अतुल सुलाखे
मंगरोठमध्ये पहिले ग्रामदान झाले आणि तिथेच शंकाकुशंका घेतल्या गेल्या. ही एका अर्थाने उचित गोष्ट झाली कारण ग्रामदान किती खोलवर रुजले याचा अंदाज त्यामुळे आला. संपूर्ण गावाचे दान करणे फारच कठीण होते. त्यामुळे विनोबांनी सर्वाना धीर दिला. मंगरोठमध्ये उद्भवलेला घायकुतीचा क्षण त्यांच्या कानी पडला तेव्हा ते काशी विश्वविद्यालयात होते. तिथून त्यांनी गावकऱ्यांसाठी पत्र संदेश दिला.
‘भूदानाबाबत गावकऱ्यांनी मागे हटण्याचे कारण नाही. सगळी जमीन माझ्या नावाने दान दिली गेली आहे. सरकार त्यात काही दखल देणार नाही. आमच्या मदतीसाठी ते काही कायदे करून देतील. वर्तमानपत्रात जे काही छापून येते त्या भ्रमात आपण पडू नये. माझा अनुभव आहे की जर आपण आपल्या सत्त्वगुणाच्या विकासाची चिंता करत बसू तर त्या समोर जवळपासचे रजोगुण आणि तमोगुण नष्ट होऊन जातील.’
या घडामोडींमधे एक वर्ष उलटले. हा यज्ञ फसतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. कार्यकर्त्यांनी लोकांना सांगितले की, ‘ही सगळी प्रक्रिया प्रेमपूर्वक झाली आहे. ती कुणाला, अगदी आजही, आवडली नसेल तर त्यांनी दानपत्रे परत घ्यावीत.’ एवढेच नव्हे तर दानपत्रे फाडून टाकण्याचीही तयारी कार्यकर्त्यांनी दाखवली.
पुरुषांची ही चलबिचल स्त्रियांच्या कानी गेली. जगरानी या महिलेने आपल्या पतीला स्पष्ट सांगितले की ‘दान परत कसे घेता येईल? असे झाले तर गावात तोंड दाखवणे मुश्कील होईल. त्यामुळे काही झाले तरी दान परत घ्यायचे नाही.’ तिच्या बोलण्यामुळे सगळे गाव भानावर आले. गावाने ग्रामदानाचा प्रयोग पुन्हा सुरू केला.
भूदान यज्ञात रामचंद्र रेड्डींची जे स्थान आहे ते ग्रामदानात जगरानीदेवींचे आहे, असे म्हणावे लागते. एरवी दान आणि तेही जमिनीचे आणि त्यात पुन्हा संपूर्ण गावाचे, ते परत घेण्याची संधी मिळूनही मंगरोठवासीयांनी ती घेतली नाही. तर दुसरीकडे भूदान यज्ञातील कार्यकर्त्यांनी हाती आलेली दानपत्रे अगदी फाडून टाकण्याची तयारी दाखवली ही मोठी घटना म्हणावी लागेल. या यज्ञात अवघ्यांचा सहभाग होता आणि सर्वाना प्रसादाची अपेक्षा होती.
भूदान आणि ग्रामदान यज्ञाने यज्ञ या संकल्पनेला मोठा अर्थ दिला. जगाच्या इतिहासात अभूतपूर्व असा हा प्रयोग होता. मंगरोठच्या जनतेने ग्रामदान यज्ञाचा वसा सोडला नाही. त्यांच्या या निर्णयाला धीर देताना विनोबांनी १९ जून १९५३ च्या पत्रात लिहिले,
‘तुमच्या हृदय मंथनाची कहाणी कळली. तुम्ही तुमची जमीन मला देऊन मोठी जबाबदारी टाकली त्यातून तुमचीही जबाबदारी वाढली आहे. तुमच्या शक्तीपेक्षा अधिक काम मी तुमच्याकडून करून घेणार नाही. पण तुमच्या शक्तीपेक्षा कमी कामही तुम्ही करू नये, अशी अपेक्षा ठेवत आहे..’
‘..कधी घाबरू नका. प्रत्येक गोष्टीवर शांतपणे विचार करा. सगळय़ांनी मिळून मिसळून आणि शांतपणे विचार करावा. सर्वसंमतीने आणि सर्वाच्या शक्तीने काम करावे. तुमच्या गावाचे नाव देशभर झाले आहे. ईश्वराने तुम्हाला सद्बुद्धी दिली आहे तोच बळही देईल..’jayjagat24@gmail.com