अतुल सुलाखे

अक्कोधेन जिने कोधं

असाधुं साधुना जिने।

जिने कदरियं दानेन

सच्चेनालिक वादिनं।।

अक्रोधाने क्रोधाला जिंकावे. असाधुत्वाला साधुत्वाने जिंकावे. कंजुषाला दानाने जिंकावे. खोटय़ाला खऱ्याने जिंकावे.

अहिंसका ये मुनयो

निच्चं कायेन संवुतो

ते यन्ति अच्चुतं ठानं

यत्थ गन्त्वा न सोचरे।

जी माणसे अहिंसक आहेत, नेहमी आपल्या शरीराने संयमित आहेत, ते त्या अतिउच्च पदास जातात. तेथे जाऊन शोक करीत नाहीत.

– धम्मपद

सर्वोदयाची कालसुसंगत मांडणी करू पाहणाऱ्या संमेलनामध्ये आचार्य शंकरराव देव, किशोरलाल मश्रूवाला, देवीदास गांधी, जे. सी. कुमारप्पा उपस्थित होते. त्यांनी आपले विचार मांडले. विनोबांची भूमिका सर्वानी मान्य केली.

या संमेलनात स्थापन झालेल्या ‘सर्वोदय समाज’पाठोपाठ ‘सर्व सेवा संघ’ या औपचारिक संघटनेची निर्मिती झाली. या दोन संघटनांनी १९५० नंतरची अडीच दशके भारतीय लोकशाहीचे जतन केले. या नेत्यांनी तसे वर्तन करणे साहजिक होते, कारण १९२० पासून स्वतंत्र भारताची जडणघडण कशी असेल याची स्पष्टता आली होती. नेहमीप्रमाणे गांधीजींना ती थोडी अधिक होती. आपल्या स्वप्नातील भारत कसा असेल याची व्यापक मांडणी करून त्यांनी या जगाचा निरोप घेतला.

सर्वोदय समाजाच्या त्या संमेलनाचा समारोप पंडित नेहरूंच्या भाषणाने झाला. नेहरू म्हणाले, ‘‘मूलभूत प्रश्नांवर विचार झाला पाहिजे या विनोबांच्या म्हणण्याशी मी पूर्णत: सहमत आहे. स्वातंत्र्याला धोका बाहेरून नसून आतूनच आहे. हिंसेचे वारे असेच चालू राहिले तर राष्ट्र छिन्नभिन्न होईल. विनोबांप्रमाणे मीदेखील मानतो की आमच्या साध्याप्रमाणे साधनदेखील शुद्ध असले पाहिजे.’

अध्यक्षीय भाषणात डॉ. राजेंद्र प्रसाद यांनीही अहिंसा आणि साधनशुद्धीवरच भर दिला. या संमेलनात झालेल्या सर्व भाषणांत साधनशुचिता केंद्रस्थानी होती. विनोबा संस्था आणि संघटनेच्या विरोधात होते. यामागे अहिंसेचा विचार होता. राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी हा विचार उचलून धरला. ४ एप्रिल १९४८च्या ‘हरिजन’च्या अंकात राजेंद्र प्रसाद यांनी लिहिले, ‘सर्वोदय समाज संघटनेच्या रूपात काम करणार नाही. त्याचा काही निश्चित कार्यक्रम नसेल. तथापि त्याला मानणारे सेवक कुठले ना कुठले रचनात्मक कार्य करत राहतील. कोणीही कार्यकर्ता सर्वोदय समाजातर्फे वा सर्वोदय समाजाच्या नावाने कार्य करणार नाही.’

प्राचीन भारतातील राजकुलांमध्ये कुलगुरूंचे म्हणून स्थान असे. उदाहरणार्थ रघुकुलाचे गुरू वसिष्ठ होते. राजा त्यांच्याशी सल्लामसलत करून जनतेच्या हिताचे निर्णय घेत असे. शास्त्रवचने जाणून घेत असे. ‘योगवासिष्ठा’सारखा ग्रंथ हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. या संमेलनातही आचार्याच्या समूहाने देशाच्या सर्वोच्च नेत्यांना मार्गदर्शन केले. देशासमोर साध्य, माध्यम आणि पथ ठेवला. सर्वोदय, साधनशुचिता आणि साम्ययोग अशी ही त्रयी होती. पाया सत्य आणि अहिंसेचा होता. जगाने आदर्श ठेवावा असे चिंतन इथल्या राजकीय नेत्यांनी केले होते. आपण ते फार लवकर विसरलो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

jayjagat24@gmail.com