अतुल सुलाखे

आहाराप्रमाणे तत्त्वज्ञानही चौरस हवे म्हणजे विकास निकोप होतो. माउलींच्या हरिपाठात या गोष्टीवर नेमका भर आहे. देवाच्या दारात किती वेळ थांबायचे तर ‘क्षणभर’. तेवढय़ाने चारी मुक्ती साध्य होतात. तथापि हे उभे राहणे अगदी सर्वस्व ओतून झालेले असावे. देवदर्शनापेक्षा हरिपाठ कसा म्हणावा याची शिस्त माउलींनी लावल्याचे दिसते.

‘नित्य-सत्य-मित हरिपाठ ज्यासी।

कळीकाळ त्यासी नातळती।।’

कृती अल्प असली तरी चालेल पण तिच्यात प्रामाणिकपणा हवा. नित्यता हवी. थोडक्यात हा भक्तीचा ‘त्रिकोण’ आहे. विनोबा या त्रिकोणाशी दोन प्रकारे जोडले होते. संतांच्या शिकवणीचा उपासक आणि प्रयोगशील शास्त्रज्ञ असा तो संबंध होता. सर्वोदय समाजाच्या निर्मितीमध्ये हे नाते चटकन दिसते.

‘आमची ही संघटना एक शिथिल संघटना आहे. तशी तिची ओळखही आहे. शब्द नेहमी अचूक विचार प्रकट करतातच असे नाही. संघटनाच म्हणायचे झाले तर मी तिला सहज संघटना म्हणू इच्छीन. उत्तम गोष्ट ही आहे, की ही संघटना आहे, असे आपण आपल्या मनात समजावे. ही एक रचना नसून सहज संपर्क आहे.

हा सर्वोदय समाज, सहविचाराचे, सहचिंतनाचे, तत्त्व संकीर्तनाचे आणि नामजपाचे साधन व्हावे असे आम्हाला वाटते. जो विचार साऱ्या विश्वात पसरायचा असतो तो सदेह पसरत नाही. विदेहच असतो. म्हणून या विचारासाठी आम्ही देह (संघटन) तयार करत नाही. त्याला सदेह केले तर काम होईल हे खरे आहे परंतु तो विश्वव्यापी होणार नाही. विश्वव्यापी ज्ञाना प्रचारासाठी एक विदेही रचना करत आहोत.’

विनोबा, सर्वोदय, विनोबांचे संस्था व संघटनेविषयीची मते यांची स्पष्ट कल्पना वरील उताऱ्यावरून येते. ती खोलात पाहायची आहेच तथापि या संमेलनाच्या अनुषंगाने दोन मुद्दय़ांचाही विचार करायचा आहे.

साधारणपणे काँग्रेसने आणि नेहरूंनी देशासाठी काहीच केले नाही उलट नुकसानच केले, असा सूर लावला जातो. तो अक्षरश: कुणीही लावते. काँग्रेसचे तेव्हाच विसर्जन केले असते तर देश कितीतरी पुढे गेला असता. सर्वोदय म्हटले की गांधी आणि विनोबा यांच्यापुढे गाडी जात नाही. मात्र सर्वोदयाचा शोध घ्यायचा असेल तर केवळ गांधीजी आणि विनोबा यांच्यावर अवलंबून राहता येत नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नेहरू, जे. सी. कुमारप्पा, मीराबेन आणि आचार्य दादा धर्माधिकारी यांची मांडणीही विचारात घ्यावी लागते. राजकारण, अर्थकारण, गांधी विचारानुकूल साधना आणि नव्या युगाच्या संदर्भात सर्वोदयाचा वेध आदी मुद्दय़ांना या मंडळींनी कवेत घेतले. या देशाला आधुनिक दार्शनिकांची परंपरा आहे हे आपण विसरलो. मुळात असे काही आहे हे माहीत होते का, हाच खरा प्रश्न आहे. काँग्रेसेतर मंडळींच्या दुर्लक्षामुळे आणि काँग्रेसच्या सर्वोदय विमुखतेमुळे सर्वोदय काहीसा विस्मृतीत गेला असे वाटले तरी विनोबांनी त्या पातळीवर बंदोबस्त करत सर्वोदय समाज आणि भागवत धर्माची उकल केली. त्यातून एक नाते उभारले आहे.

 jayjagat24@gmail.com