अतुल सुलाखे

विनोबांची राजकीय भूमिका नेमकी काय होती, सत्ता आणि सत्ताधारी यांच्याकडून त्यांच्या कोणत्या अपेक्षा होत्या आणि कोणती रचनात्मक कार्ये करावीत असे त्यांना वाटत होते आदींविषयी यात्रेच्या पहिल्या टप्प्यातच याची विनोबांना स्पष्टता होती..

‘विनोबा काँग्रेसचे- खरे तर सत्ताधाऱ्यांचे – जोरदार समर्थक होते आणि भूदान आंदोलन काँग्रेस पुरस्कृत होते’ हे विनोबांवरचे सातत्याने होणारे आरोप असतात. परंतु वास्तव काही वेगळेच होते.

पदयात्रा जिथे जिथे गेली तिथे विनोबांना स्पष्टपणे दिसले की स्वातंत्र्यामुळे लोकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. मात्र सरकार काही काम करत नाही अशी त्यांची भावना होती. विनोबांनी लोकांना सांगितले, ‘सरकारकडून आता अपेक्षा करू नका. सरकारच्या आधाराने नव्हे सामूहिक शक्तीने प्रश्न सोडवायला हवेत.’

व्यक्ती, समूह आणि समाज या तिन्ही पातळय़ांवर क्रांती व्हावी अशी त्यांची कल्पना होती.

याच सुमारास पहिल्या सार्वत्रिक निवडणुकांच्या निमित्ताने विनोबांना सत्तेसाठीची साठमारी दिसली. काँग्रेस, जनता आणि सर्वोदय या तिन्हींबाबत विनोबांची समज नेमकी होती. काँग्रेसविषयी लोकांनी प्रश्न विचारले की ते सांगत, ‘गांधींच्या काळात इंग्रजांचा मार खावा लागत असे. आता लाडू खाण्याची गोष्ट आहे. रचनात्मक काम काँग्रेसने संस्थांना सोपवून दिले आहे. श्रीमंत माणूस जसा पूजेसाठी ब्राह्मण ठेवतो तसे काँग्रेसवाल्यांनी रचनात्मक काम कार्यकर्त्यांकडे सोपवून दिले आहे. एक काम चरखा संघाला, दुसरे तालिमी संघाला तर तिसरे हरिजन सेवक संघाला अशी कामे सोपवून दिली आहेत. गांधीजींनी काँग्रेसला लोकसेवक संघात परिवर्तित करण्याविषयी सुचवले होते. तसे झाले नाही. उलट रचनात्मक कार्य करणाऱ्या संस्थांना काँग्रेसच्या दावणीला बांधले आहे. प्रमाणित खादीची गोष्ट निघाली तर काँग्रेसला त्याची आवश्यकता वाटत नाही. म्हणजे एका बाजूने चरखा संघाला पूजेचा अधिकार दिला आणि मग म्हणतात हा गणपती नाही, कोणताही चालेल. (त्यामुळे) काँग्रेस आणि सरकारच्या भूमिकेवर न राहता तुम्ही स्वबळावर काम करा. सर्वोदय म्हणजेच सगळय़ांचे प्रयत्न.’

विनोबांच्या राजकीय भूमिकेचे काही विशेष आहेत ते जाणून घेतले की त्यांच्या मनातील क्रांतीचे साध्य स्पष्ट होते. गांधीजींनी हे जग सोडले होते. वैचारिक आणि रचनात्मक पातळीवर मार्गदर्शक नेता म्हणून काँग्रेस आणि देश त्यांच्याकडे आशेने पाहात होता. अशा वेळी दुसरा ‘गांधी’ बनणे विनोबांना सहज शक्य होते. तथापि तसे बनणे त्यांनी नाकारले. एवढेच नव्हे तर जनहितासाठी त्यांनी सरकारलाही धारेवर धरले. कारण सत्ता शब्दाचा त्यांना अपेक्षित असणारा अर्थ खूप वेगळा होता. सत्ता म्हणजे ‘पॉवर’ नव्हे तर केवळ ‘असणे’. हक्कांऐवजी ते सेवेला प्राधान्य देत.

सत्तेविषयी अनास्था आणि रचनात्मक कार्याचा आग्रह अशी विनोबांची राजकीय भूमिका होती. रचनात्मक कार्यामुळे समाज अनिष्ट वळण घेणार नाही हा त्यांचा विश्वास होता. नंतरच्या काळात विनोबांनी लोकनीती, तिसरी शक्ती या संकल्पना मांडल्या. त्यांची बीजे भूदान यात्रेच्या आरंभी अशी आढळतात. काँग्रेसची उलटतपासणी करत असताना जगण्याचे प्रश्न कसे सोडवायचे याचाही मार्ग दाखवला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

jayjagat24@gmail.com