे दोर बापूंकडे होते. मोहन आणि विनायक हे नाते कृष्णार्जुनाप्रमाणेच होते. बापूंची आज्ञा म्हणजे विनोबांचा निवास आणि अंतिम शब्द होता. अर्जुन म्हणजे ऋजू बुद्धीचा आणि सरळ मनाचा, भक्त. विनोबाही तसेच होते.

गांधीजींचे निर्वाण श्रीकृष्णाप्रमाणेच झाले आणि बाहेरून कितीही शांतता दाखवली तरी विनोबा आतून कळवळले. पश्चात्तापदग्ध झाले. आपण गांधीजींच्या ऐवजी बाहेर पडलो असतो तर हा सुडाग्नी आपल्याला झेलता आला असता. ही भावना त्यांना पोखरत होती.

त्यांचा कृष्णानंतरचा ‘अर्जुन’ कदाचित झाला असता, मात्र त्याअगोदर सर्व काँग्रेसजन मार्गदर्शनासाठी त्यांच्याकडे आले. अर्जुनाच्या भूमिकेसह विनोबा, उद्धवाच्याही भूमिकेत आले. ज्ञान आणि सार्वजनिक कार्य दोहोंना त्यांनी हात घातला. सत्य, अहिंसा आणि गांधीजींची अष्टपातके त्यांना ज्ञात होती. गीता-भागवताचे तत्त्वज्ञान, सर्वोदय आणि सत्य, प्रेम आणि करुणेचा संदेश घेऊन विनोबांनी परम साम्याच्या स्थापनेसाठी भूदान यज्ञ सुरू केला.

विनोबा, म्हटले की आद्य शंकराचार्य, ज्ञानदेव आणि गांधीजी यांचे स्मरण होते. तथापि आधुनिक राजकीय चिंतन मांडताना त्यांनी एकनाथांचा उल्लेख बरेचदा केलेला दिसतो. विनोबांची वाङ्मय सेवा पाहिली की सहजपणे संत एकनाथांचे स्मरण होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भक्ती आणि प्रबोधनाचा संदेश देणारा प्रत्येक मराठी माणूस नाथांकडून प्रेरणा घेतोच. त्यामुळे सत्य, प्रेम आणि करुणा घेऊन भ्रमण करणाऱ्या विनोबांचे नाथांशी नाते आहे. नाथांच्या अनुषंगाने किमान पाच शतकांच्या सामाजिक आणि राजकीय इतिहासाबद्दल विनोबांनी महत्त्वपूर्ण निरीक्षणे नोंदवली आहेत. ही निरीक्षणे सर्वोदयाची परंपरा सांगतात. महाभारत ते भारत अशी राजकीय आणि सामाजिक संस्कृती उलगडते.

jayjagat24@gmail.com