अतुल सुलाखे
भूदान म्हटले की दोन पक्ष समोर येतात. पहिला म्हणतो, जमिनीचा प्रश्न सोडवण्याचा हा मार्गच नव्हे. दुसरा पक्ष भूदानाच्या अंतर्गत मिळालेल्या जमिनीची आकडेवारीच समोर ठेवतो. जे सरकारला जमले नाही ते एका व्यक्तीने करून दाखवले. शिवाय भूदानामुळे सत्य, प्रेम आणि करुणेचा संदेश जगभर पोचला हे वेगळेच, असे म्हणतो. भूदानामागच्या आध्यात्मिक विचारांचा उल्लेख होत असला तरी समोर मुख्यत्वे आकडय़ांची चर्चाच येते ही वस्तुस्थिती आहे. ती चर्चा थोडी बाजूला ठेवून आध्यात्मिक पृष्ठभूमीचा विचार करू.
गीतेवरील विनोबांच्या चिंतनात, सामाजिक आणि राजकीय आशय ठासून भरलेला दिसतो. त्याचप्रमाणे भूदानात विनोबांचा आध्यात्मिक विचार विशेषत: साम्ययोग पुरेपूर उतरल्याचे दिसते. भूदान आणि गीता-चिंतन या दोहोंची फारकत केली तर विनोबांचे विचारविश्व पुरेसे उमगत नाही.
यासाठी गीता-गीताई, अर्जुन-उद्धव आणि एकनाथी भागवत-संत एकनाथ हा पट ध्यानात घ्यावा लागतो. भूदान यज्ञ हाती घेणाऱ्या विनोबांनी या आध्यात्मिक पृष्ठभूमीचा सखोल विचार केल्याचे दिसते. अर्जुन आणि उद्धव दोघेही कृष्णाचे भक्त, सखे आणि बंधू. या उभय भक्तांना कृष्णाने उपदेश केला तो गीतेच्या रूपाने. अर्जुनासाठी श्रीमद्भगवद्गीता आणि उद्धवासाठी श्रीउद्धवगीता. श्रीमद्भागवताच्या अकराव्या स्कंदात ही गीता आली आहे. या दोन्ही गीता मराठी भाषेने आणखी समृद्ध केल्या. ज्ञानेश्वरी आणि एकनाथी भागवत हे दोन अजरामर ग्रंथ मराठीमध्ये आहेत. महाराष्ट्राच्या आणि कदाचित संपूर्ण भारताच्या भक्तिसंप्रदायाला या ग्रंथांमुळे कायमस्वरूपी चालना मिळाली आहे. विनोबांनीही गीतेवर आणि भागवतावर विवेचन केले. या चिंतनाचे लक्ष्य समाजाचे सर्वागीण हित साधणे हेच होते. विनोबांनी गीता-भागवतावर लिहिले. त्याप्रमाणे त्यांनी उद्धव आणि अर्जुन यांच्या व्यक्तिमत्त्वातील सूक्ष्म भेदही सांगितला. त्यांच्या म्हणण्यानुसार अर्जुन वीर, भक्त आणि अर्जुनक संप्रदायाचा आदर्श होता. पांडवांच्यामधील कृष्ण अशी त्याची योग्यता होती. तथापि भगवान श्रीकृष्ण निजधामाला जाणार या कल्पनेने तो पराकोटीचा अस्वस्थ झाला. आणि कृष्णानंतर तो गलितगात्र झाला. कृष्णानंतर या महावीराच्या लौकिक पराक्रमाला ग्रहण लागले.
याउलट उद्धवाचे होते. कृष्ण होता तोवर उद्धव, अर्जुनासारखा तळपला नाही. कृष्ण निर्वाणाची वार्ता ऐकून तोही दु:खी झाला. परंतु कृष्णाने त्याला उपदेश केल्यावर तो जणू स्थितप्रज्ञ झाला. आजही उद्धवमहाराज गोवर्धन पर्वत परिसरात राहतात अशी लोकभावना आहे. कृष्णाने त्याला जो उपदेश केला तो ‘उद्धव-गीता’ म्हणून प्रसिद्ध आहे. ऐहिक आणि पारलौकिक मुक्तीसाठीचा हा ग्रंथ भगवद्गीतेच्या तोडीचा आहे.
गीतेमधील तत्त्वज्ञानाचे कसे आचरण करायचे या प्रश्नाचे उत्तर ‘भागवताप्रमाणे’ असे आहे. समाजाच्या पतनाचे विवेचन करणारा आणि उन्नतीचा मार्ग सांगणारा हा ग्रंथ आहे. यदुकुलाचा नाश आणि उद्धवगीता या दोहोंचा समावेश एकाच स्कंदात दिसतो ही गोष्ट सूचक आहे. एकनाथांनी उद्धवगीतेवर टीका लिहून हा उपदेश कालसुसंगत केला. त्यांच्यासमोरचा समाजही पतनाच्या गर्तेत गेला होता. विनोबांनी गीतार्थ सांगितला आणि भागवत धर्माचे युगानुकूल रूप भूदानाद्वारे आपल्यासमोर ठेवले.
jayjagat24@gmail.com