अतुल सुलाखे

साध्य आणि साधन हे शब्द समोर आले की गांधीजींचे स्मरण होते. एकदा हा सिद्धांत मान्य केला की समाज परिवर्तनाची रीत बदलून जाते. कसेही करून ध्येय पदरात पाडून घ्यायचे या धोरणाला सोडचिठ्ठी मिळते.

विनोबांनी आणखी एक विवेक विचार मांडला- सेवा आणि चित्तशुद्धी! त्यांनी याला विवेक विचार म्हटले नसले तरी गीता प्रवचनांमधे या दोन्ही संकल्पना आढळतात. बाहेरून ‘सेवा’ आणि आतून ‘चित्तशुद्धी’ असे हे समीकरण आहे. साध्य साधन विवेक मान्य असणारी व्यक्ती विघातक पाऊल उचलताना दहादा विचार करते तर सेवा आणि चित्तशुद्धी यांचा आधार घेणारे हा विचार शंभरवेळा करतात. म्हणजे त्यांना तसे करावे लागते. सेवा आणि चित्तशुद्धीच्या मार्गाचा अवलंब केला, की अहंमुक्ती अगदीच सोपी होते. एका मर्यादेपर्यंतच सेवा कार्य मिरवता येते आणि तसे केले नाही तर चित्तशुद्धीचे चाक रुतून बसते. विनोबांच्या आयुष्याचा पूर्वार्ध अज्ञात असण्याचे एक कारण सेवा आणि चित्तशुद्धीचा प्रखर अंगीकार हे असू शकते. त्यांच्या कार्याची प्रसिद्धी बाजूला राहिली. दीर्घ काळ मौन राहूनच काम करत. कमलनयन बजाज यांची ती प्रसिद्ध आठवण चटकन डोळय़ासमोर येते. ‘तुम से ऊँची आत्मा मैंने आजतक नहीं देखी’ हे गांधीजींचे प्रशंसापर पत्र विनोबांनी फाडून टाकले. त्यामागे हा विवेक असावा. गीताईत ही वृत्ती आली आहे,

नम्रता दंभ-शून्यत्व अहिंसा ऋजुता क्षमा

पावित्र्य गुरु-शुश्रूषा स्थिरता आत्म-संयम

गीताई, अ. १३.७

विनोबांनी सेवा व चित्तशुद्धीचा विवेक माउलींकडून घेतला. या श्लोकावर भाष्य करताना ज्ञानेश्वरीमधे अत्यंत नेमकी ओवी आली आहे.

पूज्यता डोळां न देखावी ।

स्वकीर्ति कानीं नायकावी ।

हा अमुका ऐसी नोहावी ।

सेचि लोकां ।।

ज्ञानेश्वरी अ. १३ – ८८।।

विनोबांचा सेवा आणि चित्तशुद्धीचा विचार माउलींना अनुसरणारा आहे. सेवा म्हणजे लोकसेवा आणि चित्तशुद्धी म्हणजे नामस्मरण. विनोबांनी इतक्या सोप्या शब्दांत सेवा आणि चित्तशुद्धी या संकल्पना मांडल्या आहेत. आश्रमातील प्रार्थना, रामनाम, मैलासफाई, सत्याग्रह, राम- हरि आणि भूदान यांची संगती सेवा आणि चित्तशुद्धी यांच्या आधारे सहजपणे लावता येते. हे तत्त्व नाकारणाऱ्यांना विनोबांनी वेळोवेळी सावध केले होते. प्रसंगी फटकारले. अगदी लहान वयापासून त्यांनी हे काम केले. प्रसंगी शंकराचार्याना देखील त्यांनी अपवाद मानले नाही. पारतंत्र्यात आणि कायमच, लोकोपयोगी सेवाकार्य नाकारण्याची हिंमत होतेच कशी असा त्यांचा सवाल असे.

दुसरीकडे प्रार्थनाहीन राजकारण ते निष्फळ मानत. प्रार्थनेवर विश्वास नसेल तर चित्तशुद्धी कशी करणार, हा सवाल महत्त्वाचा आहे. गांधीजींचे रामनाम नाकारायचे आणि त्यांचा सत्याग्रह मान्य करायचा अथवा विनोबांचे भूदानासहित सर्व सेवाकार्य नाकारायचे आणि त्यांचे धर्म चिंतन तेवढे प्रमाण मानायचे, या दोन्ही भूमिका अत्यंत एकांगी आणि गांधीजी आणि विनोबा यांच्या तत्त्वज्ञानाशी फारकत घेणाऱ्या आहेत.

jayjagat24 @gmail.com